Na. Dho. Mahanor
Na. Dho. MahanorAgrowon

Indrajit Bhalerao : महानोर रोमॅंटिक परंपरेतले, तर मी  वास्तववादी परंपरेतला - भालेराव

Article by Indrajit Bhalerao : संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी महानोर यांची प्रकट मुलाखत होती. त्या वेळी मंडपात प्रचंड गर्दी झालेली होती. महानोर यांना ऐकायला लोक उत्सुक होते.
Published on

इंद्रजित भालेराव

Na. Dho. Mahanor : १९९४ मध्ये महानोर यांची गाणी असलेला ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट आला आणि पुन्हा एकदा महानोरांच्या गाण्याने मराठी रसिकांना झपाटलं. पु. ल. देशपांडे यांनी पटकथा लिहिलेला हा चित्रपट जब्बार पटेल यांनीच दिग्दर्शित केलेला होता. लावणी नर्तिकेच्या जीवनावरील या चित्रपटात महानोर यांनी दहा लावण्या आणि इतरही काही महत्त्वाची गाणी लिहिली होती. ज्यात भूपाळी, अंगाई इत्यादींचा समावेश होता. ही सर्वच गाणी झपाटून टाकणारी होती.

‘जैत रे जैत’प्रमाणेच पुन्हा एकदा ‘विदूषक’च्या गाण्यांनी अख्या महाराष्ट्राला झपाटलं. या वेळी संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. अगदी हृदयनाथांनी जसा महानोरांच्या शब्दांना न्याय दिला, तसाच न्याय मोडका यांनीही दिला. मोडक यांनी याआधीही महानोरांच्या मुक्ता आणि दोघी या चित्रपटांना संगीत दिलेलं होतं. पण या दोन्ही चित्रपटांत मोजकीच गाणी होती. त्यामुळं त्यांचा फार प्रभाव जनमनावर पडला नाही.

पण ‘विदूषक’मधल्या दहा लावण्या आशा भोसले यांच्या चिरतरुण आवाजानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि रानावनात नेऊन पोहोचवल्या. या गाण्यांची सीडी बाजारात आली, तेव्हा आम्हाला कोण आनंद झाला. घरी आणि प्रवासातही गाडीत सतत हीच गाणी आम्ही ऐकत असू. प्राध्यापक झाल्यामुळे आता मला संगीत ऐकण्यासाठी असली भारी साधनं घ्यायला काहीच अडचण नव्हती. मी चांगल्यात चांगले टेप, डेक घेऊन या गाण्यांचा आनंद घेत होतो.

१९९५ मध्ये परभणीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असं निश्‍चित झालं. त्यानिमित्ताने विवेक मासिकानं संमेलन विशेषांक काढला. त्यात मला ग्रामीण साहित्य चळवळीवर लिहायला सांगितलं. तोपर्यंत मी बऱ्यापैकी महानोरांकडं झुकलेला होतो. ग्रामीण साहित्य परिषदेनं भ्रमनिरास केलेला होता. त्यामुळे मी त्या लेखात ग्रामीण साहित्य परिषदेवर टीकात्मक लिहिलं. आणि याच ग्रामीण साहित्य परिषदेसाठी एकेकाळी महानोरांना दुखावलं याचा पश्‍चात्तापही व्यक्त केला. परभणीच्या साहित्य संमेलनाला महानोर यांना निमंत्रण होतंच.

Na. Dho. Mahanor
Indrajit Bhalerao : महानोर आणि आनंद यादव यांच्यात मैत्री होती का ?

रात्री होणाऱ्या कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सूत्रसंचालन माझ्याकडं होतं. महानोरांच्या अनेक कविता मला पाठ असल्यामुळं बहुतेक त्यांच्या कवितेच्या आधारानं मी सूत्रसंचालन केलं. त्यामुळे तेही आनंदी दिसत होते. रात्री खूप उशिरा हे कवी संमेलन संपलं. त्याचे खूप चांगले वृत्तांत सर्व माध्यमांतून आले.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी महानोर यांची प्रकट मुलाखत होती. त्या वेळी मंडपात प्रचंड गर्दी झालेली होती. महानोर यांना ऐकायला लोक उत्सुक होते. महानोर यांची ही मुलाखत चंद्रकांत पाटील, रवींद्र किंबहुने, कल्याणी दिवेकर आणि मी अशी चौघांनी मिळून घेतली. मुलाखत खूप रंगली. अर्थात, महानोर यांनी ती रंगवली. महानोर खूप खुश होते. ते तीनही दिवस संमेलनात थांबले. समारोपात आम्ही त्यांचे आवडते कवी ना. घ. देशपांडे यांचा गौरव ठेवला होता.

महानोर आणि माझे संबंध परभणीच्या या संमेलनामुळं पुन्हा नव्यानं चांगले जुळून आले होते. पण संमेलनानंतरच्या पुढच्या रविवारी अचानक त्यात पुन्हा मिठाचा खडा पडला. महानोरांच्या मुलाखतीवर अशोक जैन यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रचंड विरोधी लिहिलं. ते लिहिताना संमेलनादरम्यान मी संपादित केलेल्या ‘समग्र बी. रघुनाथ’च्या प्रस्तावनेतील माझ्या उताऱ्यांचा उपयोग केला. त्यात बी. रघुनाथ यांच्या कवितेचा महानोर यांच्यावर कसा प्रभाव आहे हे ओघानं मी सहज लिहून गेलो होतो.

त्यासाठी बी. रघुनाथ आणि महानोर यांच्या ओळी आमने-सामने ठेवल्या होत्या. त्याचा अर्थ वाङ्‍मयचौर्य असा काढून जैन यांनी माझ्या हवाल्यानं महानोरांना बऱ्यापैकी धुतलं. मुलाखतीतले आणखीही काही मुद्दे घेऊन महानोरांना खूप झोडपलं. मागं एकदा नारायण आठवले यांनी आणि दुसऱ्यांदा अशोक जैन यांनी माझ्या मनातही नसलेल्या गोष्टी नकळतपणे लिहिल्या. अर्थातच त्याला माझा नाइलाज होता.

Na. Dho. Mahanor
Indrajit Bhalerao : महानोर शेतीत का रमले ?

महानोर खेड्यावर लिहिणारे, मीही शेतकऱ्यांवर लिहिणारा; पण दोघांचे प्रकृतिधर्म परस्परविरोधी. महानोर हे रोमँटिक परंपरेतले, तर मी वास्तववादी परंपरेतला. त्यामुळं वाचक नकळतपणे आम्हाला एकमेकांचे विरोधक म्हणूनच पाहत होते. त्याला आमच्या दोघांचाही नाइलाज होता. लेखक-कवींना एकतर पूर्णपणे आपल्याकडं ओढणं किंवा पूर्णपणे दुसऱ्याकडं लोटणं असं रसिक नेहमीच करत आलेले आहेत.

१९९७ मध्ये महानोरांचा पानझड हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. हा कवितासंग्रह मी नगरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घेतला होता. तशी नोंद माझ्या जवळच्या प्रतीत आहे. त्या साहित्य संमेलनात रात्रीच्या मुख्य कवी संमेलनाचे अध्यक्ष महानोर होते. आणि तिथंही सूत्रसंचालन माझ्याकडं होतं. पानझड या कवितासंग्रहातली महानोरांची कविता पुन्हा गीताच्या वळणावर गेली. मागच्या दहा वर्षांत महानोरांनी विविध चित्रपटांसाठी लिहिलेल्या गीतांचा हा प्रामुख्यानं संग्रह होता. ‘प्रार्थना दयाघना''मधल्या कवितेनं नाराज झालेल्या महानोरांच्या आधीच्या चाहत्यांना या कविता खूप आवडल्या.

नेमक्या याच संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यामुळं मधल्या काळात थोडे मागे पडलेले महानोर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले. १९९० ते ९५ हा महानोर यांच्या आयुष्यातला अत्यंत वाईट कालखंड होता असं त्यांच्या मित्रांनी लिहून ठेवलेलं आहे. कारण या काळात त्यांचे कौटुंबिक संघर्षही निर्माण झाले होते. साहित्यिक संघर्ष तर सुरूच होते. पण याच प्रतिकूल कालखंडात त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री या सन्मानाने सन्मानित केलं होतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com