Mumbai News : विधानसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील आपले विक्रम तोडत महाविकास आघाडीची धूळधाण उडवत भाजपने तब्बल १३६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळविला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने आपले गड राखत पक्षावरील दावेदारी सिद्ध केली आहे.
भाजप आणि महायुतीच्या लाटेत शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे दिग्गज नेते या लाटेत पराभूत झाले असून २०१४ मध्ये मोदी लाटेत झालेल्या पराभवापेक्षाही मोठ्या पराभवाला तीनही पक्षांना सामोरे जावे लागले आहे.
हा पराभव अनाकलनीय आहे. कोरोना काळात ज्या महाराष्ट्राने माझी तळमळ ऐकली त्या महाराष्ट्राने असा कसा निकाल दिला याचा शोध घेत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथम विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याइतक्याही म्हणजे २९ जागा मिळालेल्या नाहीत. भाजप १३६, शिवसेना शिंदे गटाने ५६ तर अजित पवार गटाने ४१ जागांवर विजय मिळवत दणदणीत यश मिळविले. काँग्रेस २१, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष १४ तर शिवसेना ठाकरे गटाला १६ जागांवर समाधान मानावे लागले. तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे, बहुजन विकास आघाडी या लहान मोठ्या पक्षांचीही भाजपच्या लाटेत धूळधाण उडाली.
विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीतआधी आलेल्या कलांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला समान संधी असल्याचे अंदाज व्यक्त केले होते. त्यामुळे शुक्रवारी दोन्हीकडून सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर महायुतीचा वारू चौफेर उधळला तर महाविकास आघाडी ६० जागांच्या आतच थांबल्याचे समोर आले.
मागील पाच वर्षांतील अस्थिर सरकारमुळे विस्कळीत झालेली प्रशासकीय व्यवस्था, आरोप प्रत्यारोप आणि पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर योजना सिद्ध झाली. निवडणुकीआधी काही महिने जाहीर केलेली ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली आणि मध्य प्रदेशप्रमाणे एकतर्फी निकाल देत विरोधकांचे पानिपत केले.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने १०५ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी तीन पक्षांची महायुती असल्याने जागावाटपात अतिशय आक्रमकपणे १४९ जागांवर लढत भाजपने तब्बल १३६ जागांवर विजय मिळविला. तर त्यापाठोपाठा शिवसेनेच्या शिंदे गटाने ८१ जागांवर लढत दिली. त्यामध्ये ५६ जागांवर तर अजित पवार गटाने ५९ जागा लढवत ४१ जागांवर विजय मिळविला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचा गड असलेल्या कोकण विभागात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. कोकण आणि मुंबईत महायुतीला ५५ तर महाविकास आघाडीला १६ जागांवर आघाडी मिळाली. कोकणात निलेश आणि नितेश या राणे बंधूंना विजय मिळविला. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही निर्णायक विजय मिळविला. मुंबईत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, मनोज जामसूदकर यांनी विजय मिळविला.
विदर्भ आणि मराठवाड्यात निर्णायक विजय
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भाजपने काम केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. मराठवाड्यात जरांगे फॅक्टरला सुरूंग लावत ३८ जागांवर दणदणीत विजय मिळविला. केवळ ७ जागांवर महाविकास आघाडीने मतमोजणीत आघाडी घेतली. विदर्भात मागील निवडणुकीत काँग्रेसने पकड मजबूत केली होती. केवळ ३० जागांवर असलेल्या महायुतीने ४८ जागा जिंकल्या. तर केवळ १३ जागांवर महाविकास आघाडीला यश आले होते.
पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे पानिपत झाले. सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीने ४२ जागांवर निर्णायक आघाडी घेतली तर केवळ १२ जागांवर मविआने आघाडी घेतली. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, ऋतुराज पाटील, समरजित घाटगे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
उत्तर महाराष्ट्र महायुतीने काबीज केला असून ४१ जागा ताब्यात घेत मविआला केवळ ३ जागांवर रोखले आहे. गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांनी विजय मिळविला. कोकणात केवळ एका जागेवर ठाकरे गटाला विजय मिळविता आला. तर विदर्भावर भाजपने पकड घट्ट करत मोठा विजय मिळविला. महायुतीमध्ये सर्वात कमी जागा लढवून सर्वाधिक जागा जिंकून चांगला स्ट्राइक रेट मिळविण्यात अजित पवार गटाला १४५ हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला अवघ्या ९ जागांची आवश्यकता आहे. तर निकालानंतर लगेचच महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
मराठवाड्यात महायुती ३८ जागांवर
मराठवाड्यात जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकी महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत जरांगे यांच्या धरसोड वृत्तीचा मोठा फटका बसल्याचे समोर आले. महायुतीने तब्बल ३८ जागांवर विजय मिळविला. मराठवाड्यात मागील वेळी युतीला २६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी ४६ पैकी ३८ जागांवर महायुतीने निर्णायक आघाडी घेतली.
भाजप, अजित पवार गटाची सरशी
या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १४९ जागा लढवल्या. या पक्षाला तब्बल १३७ जागांवर निर्णायक आघाडी मिळाली. या पक्षाचा स्ट्राइक रेट ८९ टक्के तर अजित पवार गटाने ५९ जागा लढवून ४१ जागा जिंकल्या. या पक्षाचा स्ट्राइक रेट ७४. ५४ तर शिंदे गटाने ८१ जागा लढवून ५७ जागा जिंकल्या. शिंदे गटाचा स्ट्राइक रेट ७० टक्के राहिला. काँग्रेसने १०१ जागा लढवून २१, ठाकरे गटाने ९५ जागा लढवून १६ तर शरद पवार गटाने ८६ जागा लढवून केवळ १४ जागा जिंकल्याने त्यांना स्ट्राइक रेट अनुक्रमे २१,१७ आणि ११. ६२ टक्के राहिला.
पक्षीय बलाबल
भाजप १३३
शिवसेना ५७
राष्ट्रवादी काँग्रेस ४१
शिवसेना (उबाठा) २०
राष्ट्रीय काँग्रेस १५
राष्ट्रवादी काँग्रेस
(शरद पवार) १०
समाजवादी पक्ष २
अपक्ष आणि इतर १०
विकासाचा विजय, सुशासनाचा विजय, एकजूट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ. ‘रालोआ’ला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे, विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. जनतेला मी ग्वाही देतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील. जय महाराष्ट्र!नरेंद्र मोदी, पंतप्रधान
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.