Tomato Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Crop Disease: टोमॅटो पिकातील खोडकुज रोगाचे व्यवस्थापन

Tomato Stem Rot: टोमॅटो हे जगभरातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकामध्ये जगभरामध्ये आजपर्यंत बुरशीजन्य, जीवाणूजन्य, फायटोप्लाझ्मामुळे होणाऱ्या २०० हून अधिक तर विषाणूंमुळे होणाऱ्या १२० पेक्षा जास्त रोगांची नोंद झालेली आहे.

Team Agrowon

डॉ. संजय कोळसे, डॉ. प्रवीण खैरे, डॉ. रवींद्र गायकवाड

Tomato Crop Protection: टोमॅटो हे जगभरातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकामध्ये जगभरामध्ये आजपर्यंत बुरशीजन्य, जीवाणूजन्य, फायटोप्लाझ्मामुळे होणाऱ्या २०० हून अधिक तर विषाणूंमुळे होणाऱ्या १२० पेक्षा जास्त रोगांची नोंद झालेली आहे. त्यातही मुख्यतः लवकर व उशिरा येणारा करपा, बुरशीजन्य व जीवाणूजन्य मर, अँथ्रेक्नोज, जिवाणूजन्य फळावरील डाग, फळ सड यासोबतच विषाणूजन्य रोग टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, पर्णगुच्छ/बोकड्या व मोझॅक हे आढळतात.

यातील अनेक सामान्य व किरकोळ प्रमाणात प्रादुर्भाव करणारे रोग आता वातावरणातील बदलामुळे मोठी समस्या निर्माण करू लागले आहेत. त्यात खोडकुज हा महत्त्वाचा रोग बनत आहे. हा रोग खोडावर आणि फळांवरही येतो. मात्र जास्त प्रार्दुभाव हा खोडावर दिसून आला आहे. या रोगांविषयी माहिती जाणून घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

रोगाचे नाव- सदर्न करपा/ स्क्लेरोशिनिया खोडकुज

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

बुरशीचे शास्त्रीय नाव : स्क्लेरोशिअम रोलफसाय (Sclerotium rolfsii)

बुरशीचे डिवीजन : Basidiomycota

परजीवी प्रकार : साप्रोफायटिक परजीव (Saprophytic parasite)

नुकसान : या रोगामुळे पिकाचे ४० ते ५० टक्के नुकसान होते.

यजमान पिके : ही बुरशी जवळपास ५०० प्रकारच्या झाडांवर रोग निर्माण करते. यामध्ये वांगी, भुईमूग, तूर, मूग सोयाबीन, सूर्यफुल, कोबी, भेंडी, मिरची, बटाटा, टरबूज, हरभरा इत्यादी अनेक पिकांचा समावेश होतो.

लक्षणे

या रोगाची लक्षणे प्रामुख्याने जमिनीलगतच्या खोडावर, तसेच जमिनीलगत असलेल्या टोमॅटो फळावर दिसून येतात. सुरुवातीला खोड व जमिनीलगतचा भाग (ज्याला इंग्रजीमध्ये ‘कॉलर रिजन’ म्हणतात.) या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. ही बुरशी खोडावर कापसाच्या धाग्यांसारखी असून, जमिनीवर जाळ्यांसारखी पसरते. या बुरशीचे बीजाणू हे भुरकट मोहरीच्या दाण्यांसारखे दिसतात. बुरशीच्या बिजाणूची प्रादुर्भावग्रस्त खोडावर संख्या वाढल्यास ती सापाने विळखा घातल्यासारखी दिसते.

या बुरशीच्या खोडात होणाऱ्या शिरकावामुळे खोडाचे तंतू मलूल होऊन सडतात. कालांतराने अशा झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडतात. बुरशीची वाढ जमिनीवर होत असल्याने जमिनीलगत टेकलेल्या फळांवर या बुरशीचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेली फळे पिवळी पडतात. मलूल होऊन सडून जातात. त्यावर झपाट्याने पांढरट बुरशीची वाढ होते.

पोषक हवामान

उबदार, दमट हवामान (विशेषतः १५ ते २१ अंश सेल्सिअस तापमान, ४० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि ४८ तासांपेक्षा जास्त ओलसरपणा राहणे इ.) या रोगास अनुकूल आहे. पाण्याचा कमी निचरा होणारी जमीन या बुरशीच्या वाढीस अनुकूल असते.

रोग निर्माण व प्रसार

स्क्लेरोशिअम रोलफसाय बुरशीचे बीजाणू विविध मार्गांनी पसरतात. त्यात शेतातील मातीत चालवली जाणारी उपकरणे व अवजारे; पाण्याचा प्रवाह किंवा रोपांद्वारे चिकटून होणारे स्थलांतर; कापणी, छाटणी किंवा शेतातील कामांद्वारे; रोगग्रस्त झाडांचे अवशेष व बियाणाद्वारे स्क्लेरोटिया बुरशीच्या बिजाणूंचे वहन होणे अशा अनेक कारणांचा समावेश असतो.

या रोगाच्या बुरशीचे तंतू किंवा बिजाणू हे जमिनीत, झाडांच्या अवशेषांवर, यजमान पिके व गवतावर सुप्तावस्थेत पाच वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. पुढे वातावरण पोषक होताच त्यांची वेगाने वाढ होते. रोगाचा प्रादुर्भाव होताच २ ते ३ दिवसांत बुरशीजन्य धागे(मायसेलिअम)ची वाढ दिसून येते. त्यावर अनेक मोहरीसारखे बीजाणू तयार होतात.

नियंत्रणाचे उपाय

मागील वर्षातील रोगग्रस्त झाडांची संपूर्णपणे विल्हेवाट लावावी.

फेरपालटामध्ये रोगास बळी पडणाऱ्या पिकांची (उदा. वांगी, मका, भुईमूग, तूर, मूग, भेंडी, उडीद, हरभरा, मिरची, बटाटा, सोयाबीन सूर्यफूल, कोबी इ.) लागवड करू नये.

रोपवाटिकेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मातीचे निर्जंतुकीकरण करणे, प्रमाणित बियाणे वापरणे यावर भर द्यावा. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडणाऱ्या व शासनमान्य रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी.

रोपवाटिकेमध्ये जिथे रोपे ठेवली जातात, त्या जागेवर ब्लिचिंग पावडरच्या १० टक्के द्रावणाची फवारणी करावी. फरशी असल्यास ती या द्रावणाने पुसून घ्यावी.

लागवडीच्या अगोदर एकरी २.५ किलो ट्रायकोडर्मा, अधिक १०० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत एकत्र मिसळून संपूर्ण शेतामध्ये समप्रमाणात वापरावे.

बीजप्रक्रियेसाठी सुडोमोनास* या जैविक बुरशीनाशकाचा ५ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात वापर करावा.

शेतात दाट लागवड करू नये. हवा खेळती राहील, याची दक्षता घ्यावी.

लागवडीपूर्वी रोपांच्या मुळांवर सुडोमोनास* १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात प्रक्रिया करावी. या द्रावणामध्ये रोपांची मुळे १५-२० मिनिटे बुडवून ठेवावीत.

रोगाची लक्षणे दिसताच ट्रायकोडर्मा* व सुडोमोनास* या जैविक बुरशीनाशकांची २.५ किलो प्रति एकर या प्रमाणात ५-१० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा आळवणी करावी.

या बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीवर टेकलेल्या फळांना लगेच होतो. त्यामुळे झाडांची फळे खाली जमिनीला टेकणार नाहीत अशी व्यवस्थित बांधणी करावी.

रासायनिक बुरशीनाशके

रोपवाटिकेमध्ये पेरणीपूर्व बीजप्रक्रिया (प्रमाण प्रति किलो बियाणे) ः

कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम किंवा

थायरम ४ ग्रॅम

आळवणी (प्रमाण प्रतिलिटर पाणी)

थायोफिनेट मिथाईल २ ग्रॅम किंवा

थायोफिनेट मिथाईल (७०% डब्लूपी) ३ ग्रॅम.

टीप

या रोगासाठी फोसेटिल ए-एल* २ ग्रॅम, मेटॅलॅक्सिल (४%) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक)* ३ ग्रॅम प्रति लिटर या बुरशीनाशकांची आळवणी कृषी विद्यापीठाच्या संशोधनामध्ये प्रभावी आढळली आहे. तथापि त्यास ॲग्रेस्को शिफारस अद्याप मंजूर झालेली नाही. तसेच टोमॅटोसाठी त्यास लेबल क्लेमही नाही.

बीजप्रक्रियेसाठी प्रॉक्लोराझ (५.६ टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (१.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू इ.एस) (संयुक्त बुरशीनाशक) ०.३ मि.लि. प्रति किलो बियाणे या बुरशीनाशकाला या रोगाच्या नियंत्रणासाठी ढोबळी मिरचीत लेबल क्लेम आहे. मात्र टोमॅटोसाठी अद्याप लेबल क्लेम नाही. प्रयोगांमध्ये ट्रायकोडर्मा* व सुडोमोनास* या जैविक बुरशीनाशकांचा वापरही प्रभावी दिसून असला तरी त्यांना ॲग्रेस्को शिफारस प्राप्त झालेली नाही.

डॉ. संजय कोळसे (सहयोगी प्राध्यापक) ९८९०१६३०२१

डॉ. प्रवीण खैरे (संशोधन सहयोगी, हॉर्टसॅप प्रकल्प) ९६६५३०४४६७

वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

Eknath Shinde: एकनाथ शिंदे नाराज? रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत धुसफुस ?

Khandesh Water Crisis : पावसाअभावी प्रकल्पांतील आवक अल्प

Farmer's Jal Samadhi Protest : युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात गोदापात्रात आंदोलन

Pm Surya Ghar Yojana : ‘सूर्यघर’चा जिल्ह्यातील ८५३३ ग्राहकांना लाभ

SCROLL FOR NEXT