Cotton Farming Agrowon`
ॲग्रो विशेष

BT Cotton Cultivation : कमी खर्चातील बीटी कपाशी लागवड तंत्रज्ञान

प्रा. जितेंद्र दुर्गे

Cotton Production : आपल्याकडे अनेक ठिकाणी भारी, काळ्या कसदार जमिनींमध्ये कपाशीची लागवड केली जाते. अशा जमिनीमध्ये जास्त पाऊस किंवा ओलिताच्या अतिरिक्त पाण्याचा योग्यपणे निचरा करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी लागवडीपासूनच योग्य ते बदल केल्यास बियाणे बचत साधण्यासोबतच निचऱ्याची समस्याही सुटण्यास मदत होते.

प्रचलित लागवड पद्धत

बीटी कपाशीची लागवड करताना शेतकरी दोन ओळींतील अंतर जास्त (साधारणत: ३.५ ते ४.० फूट) व दोन झाडांतील अंतर कमी (साधारण १.० ते १.५ फूट) ठेवतात. यात प्रति एकरी सर्वसाधारणपणे सव्वादोन ते चार पाकिटे बियाणे शेतकरी वापरतात. याकरिता शेताच्या लागवड करावयाच्या दिशेने एकाच बाजून संपूर्ण शेतात ३.५ ते ४.० फुटी काकरीने हलक्या सऱ्या पाडून घेतात.

त्यानंतर मजुरांद्वारे दोन झाडातील ठरविलेल्या अंतरानुसार टोकण अथवा तारफुली पद्धतीने बीटी कपाशीचे बियाणे लावतात. त्यात मजुरांकडून टोकण मागेपुढे होते. एका ठिकाणी कधी दोन ते तीन बी लावले जाते. परिणामी, दोन झाडातील अंतर एकसमान राहत नाही. खरेतर यात महागड्या बियाण्याचा अपव्यय होतो.

मजुरांची टंचाई असलेले शेतकरी बैलजोडीने सरत्याच्या साह्याने अथवा ट्रॅक्टरनेही बीटी कपाशीची पेरणी करतात. त्यांना एकरी खूप जास्त (म्हणजेच तीन - चार पाकिटे) बियाणे लागते. पुढे दोन झाडांतील अंतर योग्य राखण्यासाठी विरळणीचे काम वाढते. म्हणजेच बियाणांच्या खर्चासह मजुरांचाही खर्च वाढतो. त्यासाठी आज आपण नावीन्यपूर्ण सुधारित पद्धतीने लागवड करण्याविषयी माहिती घेऊ.

प्रचलित विषम लागवड पद्धतीचे तोटे

बीटी बियाण्याचा अपव्यय व बियाणे खर्चात वाढ.

उभ्या पिकातील मशागत किंवा डवरणी करताना केवळ एकाच दिशेने (लागवडीच्या दिशेने) डवरणी करता येते. उभे आडवे डवऱ्याचे फेर देता येत नाहीत.

ओळीतील झाडांमधील तण काढण्यासाठी निंदणी अथवा तणनाशकाची फवारणी करावीच लागते. खर्चात वाढ होते.

पीक संरक्षणाच्या फवारणीसुद्धा एकाच म्हणजेच लागवड केलेल्या दिशेनेच करता येतात. उभी - आडवी फवारणी शक्य होत नाही.

टोकणीमध्ये अंतर कमी जास्त झाल्यामुळे ओळीतील झाडे दाट राहून रस शोषक किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

पीक दाटल्यास पुढे वेचणी व्यवस्थित करण्यात अडचणी येतात. मजुरी खर्चात वाढ होते, कपाशी वेचणीचे वेळी फांद्या तुटतात. कपाशीचा दर्जा व प्रत राखण्यास अडचण येते.

पीक दाटलेल्या अवस्थेत पावसाच्या खंडामध्ये पाटपाणी किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी देताना अडचणी येतात.

पिकाच्या निगराणी, निरीक्षणामध्ये अडचणी उद्भवतात.

चौफुली पद्धतीने आयताकृती लागवड

चौफुली पद्धतीत आयताकृती लागवड करण्यासाठी शेताच्या एका बाजूने उदा. ३.५ ते ४ फुटी काकरीने उभे काकर म्हणजेच हलक्या सऱ्या पाडाव्यात. यानंतर सोयाबीनच्या सव्वा ते दीड फुटी काकरीने शेताच्या दुसऱ्या बाजूने आडवे काकर पाडून घ्यावेत.

म्हणजेच शेतात ३.५ ते ४ फूट × सव्वा ते दीड फूट याप्रमाणे आयताकृती चौफुल्या तयार होतील. यानंतर मजुरांद्वारे प्रत्येक चौफुलीवर एका ठिकाणी बीटी कपाशीचे केवळ एकच बी लावावे. यामुळे एकरी साधारणत: अर्धा ते पाऊण पाकिटाची बचत शक्य होते.

जोडओळ पद्धती

बीटी कपाशीची जोडओळ पद्धतीने लागवड करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. जोडओळीचा अवलंब करताना जमिनीचा प्रकार, वाण व त्याच्या वाढीचा प्रकार, सिंचन पद्धत (कोरडवाहू अथवा अन्य) अशा बाबी लक्षात घेऊन दोन ओळीतील अंतर कमी करावे. तसे काकरीने उभे काकर पाडावेत.

समजा प्रचलीत पद्धतीने आपण ४ फूट × १.५ फूट अशी लागवड करत असल्यास, याठिकाणी आपल्याला दोन ओळींतील अंतर कमी करताना साधारणत: तीन फूट राखावे लागेल. म्हणजेच उभे काकर आपल्याला तीन फुटी काकरीने व आडवे काकर सोयाबीनच्या सव्वा ते दीड फुटी काकरीने पाडावे लागते. शेतात तीन फूट × सव्वा ते दीड फूट याप्रमाणे आयताकृती चौफुल्या तयार होतील.

यानंतर बीटी कपाशीची टोकण करताना दोन ओळी डोबल्यानंतर प्रत्येक तिसरी ओळ न डोबता खाली ठेवावी. म्हणजेच शेतात जोडओळीत लागवड होईल. म्हणजेच दोन ओळीतील अंतर ३ फूट, दोन जोड ओळीतील अंतर ६ फूट, दोन ओळींतील अंतर ३ फूट याप्रमाणे शेतात लागवड होईल. जोडओळ पद्धतीसाठी दोन ओळींतील अंतर कमी करताना झाडांची संख्या सरासरीच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करावा.

आयताकृती चौफुली आणि जोडओळ पद्धतीचे फायदे

बियाणे, खते व त्यांच्या खर्चात बचत.

सुरुवातीचे साधारणत: ४ ते ५ डवऱ्याचे उभे आडवे फेर देता येतात. त्यामुळे ओळीतील दोन झाडांमधील तणांचा बंदोबस्त होतो.

पीक संरक्षणासाठी उभी, आडवी फवारणी करता येते.

वेचणी सुलभरीत्या करता येत असल्याने वेचणी खर्चात बचत शक्य होते.

कपाशीची गुणवत्ता, दर्जा राखण्यात मदत होते.

पिकाची योग्य वेळी योग्यप्रकारे निगराणी, निरीक्षण शक्य होते. संपूर्ण शेतात फेरफटका मारता येतो.

मूलस्थानी जलसंधारणासाठी मृत सरी अत्यावश्यक

आपण बीटी कपाशी लागवडीसाठी कोणतीही पद्धत वापरणार असलो तरी त्यात मूलस्थानी जलसंधारणाच्या दृष्टीने मृत सरी काढलीच पाहिजे. त्याचा फायदा कमी पावसाच्या स्थितीत शेतात पडलेल्या पावसाचे मूलस्थानी संवर्धनासाठी होतो.

तसेच जास्त पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा किंवा ओलितामध्ये अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी होतो. त्यासाठी डवऱ्याचे सुरुवातीचे ३ ते ४ उभे - आडवे फेर मारून घ्यावेत. त्यानंतर दोन ओळीमधील जागेत मधोमध डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात. हे काम बीटी कपाशीचे पीक साधारणत: ५०-६० दिवसांचे असताना करता येते.

नावीन्यपूर्ण सुधारित जोडओळ पद्धतीमध्ये दोन जोडओळीमधील जागेत म्हणजेच ६ फुटाच्या पट्ट्याच्या मधोमध डवऱ्याच्या अथवा वखराच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून मृत सरी पाडून घेता येते. काही वेळेस वाणाचा कालावधी आणि वाढीच्या प्रकारानुसार, दोन झाडातील अंतर सव्वा ते दीड फूट ठेवलेले असल्यास झाडांच्या वाढीमुळे आडवी डवरणी चालत नाही. अशा वेळी डवऱ्याचा फेर आटोपल्यानंतर लगेचच दोन ओळींमधील अथवा दोन जोडओळींमधील जागेत मधोमध मृत सरी काढून घ्यावी.

खोल व अरुंद अशी मृतसरी काढण्यासाठी शक्यतो डवऱ्याचाच वापर करावा. यासाठी वखराचा वापर करू नये. वखरामुळे मृतसरी जास्त रुंद होते. त्यामुळे कपाशीचे पीक गादीवाफ्यावर येते. वखराने खोल व रुंद सरी पाडल्यास त्यानंतर आलेल्या मोठ्या पावसामध्ये कपाशी लोळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

प्रा. जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

(सहयोगी प्राध्यापक-कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT