Step by step nadep compost method. Agrowon
ॲग्रो विशेष

NADEP Compost: घरच्या घरी कमी खर्चात कंपोस्ट बनवण्याची नाडेप पद्धत

Compost Making At Home: नाडेप कंपोस्ट खत हे पोषकद्रव्यांनी समृद्ध खत असते. ते कमी कालावधी आणि कमी खर्चात तयार होणारे खत आहे. शेतकरी नाडेप पद्धतीने कंपोस्ट बनवून घरच्या घरी अन्नद्रव्यांचा उत्तम स्त्रोत असणारे कंपोस्ट बनवू शकतात.

Swarali Pawar

Organic Farming Method: सेंद्रिय शेतीचे महत्त्व ओळखून अनेक शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर देतात. उन्हाळी हंगामात खरिपासाठी खत बनवण्याची तयारी चालू होते. यामध्ये नाडेप कंपोस्ट खत हे पोषकद्रव्यांनी समृद्ध खत असते. ते कमी कालावधी आणि कमी खर्चात तयार होणारे खत आहे. शेतकरी नाडेप पद्धतीने कंपोस्ट बनवून घरच्या घरी अन्नद्रव्यांचा उत्तम स्त्रोत असणारे कंपोस्ट बनवू शकतात.

कंपोस्ट बनवण्याची नाडेप पद्धत सर्वप्रथम श्री. नारायण देवराव पंढरीपांडे यांनी शोधून काढली. ही पद्धत पश्चिम भारतातील शेतकऱ्यांमध्ये बरीच लोकप्रिय झाली. कोरडवाहू परिस्थितीत सेंद्रिय खते मोठी भूमिका बजावतात. विशेषतः पशुधन नसलेल्या परंतु पीक घेणाऱ्या कुटुंबांसाठी शेणखताला एक चांगला पर्याय म्हणून कंपोस्टिंगची नाडेप पद्धत फायदेशीर आहे.

नाडेप कंपोस्ट टाकीसाठी जागेची निवड

नाडेप पद्धतीमध्ये मातीच्या किंवा चिकणमातीच्या विटांनी किंवा सिमेंटच्या ठोकळ्यांनी बनवलेल्या कायमस्वरूपी टाकीचा वापर केला जातो. त्यामुळे, टाकीसाठी कायमस्वरूपी जागा काळजीपूर्वक निवडणे महत्त्वाचे आहे.

टाकीचे बांधकाम

नाडेप टाकीचे आतील आकारमान ३ मीटर लांब, २ मीटर रुंद व १ मीटर उंच असावे.

या आकाराच्या टाकीसाठी १२०-१५० मातीच्या विटा, ५० किलो वजनाच्या सिमेंटच्या ४ गोण्या आणि वाळूचे दोन बॉक्स लागतात. तळ मजबूत करण्यासाठी पाच लोखंडी सळ्या वापरणे फायदेशीर ठरते.

टाकीचे बांधकाम अशा प्रकारची रचना माहित असलेल्या योग्य गवंड्याकडून करून घेतले पाहिजे.

टाकीचा तळ जमिनीवर विटा किंवा ठोकळे रचून आणि त्यावर सिमेंटचा थर देऊन बनवावा.

हवा खेळती राहण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे, चारही भिंतींमध्ये विटा किंवा ठोकळ्यांच्या मध्ये छिद्रांच्या किंवा फटींच्या तीन ओळी बनवाव्या.

टाकी बांधून झाल्यावर ताजा शेणाचा काला करून भिंती आणि तळ गिलाव्याप्रमाणे सारवून घ्यावे व सुकण्यासाठी ठेवून द्यावी.

कंपोस्टसाठी साहित्य

परिसरात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ उदा. पिकांचे अवशेष, धसकटे, पालापाचोळा, पाचट, काड, शेण, गोठ्यातील सरव, मुत्र मिश्रित सर्व टाकाऊ सेंद्रिय पदार्थ, स्वयंपाक घरातील कचरा, कारखान्यातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ आणि शहरातील काडीकचरा यापासून नाडेप पध्दतीमध्ये उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.

नाडेप कंपोस्ट टाकी भरण्याची प्रकिया

१. सुके आणि हिरवे वनस्पतीजन्य पदार्थ १४००-१५०० किलो लागतील. जनावरांना चारा दिल्यानंतर उरलेले गवत, वाळलेले गवत किंवा पेंढा, किंवा खराब झालेले सेंद्रिय पदार्थ यासाठी वापरावेत.

२. गाईचे शेण किंवा अर्धवट वाळलेली बायो स्लरी (बायोगॅस डायजेस्टरमधून बाहेर पडणारा पदार्थ) ९०-१०० किलो.

३. जनावरांचे गोठे, गटारे, पायवाटा इत्यादी साफ करून गोळा केलेली सुकी माती १७५० किलो लागेल. लोखंडी तुकडे, प्लास्टिक, काच, दगड इत्यादी काढून टाकण्यासाठी माती चाळणीने चाळून घ्यावी.

४. पाण्याचे प्रमाण ऋतूनुसार आणि उपलब्ध असलेल्या सुक्या व हिरव्या वनस्पतींच्या प्रमाणावर अवलंबून असते. तथापि, साधारणपणे वनस्पतींच्या प्रमाणातच पाण्याची गरज असते, म्हणजेच १४००-१५०० लिटर.

५. जनावरांचे मूत्र उपलब्ध असल्यास १ भाग मूत्र आणि १० भाग पाणी या प्रमाणात एकजीव करून ठेवावे.

६. टाकी भरायला सुरुवात करण्यापूर्वी, पाण्यात ताजे शेण मिसळून बनवलेल्या मिश्रणाने टाकीच्या बाजू आणि तळ पूर्णपणे ओले करावेत.

७. नाडेप टाकी भरण्यासाठी तीन थर असतात.

पहिला थर: १०० ते १५० किलो सुक्या किंवा सुक्या आणि हिरव्या वनस्पतीजन्य पदार्थांचे मिश्रण वापरून कडेला १५ ते २५ सेमी जाड आणि मध्यभागी किंचित जास्त जाड थर तयार करावा.

दुसरा थर: २५ ते ५० लिटर पाण्यात ४ किलो शेण किंवा १० किलो ताजी बायोगॅस स्लरी मिसळावी आणि वनस्पतींच्या भागांवर शिंपडा किंवा पसरा जेणेकरून ते पूर्णपणे ओले होतील.

तिसरा थर: ओल्या वनस्पती कचऱ्याच्या आणि शेणाच्या किंवा स्लरीच्या थरावर ५० ते ६० किलो स्वच्छ, चाळलेली वरची माती घालावी.

८. हे तीन थर क्रमाने लावून, सँडविचप्रमाणे टाकी भरणे सुरू ठेवा. टाकीच्या कडेच्या भागांपेक्षा मध्यभागी जास्त साहित्य भरावे. यामुळे भरलेल्या टाकीला घुमटासारखा आकार येईल आणि तिचा मध्यभाग कडेच्या भागांपेक्षा ३० ते ५० सेमी उंच होईल.

९. वनस्पतीजन्य पदार्थांच्या शेवटच्या थरावर ७ ते ८ सेंमी जाडीचा मातीचा थर घाला. शेणाचा लेप तयार करून माती अशा प्रकारे झाका की भेगा दिसणार नाहीत. भरलेल्या टाकीचे तोंड प्लास्टिकने देखील झाकता येते, विशेषतः पावसाळ्यात कंपोस्ट बनवण्याच्या प्रक्रियेचे संरक्षण करण्यासाठी.

१०. टाकी भरल्यानंतर, तिच्या भिंतींमधील फटींमधून टाकीत एक काठी घालून कंपोस्ट तयार होण्याच्या प्रगतीची चाचणी करता येते. शाळा किंवा कृषी महाविद्यालयात, विद्यार्थीचे एक लांब थर्मामीटर, उदा. मातीचे थर्मामीटर, आत घालून तापमानातील बदलांवर लक्ष ठेवू शकतो.

११. कंपोस्ट बनवण्याच्या प्रक्रियेत पदार्थांचे विघटन होत असताना, भरलेल्या टाकीचा वरचा भाग टाकीच्या बाजूंच्या खाली आकुंचन पावेल.

नाडेप कंपोस्ट बनवताना घ्यावयाची काळजी

१. टाकीमधील पदार्थ ओलसर ठेवावे, म्हणजेच त्यातील आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ६० टक्के ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी ६ ते ७ दिवसाच्या अंतराने पाणी टाकावे.

३. टाकीच्या वरच्या बाजूला असलेल्या मातीच्या प्लास्टरचा थराला भेगा पडल्यास त्या शेणाने लिंपून घ्यावा.

४. पृष्ठभागावर तण वाढू लागल्यास ते उपटून टाका, कारण त्यांची मुळे आच्छादनाला नुकसान पोहोचवू शकतात आणि कंपोस्टमधील पाणी व अन्नद्रव्य शोषून घेऊ शकतात.

५. उन्हाळ्यात वातावरण खूप कोरडे आणि उष्ण झाल्यास टाकीच्या भिंतींमधील फटींमधून पाणी फवारले जाऊ शकते.

डॉ. अतिश पाटील, ९९२२८१७९१८

मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, धुळे

White Grub in Sugarcane: हुमणी अळी नियंत्रणासाठी कॉम्बो ट्रॅप प्रभावी; थोरात

Swayamsiddha Award: उद्योजिका शिल्पा बुराड यांचा ‘पंदेकृवि’कडून सन्मान

Farmers Protest: सरकारकडून जाहीर मदत तुटपुंजी, आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचा व्यापक लढ्याचा निर्णय

Agrowon Podcast: मक्याचा भाव दबावातच; सोयाबीनमध्ये वाढ, कापसाला उठाव, गवार तेजीत, तर गव्हाची आवक वाढली

Unseasonal Rain Damage: नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

SCROLL FOR NEXT