Na. Dho. Mahanor Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : उस्मानाबाद संमेलनानंतर महानोरांची पुन्हा भेट झालीच नाही !

Article by Indrajit Bhalerao : महानोर यांची शेवटची भेट झाली ती उस्मानाबाद साहित्य संमेलनात.

Team Agrowon

N D Mahanor : महानोर यांची शेवटची भेट झाली ती उस्मानाबाद साहित्य संमेलनात. ते खूप थकल्यासारखे वाटले. आम्ही ग्रंथप्रदर्शनात नेमके पॉप्युलरच्या बुक स्टॉल वर असताना महानोर तिथं आले. रेणू पाचपोर आणि मी सोबत होतो. महानोरांच्या पत्रांचा प्रकाश होळकर यांनी संपादित केलेला संग्रह, जो आधी साकेत प्रकाशनानं प्रकाशित केला होता, त्याची नवी आवृत्ती पॉप्युलरनं काढली होती. ती मी घेतली होती. त्यावर मी महानोरांची सही घेतली. तारीख आहे १० जानेवारी २०२०.

महानोरांचं प्रकाशित होणारं प्रत्येक पुस्तक तर मी घेतच होतो, पण प्रत्येक पुस्तकाच्या निघणाऱ्या नव्या आवृत्तीची प्रतदेखील मी आवर्जून घ्यायचो. जे काही त्यात किंचित थोडेफार बदल असायचे तेही आपल्याकडं असावेत असं मला वाटायचं. नाही तरी महानोरांच्या शब्दांवर जिवापाड प्रेम करत असल्यामुळं मी त्यांची पुस्तकं पुन्हा पुन्हा घेतलेली आहेत. लोकांना भेटही दिलेली आहेत. उस्मानाबाद संमेलनानंतर महानोरांची पुन्हा भेट झालीच नाही.

गेल्या काही दिवसांपासून महानोर आजारी होते. तीन-चार वर्षांपूर्वी सुलोचनाबाई गेल्यानंतर तर ते खचूनच गेले. नंतर त्यांनी उभारी धरलीच नाही. सारखा सुलोचनाबाईंचा ध्यास घेतला. त्या ध्यासातूनच त्यांनी त्यांच्या आठवणीचं ‘सुलोचनेच्या पाऊलखुणा’ पुस्तकंही लिहिलं. कारण त्या आठवणीमधून आणि सुलोचनाबाईमधून त्यांचं मन बाहेर पडायला तयारच नव्हतं. मला माझ्या काबाडाचे धनी या दीर्घ कवितेचा शेवट आठवू लागला. तिथं अचानक सोडून गेलेल्या बायकोच्या खाणाखुणा रानावनात शोधणारा शेतकरी मी चित्रित केलेला आहे.

सुलोचनाबाईंच्या जाण्यानंतर महानोरांचंही काहीसं तसंच झालेलं होतं. त्यांना कोणी भेटायला गेलं तरीही सुलोचनाबाईंच्याच आठवणीत ते रमून जाऊ लागले. त्या जिथं बसायच्या तिथं जाऊन बसायचे. त्यांच्या खोलीत आजारी अवस्थेत झोपायच्या ती जागा पुन्हा पुन्हा जाऊन पाहायचे. जणू काही सुलोचनाबाई अजून तिथं आहेतच. त्यांनी सुलोचनाबाईंच्या लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकालाही ‘सुलोचनेच्या पाऊलखुणा’ असंच नाव त्यांनी दिलं. सुलोचनाबाईंच्या जाण्यानं त्यांना फार मोठा धक्का बसलेला होता. त्यातून ते सावरलेच नाहीत. शेवटी ते सुलोचनाबाईंकडे निघून गेले.

पूर्वी महानोर एकटेच कार्यक्रम करत फिरायचे. पण मागच्या काही वर्षांपासून सुलोचनाबाई त्यांच्या सोबत जाऊ लागल्या. कदाचित त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठीच त्या सोबत जात असाव्यात. आपल्या संस्कृतीत पत्नीने शेवटपर्यंत साथ द्यायची असते. त्यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे असं या जुन्या बायांना वाटत असे. एका बाजूनं हे असं वाटत असतानाच दुसऱ्या बाजूनं ‘अहेव मरण’ यावं अशीही त्यांची इच्छा असायची.

दोनही पातळ्यांवर त्यांची तयारी असायची. पण जिवंत असू तोपर्यंत पती सेवेशिवाय अन्य काही नाही, हे त्यांच्या मनात पक्कं असायचं. सुलोचनाबाईंनीही महानोरांची अथक सेवा केली. सुलोचनाबाई गेल्यानंतर अवतीभोवती खूप गोतावळा असूनही त्यामुळंच महानोर एकटे पडले. एकाकी झाले. त्यांना कोणी कितीही समजून सांगू लागला तरी ते फारसं आत उतरेनासं झालं. आता जगायचं नाही असा जणू त्यांनी निश्‍चयच केलेला होता. या सगळ्या गोष्टींचा शेवट त्यांच्या मृत्यूतच झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT