Nashik News : अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर आंब्याची आवक सुरू झाली आहे, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत ही आवक सर्वसाधारण असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीमध्ये लालबागची आवक सर्वाधिक असून, हापूस आंब्याला सर्वाधिक दर मिळत आहे.
अक्षयतृतीयेमुळे आंब्याची मागणी बाजारात सर्वाधिक असते. त्यामुळे सणाच्या अगोदरपासूनच नाशिक बाजार समितीच्या फळबाजार आवारात आंब्याची आवक वाढत असते. प्रामुख्याने कोकण व दक्षिण भारतातून हा आंबा येतो. यंदाही ही आवक सुरू आहे.
आंबा रसाचा नैवेद्य हा अक्षयतृतीयेला केला जात असल्याने ग्राहकांची आंबा खरेदीसाठी गर्दी होते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सणाला आंबा कमी अधिक प्रमाणात खरेदी केला जातो. हापूस, केसर, लालबाग व बदाम आंब्याची सध्या व्यापाऱ्यांकडे उपलब्धता आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी आंब्याची मागणी नोंदवून उपलब्धता केली आहे.
येथील बाजार समितीत २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान आंब्याची आवक २,७९५ क्विंटल झाली. हापूसला क्विंटलला २० हजार ते ४५ हजार तर सरासरी ३५ हजार रुपये दर मिळाला. केसरला १० हजार ते २० हजार तर सरासरी १६ हजार रुपये दर मिळाला. लालबागला ६ हजार ते १४ हजार तर सरासरी १२ हजार रुपये दर मिळाला. बदामला ५ हजार ते १४ हजार तर सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या तीन दिवसात ही आवक कमी झाल्याची स्थिती आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात मागणीनुसार आंब्याचा पुरवठा केला जातो. मात्र सणाच्या तोंडावर ही आवक कमी झाल्याचे दिसून आले. लालबाग आंब्याची सर्वाधिक आवक असून बदामची आवक होत आहे. तर हापूस आंब्याची आवक मागील वर्षीच्या तुलनेत काहीशी कमी आहे.
नाशिकमधील आवक स्थिती
दिनांक आवक (क्विंटल)
७ मे ८८५
६ मे ६७०
४ मे १४६५
दराची स्थिती (प्रतिक्विंटल)
वाण किमान कमाल सरासरी
हापूस १५,००० ३०,००० २३,०००
केशर १०,००० १७,००० १५,०००
लालबाग ६,००० ११,००० ९,०००
बदाम ५,००० १०,००० ८,०००
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी आहे. यंदा दरात सुधारणा आहे. मात्र दर असूनही ग्राहकांकडून मागणी असल्याने विक्री होत आहे. हापूस, केसर आंब्याची मागणी ग्राहक वर्गातून होत आहे. तर सर्वाधिक मागणी लालबाग व बदाम आंब्याची आहे.मंगेश गुप्ता, दर्शन फ्रूट कंपनी, नाशिक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.