Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Seeds Market Rate : मका बियाणे दरात ३०० तर कांदा बियाण्यांत हजार रुपये वाढ

Maize and Onion Seeds : जिल्ह्यात तब्बल ४० टक्के क्षेत्रावर लागवड होणाऱ्या मक्याच्या बियाण्यांच्या चार किलोच्या पिशवीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. तर कांद्याच्या बियाण्यांतही १००० ते १५०० तर मूग, तूर, बाजरी या बियाण्यांतही ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : बियाणे कंपन्यांवर सरकारचा अंकुश आहे का? असा संतप्त सवाल करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात तब्बल ४० टक्के क्षेत्रावर लागवड होणाऱ्या मक्याच्या बियाण्यांच्या चार किलोच्या पिशवीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. याशिवाय कांद्याच्या बियाण्यांतही १००० ते १५०० तर मूग, तूर, बाजरी या बियाण्यांतही ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. निवडणूक संपली म्हणून शेतकऱ्यांची लूटमार सुरू झाली का? असा सवाल शेतकरी करत आहेत.

मागील सलग तीन ते चार वर्षे बियाण्यांच्या मोठ्या दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांवर पडला असून कंपन्यांच्या मनमानीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. दुष्काळ व शेतीमालाच्या कोसळलेल्या दराचा फटका बसल्याने संकटातील शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन व अर्थकारण विस्कळीत झाले आहे. त्यातच बियाणे व खते दरवाढीचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने शासनाच्या धोरणावर टीका होत आहे. जिल्ह्याचा पीक पॅटर्न मागील दोन-तीन वर्षांत बहुतांश बदलला असून खरिपात मक्याचा व सोयाबीनचा जिल्हा अशी ओळख तयार होऊ लागली आहे. यावर्षी देखील मक्यासह सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असून बेभरवशाचा कांदा देखील आहे तसाच राहील.

खरिपात जिल्ह्यात सुमारे ४५ ते ५० टक्के म्हणजेच दोन लाख ४० हजार हेक्टरवर मक्याचे पीक घेतले गेले आहे. मक्याला वाढलेली मागणी त्याबरोबरच दरातील होणाऱ्या वाढीमुळे मका जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाडके पीक बनत असून याचमुळे बियाण्याची मागणी वाढल्याने कंपन्यांनी बियाणे पिशवीमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ केली आहे. बाजारात बियाणे पुरवठा भरपूर आहे. खरिपाच्या तोंडावर बियाणे पिशव्या बाजारात विक्रीला असून यावर्षी चौदाशे ते दोन हजार रुपये दरम्यान किमती आहेत.

कांदा बियाणे महागले

शेतकरी शक्यतो शेतात डोंगळे लावून कांद्याचे बियाणे तयार करतात. यावर्षी शेतकऱ्यांकडे बियाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बाजारातील कंपन्यांच्या कांदा बियाण्यांतही यंदा मोठी वाढ झाली आहे. प्रतिकिलो सुमारे हजार ते पंधराशे रुपयांची वाढ झाली असून १२०० ते १४०० रुपयांना मिळणारे बियाण्यांचे पाकीट यावर्षी १७०० ते २१५० रुपयांना मिळणार आहे.

कपाशीच्या बीटी २ बियाण्यांची दरवाढ शासनाच्या मान्यतेने होत असून सलग तिसऱ्या वर्षी ११ रुपये वाढ झाल्याने एक किलोची पिशवी ८६४ रुपयांना मिळणार आहे. याशिवाय तूर, बाजरी, मूग बियाणे दरातही ५० ते १०० रुपांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीन पेरणी क्षेत्रही वाढले अन बियाण्यांच्या दरात मागील

वर्षी विक्रमी वाढ झाली होती. मागील दोन वर्षी सोयाबीनच्या दरात घट झाल्याने त्याचा परिणाम बियाण्यांच्या दरावर झाला असून यावर्षी ५०० ते ७०० रुपये दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल. मागील वर्षी सोयाबीनची पिशवी ३००० ते ३५०० रुपयांना मिळत होती. यावर्षी दर २२०० ते २७०० रुपयांवर आहे.

पावसाच्या आगमनावर पेरणीचे चित्र ठरेल. मात्र जिल्ह्यात सोयाबीन, मक्‍यासह बाजरीच्या क्षेत्रात वाढ होईल असे चित्र आहे. मागणी, बाजारभाव विचारात घेऊन बियाण्यांच्या दर स्थिर राहिले आहे. सोयाबीनच्या दरात ५०० ते ८०० रुपये घट झाली तर मकाला मागणी वाढत असल्याने ५०० रुपांतपर्यंत दरवाढ झाली आहे. कांद्यासह बाजरी बियाणे दरातही वाढ झाली.
नितीन काबरा, संचालक, द्वारका एजन्सी, येवला

बियाणे पाकिटांचे दर (रुपयांत) पीक यावर्षीचे दर (कंसात २०२३ चे दर) मका इलाईट १६०० (१५५०) मका पयोनियर २०५० (१७५०) मका ॲडव्हान्टा १७०० (१४५०) मका महिको १५०० (१३५०) मका बायर १६०० (१४००) मका बायोसीड १४०० (१३००) सोयाबीन महाबीज २७०० (३१००) सोयाबीन ईगल २५०० (३०००) सोयाबीन ग्रीन ३५००(३०००) सोयाबीन प्राईड २७०० (३०००) सोयाबीन फुलसंगम २४०० (२८००) कपाशी (महिको, अजित, महिको, निजीवुडू व सर्व) ८६४ (८५३) कांदा बियाणे (एलोरा, पंचगंगा, चव्हाण, ईस्टवेस्ट) १७०० ते २१५० (१४००)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT