Mahareshim Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरुवात

Mahareshim Campaign : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महारेशीम अभियानाला प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २१) सुरुवात करण्यात आली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्याला मंगळवारी (ता. २१) सुरुवात करण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महारेशीम अभियानाच्या प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

अभियान प्रारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना खेतमाळीस, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बि. डी. डेंगळे यांच्यासह जिल्हा रेशीम कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेशीम विभागाला ३५० एकर, कृषी विभागाला ४०० एकर तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ४०० एकर असे एकूण ११५० एकर क्षेत्रावर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

यापेक्षा दुप्पट तुती लागवड रेशीम संचालनालयाला अपेक्षित आहे. अभियानातून रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी व रेशीम उद्योगाबाबत प्रचार व प्रसिद्धी करणेसाठी तसेच आगामी वर्षात तुती लागवड करण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे.

महारेशीम अभियान २०२४ राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये रेशीम अभियानाअंतर्गत नवीन तुती लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्याची नोंदणी करणेसाठी व्यापक स्वरूपात मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तुती लागवड क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला रेशीम उद्योग असून जिल्ह्यातील हवामान याला पोषक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे.

योजनेअंतर्गत एक एकर रेशीम प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये तुती लागवड व जोपासनेसाठी ६८२ मनुष्य दिवस व कीटक संगोपनगृह बांधकामासाठी २१३ मनुष्य दिवस असे एकूण ८९५ मनुष्य दिवसांची मजुरी अकुशल घटकांअंतर्गत लाभार्थ्याला मस्टरद्वारे अदा केली जाते. त्याबरोबरच कीटक संगोपन साहित्य व कीटक संगोपनगृह बांधकाम साहित्य खरेदीसाठी कुशल घटकांअंतर्गत रक्कमही अदा करण्यात येते.

सदर योजेनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतः मजूर म्हणून स्वतःच्या शेतात काम करणे आवश्यक आहे. मनरेगा योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ या योजनेतून तुती लागवड, ठिबक सिंचन सुविधा, कीटक संगोपनगृह बांधकाम तसेच कीटक संगोपन साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. तुती लागवडीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी केले.

उद्दिष्ट मिळाले असले तरी त्यापुढे जाऊन रेशीम उद्योग विस्तार कसा करता येईल यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत.
डॉ. अरविंद लोखंडे, प्रभारी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT