Wedding Ceremoney
Wedding Ceremoney Agrowon
ॲग्रो विशेष

माहेर महिलांसाठी तीर्थक्षेत्र

टीम ॲग्रोवन

रामदास वाघ

जननी जन्मभूमीश्‍च स्वर्गादपि गरियसी, असे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. जननी आणि जन्मभूमी या दोन गोष्टी मानव जातीसाठी वंदनीय असतात. त्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील तीर्थक्षेत्रे असतात. बाहेरगावी नोकरी किंवा व्यवसायानिमित्त गेलेल्या माणसांचा ओढा गावाकडे जास्त असतो. गाव म्हणजे जन्मभूमी. माणसाला जन्मभूमीचे आकर्षण आयुष्यभर असते. जेथे भरतो दरा, तोच गाव खरा, असे जरी आपण म्हणत असलो; तरी तेथे जीव रमत नाही. मन थांबत नाही. मन जन्मभूमीकडेच धाव घेते.

जिवाला, आत्म्याला जन्मभूमीतल्या मातीची ओढ लागलेली असते. त्या मातीतील कणाकणांत आपल्या आयुष्याचे क्षण एकजीव झालेले असतात. तेथील झाडे, डोंगर, नदी, नाले, माणसे यांच्याशी आपल्या आत्म्याचे नाते जोडलेले असते. त्यामुळे कर्मभूमीत कितीही वैभव प्राप्त झाले, तरी जन्मभूमीशी असलेली नाळ तुटता तुटत नाही. जन्मभूमी आपली दुसरी आई असते. एक आई उदरातून जन्म देते, तर दुसरी आई उदरात सामावून घेते. मनुष्य कितीही वैभवाच्या शिखरावर विराजमान झाला, तरी त्याचे मस्तक माता आणि मातृभूमीच्या चरणांपाशीच नतमस्तक होते. मातृभूमी प्रत्येकाला प्राणापेक्षा प्रिय असते.

मातृभूमीला स्त्रियांनी माहेर हे दिलेले नाव किती यथार्थ आहे. माहेर शब्द कानावर पडताच स्त्रीच्या आयुष्यातील सप्तसुरांच्या तारा छेडल्या जातात. तिच्या रोमरोमात माहेरपण झऱ्याच्या पाण्याप्रमाणे खळखळ वाहू लागते. रिमझिम पावसात चिमण्या जशा पंख पसरवून आनंद लुटतात, तसेच तिचे मन पिसारा उभारून मोरासारखे नाचू लागते. माहेर तिला श्रावण सरींसारखे सुखद वाटते.

माहेरचे नाव कानावर पडताच ती आयुष्यातील सारी दुःखे विसरते. साऱ्या वेदनांचा तिला विसर पडतो. ती वेगळ्या विश्‍वात रममाण होते. सासुरवास विसरते. दारिद्र्याचे चटके विसरते. नवऱ्याचा जाच विसरते. तिचे मनपाखरू बालपणीच्या फुलझाडांवर विहार करू लागते. तिच्या मन वृक्षावरील पाखराला ती विनवणी करते. पाखरा जा माझ्या माहेरा, सांग माझ्या आईला की तुझी लाडकी लेक सुखात आहे म्हणून.

माहेर ही स्त्रीच्या आयुष्यातील खरे खुरे नंदनवन असते. लग्न होऊन ती सासरी येते, पण तिचे मन वायू वेगाने माहेराकडेच धाव घेत असते. तिचा जड देह सासरी असतो, पण तिचा आत्मा माहेरच्या मातीतल्या कणाकणात मिसळलेला असतो. तेथून मुक्त होण्याचं तो नावच घेत नाही. आईची तर तिला प्रत्येक क्षणी आठवण येते. सासरच्या धगीने जेव्हा ती अस्वस्थ होते, तेव्हा आई नावाच्या आभाळाशिवाय लेकीला कोण आठवणार? मग आठवतो तिला तो राकट चेहऱ्याचा, कोमल हृदयाचा, लेकीच्या विरहाने कोपऱ्यात बसून ढसाढसा रडणारा बाप.

पुन्हा पुन्हा किरकोळ गोष्टीवरून भांडणारी आणि क्षणार्धात अबोला विसरून एकत्र खेळणारी भावंडे तिला आठवतात. आमराईत दगड मारून कैऱ्या पाडणे, चिंचेच्या झाडावरून चिंचा पाडणे, शाळेच्या गॅदरिंगमध्ये यथेच्छ मौज लुटणे, सारे सारे तिला आठवते. सासरी येणारा माहेरचा कोणताही माणूस तिला आपुलकीचा सागर वाटतो. ती त्याला माहेरच्या नाना तऱ्हेच्या गोष्टी विचारून भंडावून सोडते आणि शेवटी सांगते, काका माझ्या आईला सांगा, की तुमची लेक सुखात आहे म्हणून.

हे सांगताना ती तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू लपवू शकत नाही. सासरी आल्यावर माहेरची आपुलकी चंद्राच्या कलांप्रमाणे वृद्धिंगत होत जाते. सासरी काही त्रास झाला तर तिचे मन माहेरचा धावा करू लागते. केव्हा माहेरी जाऊ आणि मनमोकळे करू अशी तिच्या मनाची घालमेल सुरू होते. सासुरवाशीण स्त्रीला माहेरचा जिव्हाळा म्हणजे साऱ्या त्रासापासून मुक्त करणारा रामबाण उपाय वाटतो.

दरवर्षी तिच्या माहेरहून निघालेली पंढरपूरला जाणारी पालखी तिच्या सासरवरून जाते. ती पालखी पाहून तिचे मन प्रफुल्लित होते. तिचे हात आपोआप जोडले जातात. तिचा तो श्रद्धा भाव पाहून चकित झालेला पती तिला विचारतो, प्रिये, तू हात कोणाला जोडत आहेस? तू कोणापुढे नतमस्तक होत आहेस? ती पतीला नम्रपणे, श्रद्धाळू मनाने उत्तर देते, धनी, ही माझ्या माहेरची पालखी आहे. तिच्यामध्ये विठ्ठल- रुक्मिणी विराजमान झालेले आहेत. ते दुसरे तिसरे कोणीच नसून, माझे मायबाप आहेत. तिच्या उत्तराने तिचा पती अवाक् होतो.

येथे तिचा श्रद्धा भाव दोन प्रकारे व्यक्त होतो. एक माता-पित्यांमध्ये परमेश्‍वराचे रूप पाहणे आणि दुसरे म्हणजे माहेराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे. पालखीचे भोई तिला देवदूत वाटतात. ती आदरभावे त्यांच्यापुढे नतमस्तक होते. देवाला आरती करते. त्यांची विचारपूस करते. त्यांना चहापाणी करते. माहेरच्या चार गोष्टी विचारते. ते निघून गेल्यावर ती स्वप्नात रममाण होते.

जुन्या दिवसांच्या सुखद आठवणींनी ती तिच्या मैत्रिणींसोबत हिंडू लागते, खेळू लागते, बागडू लागते. तिला मैत्रिणींसोबतचा भातुकलीचा खेळ आठवतो. बाहुलाबाहुलीचे लग्न आठवते. त्या करवल्या आठवतात. अक्षय तृतीयेची शंकर गवराईची गाणी तिला आठवतात. ती स्वप्नात इतकी तल्लीन होते की, शेजारी आपला पती उभा असल्याचेही तिला भान राहत नाही. तो म्हणतो प्रिये पालखी गेली! ती विनोदाने म्हणते, धनी मी पण माहेरी गेले!

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT