Nagpur News : सेंद्रिय पद्धतीने पीक लागवडीमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर असून सेंद्रिय शेतीमाल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती नागपूर येथील प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्राचे संचालक डॉ. अजयसिंग राजपूत यांनी दिली. महाराष्ट्रातील सुमारे सात लाखांवर क्षेत्र नव्याने प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. राजपूत म्हणाले, की आरोग्याप्रति जागरूकता वाढीस लागल्याने कीटकनाशक अंश विरहित शेतीमालास जागतिकस्तरावर आणि देशाअंतर्गत मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारतातही सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतीने शेतीमाल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढती आहे.
देशभरातील सेंद्रिय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश राज्याने सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. २०२३-२४ या वर्षात ६ लाख १२ हजार ८१६ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली होते. ५ लाख ३५ हजार ४२०.३३ हेक्टर क्षेत्र नव्याने सेंद्रिय प्रमाणीकरण अंतर्गत प्रस्तावित आहे. मध्य प्रदेश पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.
महाराष्ट्रात २ लाख ६७ हजार २२९.२९ हेक्टर क्षेत्र प्रमाणीकरणाखाली आहे. ७ लाख ३३ हजार ८५१.०१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यानुसार महाराष्ट्रात सेंद्रिय प्रमाणीकरणाखालील क्षेत्र १० लाख ०१ हजार ०८०.३२ हेक्टरवर पोहोचणार आहे. त्यानंतर राजस्थान, गुजरात, ओडिसा, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, आंध प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, बिहार, तमिळनाडू, आसाम, छत्तीसगड, गोवा या राज्यांचा अनुक्रमे सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या यादीत समावेश होतो.
या यादीमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी दिल्ली राज्याचा समावेश आहे. दिल्लीमध्ये केवळ ५.१७ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली तर नव्याने प्रस्तावित ४.४४ हेक्टर क्षेत्र आहे. भारताचा विचार करता आतापर्यंतचे प्रमाणीकरणाखालील आणि नव्याने प्रस्तावित यानुसार ४४,७५,८३६.९० हेक्टर क्षेत्राचा पल्ला गाठला जाणार आहे. सद्यःस्थितीत तब्बल ३३ राज्यांमध्ये सेंद्रिय प्रमाणीकरणाची मोहीम गतिमान असल्याचे देखील डॉ. राजपूत यांनी सांगितले.
सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन...
सेंद्रिय प्रमाणीकरणाखालील क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असला तरी सेंद्रिय शेतीमाल उत्पादनात मात्र पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या वर्षात १०,४४,३८२.८८ टन सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन महाराष्ट्रात झाले. त्या पाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये ८,४९,७८२.७२ टन शेतीमालाचे उत्पादन झाल्याची माहिती डॉ. राजपूत यांनी दिली.
लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढीस लागली आहे. त्यामुळेच सेंद्रिय प्रमाणीकरणाखालील क्षेत्रही वाढते आहे. प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्राच्या कार्यकक्षेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दादर नगर हवेली या प्रदेशांचा समावेश होतो. सध्या सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाच्या क्षेत्रात मध्य प्रदेशची आघाडी असून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.- डॉ. अजयसिंग राजपूत, संचालक, प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्र, नागपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.