Agriculture Success Story : विदर्भातील वाळकी (ता. जि. अकोला) हे गाव जवळपास पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पूर्वी हंगामी कोरडवाहू पीक पद्धतीवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून होते. अलीकडील काही वर्षांमध्ये वाळकीच्या ग्रामस्थांनी काकडीतून पीक पद्धतीत बदल केला, आज याच पिकात संपूर्ण विदर्भात या गावाची वेगळी ओळख तयार झाली आहे. कपाशी व सोयाबीन यांच्या तुलनेत कमी कालावधीत चांगले उत्पादन, चांगला दर व उत्पन्न हे पीक देत असल्याचा अनुभव येथील शेतकरी घेत आहेत. .मार्गदर्शन ठरले महत्त्वाचेकाकडीची लागवड गावात सुरू झाली त्या काळात शेतकरी कपाशीत त्याचे आंतरपीक घेत. कपाशीचा बहुतांश खर्च या पिकातून निघून जायचा.आता कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी गावात शेतीशाळांचे आयोजन सुरू केले आहे. त्यातून सुधारित बियाणे, सुधारित लागवड तंत्र, खते व सिंचन व्यवस्थापन, किडी- रोग नियंत्रण याबाबत शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. .यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर यांचे मार्गदर्शन मिळाले. आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र अधिकारी व्ही. एम. शेगोकार, सहायक तंत्र अधिकारी अर्चना पेठे यांनी शेतीशाळेचे वर्ग घेतले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. एस. एस. माने यांच्या मार्गदर्शनात भाजीपाला विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम घावडे, डॉ. दिनेश फड यांनी शेतीशाळांसह शेतांना वेळोवेळी भेटी देत मार्गदर्शन केले. आत्मा अंतर्गत शेतकरी गटही स्थापन झाला आहे..Farmer Success Story : व्यावसायिक वृत्ती जोपासून मिळवली समृद्धी.बदलते चित्रशेतकऱ्यांच्या मते गावात सुमारे ५० ते ६० शेतकरी खरिपात काकडी घेतात. ज्यांच्याकडे सिंचनाची चांगली सुविधा आहे ते उन्हाळ्यातही हे पीक घेतात. सप्टेंबरपर्यंत काकडीचा हंगाम चालतो. काढणी हंगामात सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरोघरी तोडणी, धुलाई, प्रतवारी अशी लगबग सुरू असते. हे काम महिलांसह तरुण व वयोवृद्धही आनंदाने करतात. संध्याकाळी सर्व शेतकऱ्यांची काकडी सामूहिकपणे दररोज शेकडो क्विंटल प्रमाणात अकोला बाजारपेठेत रवाना होते. त्यातून वाहतूक व्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. काहींनी वाहने विकत घेतली आहेत. तोडणी, प्रतवारी, वाहतूक अशा सर्व टप्प्यांवर मजुरांची मागणी वाढल्याने त्यांना स्थानिक रोजगार तयार झाला आहे..विद्यापीठाचे तंत्र ठरतेय उपयोगीवरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. घावडे म्हणाले की पूर्वी कपाशीत काकडी अशी इथली सवय होती. आम्ही त्यांना पूर्ण सलग मुख्य पीक म्हणून काकडी घेण्याबाबत मार्गदर्शन करू लागलो. काही शेतकरी नेहमीच्या पद्धतीने लागवड करायचे. त्यात वेलींसाठी काही आधार नसायचा. आम्ही त्यांना मांडव पद्धतीचे तंत्र समजावून दिले. त्यामुळे वेलींना योग्य वाढण्याची दिशा मिळाली. लागवडीनंतर २० व्या ते ३० व्या दिवशी जमिनीलगतचे अनावश्यक फुटवे काढून टाकण्याबाबतही मार्गदर्शन केले. त्यामुळे मादी फुलांचे प्रमाण वाढले. काकडी फळाचे प्रमाण वाढले. एकूण व्यवस्थापन सल्ल्यातून एकसारखा आकार व गुणवत्ता मिळू लागली. आता एकरी उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ मिळाली आहे. एकरी सात, आठ ते दहा टनांच्या आसपास शेतकरी उत्पादन घेत आहेत. शेतकरी आपापल्या पसंतीनुसार बियाणे निवडतात. समूहाने एकत्र येऊन एखाद्या कंपनीचे वाण त्यांनी खरेदी केल्यास बियाणे दरांत मोठी बचत होऊन त्यांचा खर्च कमी होण्यास मदत मिळेल असेही डॉ. घावडे म्हणाले..Agriculture Success Story: जिद्द सुनेला ‘सीए’ करण्याची.....गावंडे यांचा अनुभवगावातील काकडी उत्पादक नितीन मनोहर गावंडे म्हणाले की सुमारे २२ वर्षांपासून मला या पिकाचा अनुभव आहे. एक एकरांत लागवड करतो. प्रति २५ ग्रॅम वजनाची बियाण्याची एकरी १२ ते १३ पाकिटे लागतात. पाकिटाला ९०० रुपयांपर्यंत किंमत द्यावी लागते. या वर्षी अर्धी लागवड थेट जमिनीवर तर उर्वरित मंडप पद्धतीने केली. जे वेल मंडपावर चढवले होते त्यात काकडीचा दर्जा चांगला राहिला. तोडणी सोपी झाले. किडी- रोगांचे प्रमाण तुलनेने कमी दिसून आले. अकोला बाजारपेठेत दरवर्षी किलोला २० ते २२ रुपये दर मिळतो. यंदा पावसाळी स्थितीत हाच दर २५ रुपयांपर्यंत मिळाला. एकरी उत्पादन खर्च २५ हजारांच्या दरम्यान राहतो. नफ्याचा परतावाही चांगला असतो. गावातील शेतकरी व माजी पोलिस पाटील रमेश तायडे यांचाही अनुभव जवळपास गावंडे यांच्यासारखाच आहे. अन्य पिकांच्या तुलनेत काकडीने आम्हा गावकऱ्यांना मोठा आधार दिल्याचे ते सांगतात..उत्पादकता वाढीस चालनापूर्वी खरीप हंगाम संपल्यावर आर्थिक टंचाई भासत असे. आता काकडी शेतीतून गावातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. काहींनी नवी घरे बांधली. ट्रॅक्टर व यंत्रसामग्री खरेदी केली. काहींनी सिंचनसुविधा निर्माण केल्या. गावंडे यांनीही तीन किलोमीटरवरून पाइपलाइन आणण्याचा खर्च केला. त्यातून शाश्वत सिंचन सुविधा तयार केली. आता शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे गावातील तरुणांत शेतीबाबत आकर्षण वाढले आहे. पूर्वी एकरी तीन ते पाच टन मिळणारे उत्पादन आठ ते नऊ टनांपर्यंत पोचलेच. शिवाय उत्पादकता आणखी पुढे न्यायची असल्याचे शेतकरी सांगतात. बाजारात सामूहिक काकडी पाठवणी पद्धतीत एखाद्या शेतकऱ्याला उशीर झाला तरी अन्य शेतकरी त्याला सहकार्य करतात. त्यामुळे गावात सहकार्याची भावना बळकट झाली आहे.नितीन गावंडे ७२१८९४५२६३, डॉ. श्याम घावडे ७०२०५७५८६७(वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.