डॉ. अरुण कुलकर्णी
फ्युचर्स किमतीः सप्ताह- २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी, २०२४
Soybean Market : एक फेब्रुवारी पासून NCDEX मध्ये मक्यासाठी जून २०२४ व हळदीसाठी ऑगस्ट २०२४ डिलीवरीचे व्यवहार सुरू झाले. यामुळे NCDEX मध्ये मक्यासाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलीवरीचे तर हळदीसाठी एप्रिल व जून डिलीवरीचे व्यवहार चालू आहेत. MCX मध्ये कापसासाठी मार्चचे तर कपाशीसाठी फेब्रुवारी व एप्रिलचे व्यवहार चालू आहेत.
NCDEX ने आता जाहीर केले आहे की यापुढे मक्याचे व हळदीचे नवीन ऑप्शन ट्रेडिंग चालू केले जाणार नाही. सध्या मक्यासाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलीवरीचे व हळदीसाठी एप्रिल व जून डिलीवरीचे ऑप्शन ट्रेडिंग चालू आहे; ते कायम राहील. थोडक्यात, जे काही फ्युचर्स मार्केटमध्ये थोडेफार चालू आहे तेपण आता बंद केले जात आहे. ही काही चांगली गोष्ट नाही.
या वर्षी सोयाबीनचे जागतिक उत्पादन १.०६ टक्क्यांनी व वर्ष-अखेर साठा १.१३ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. तसेच मागणीतील घसरण होत असल्याने सोयाबीनच्या किमती जागतिक स्तरावर घसरत आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान जागतिक किमती ९ टक्क्यांनी घसरल्या. तशीच परिस्थिती कापसाच्या बाबतीत आहे. या वर्षी कापसाचे जागतिक उत्पादन ०.५ टक्क्यांनी व वर्ष-अखेर साठा ३.८ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. युरोपमधील मागणी कमी होत आहे. यामुळे किमती कमी होण्याचा अंदाज केला जात आहे. या सर्वांचा भारतीय बाजारावर काही प्रमाणात परिणाम होत राहील. या सप्ताहात कापूस, हरभरा, सोयाबीन यांच्या किमती घसरल्या. तुरीच्या किमतीतील वाढीचा कल कायम राहिला. यंदा तुरीची आवक गेल्या वर्षापेक्षा कमी राहील असे दिसते. हळदीमधील तेजी कायम राहिली.
२ फेब्रुवारी २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १ टक्क्याने वाढून रु. ५८,००० वर आले आहेत. या सप्ताहात ते ०.७ टक्क्यांनी घसरून रु. ५५,६०० वर आले आहेत. मार्च फ्युचर्स भाव ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ५७,७४० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.१ टक्क्यांनी घसरून रु. १,३७६ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५३१ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ११.३ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा कमी आहेत पण फेब्रुवारी व एप्रिल भाव मात्र अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,२०० वर कायम आहेत. फ्युचर्स (फेब्रुवारी) किमती रु. २,२२१ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. २,२४८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ६.२ टक्क्यांनी वाढून रु. १३,८२९ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या पुनः १.१ टक्क्यांनी वाढून रु. १३,९८७ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती ३.६ टक्क्यांनी घसरून रु. १५,४३४ वर आल्या आहेत. जून किमती रु. १५,६४८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ११.९ टक्क्यांनी जास्त आहेत. या तेजीचा अजूनही फायदा करून घेत येईल.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात १.३ टक्क्यांनी घसरून रु. ५,६३५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.१ टक्क्यांनी वाढून रु. ८,९०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.
सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,७९८ वर आली होती. या सप्ताहात ती ३.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,६२१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ५.६ टक्क्यांनी वाढून रु. ९,२७५ वर आली होती. या सप्ताहात ती पुनः ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ९,५५८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीचा आवक हंगाम सुरू झाला आहे. २९ डिसेंबर पासून आवक वाढती आहे पण अजून ती गेल्या वर्षापेक्षा कमी आहे. या वर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने साठ्याची मागणीसुद्धा वाढली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.