Team Agrowon
युक्रेन- रशिया आणि पॅलेस्टाइन- इस्राईल युद्धामुळे महाराष्ट्रातून परदेशात होणाऱ्या आंबा निर्यातीला पुरता लगाम बसला आहे.
परिणामी परदेशात चांगली मागणी आणि दर असूनही आंबा निर्यातीअभावी उत्पादक आणि निर्यातदारांचे मोठे नुकसान होत आहे.
यंदा आंबा हंगाम चांगला असूनही केवळ ९६ टनांपर्यंतच निर्यात झाल्याची माहिती वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रातून मिळाली.
राज्यात कोकण विभागासह अन्य ठिकाणी आंबा उत्पादन चांगले आहे. मात्र, निर्यातीसाठी पोषक वातावरण नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
राज्यातील ४० हून अधिक निर्यातदार आंबा निर्यात करतात. निर्यातक्षम आंब्याचे बुकिंग आधी करून ठेवलेले असते. तसेच संबंधित उत्पादकांना आगाऊ रक्कमही देत असतात.
हंगाम सुरू झाल्यानंतर निर्यात केंद्रांतील विकिरण केंद्रांमध्ये योग्य प्रक्रिया करून निर्यात केली जाते.
सध्या पॅलेस्टाइनच्या चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळविल्यामुळे समुद्रीमार्गे होणारी निर्यात ठप्प आहे. परिणामी हंगामात २५ वेळा मिळालेली ऑर्डर रद्द करण्याची पाळी निर्यातदारांवर आली आहे.
सध्या मॉरिशस, रशिया, मलेशिया या देशांतील निर्यात पूर्णपणे बंद आहे. पॅलेस्टाइन चाच्यांनी गेल्या काही महिन्यांपासून समुद्रात मोठा धुमाकूळ घातला आहे.
नुकताच इराकने अमेरिकेवरही हल्ला केला आहे. त्यामुळे विमान वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. तसेच युक्रेन-रशिया युद्ध सुरूच आहे. परिणामी या देशांत होणार होणारी निर्यात मागणी असूनही होऊ शकली नाही.
अस्थिर वातावरणामुळे निर्यातदार जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत. विस्कळीत विमान आणि जहाज वाहतुकीमुळे निर्यातदार धास्तावले असून अचानक ऑर्डर रद्द झाली तर नुकसान सोसण्यापेक्षा सावधगिरीने पावले उचलली जात आहेत.
राज्यातून यंदा ५००० हजार टन आंबा निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, सध्या केवळ ९०० टन आंबा निर्यात झाला आहे. हा हंगाम ३० जूनपर्यंत चालतो. त्यामुळे जास्तीत जास्त २२०० टनांपर्यंत आंबा निर्यात होईल, असे पणन विभागाचे म्हणणे आहे.