भीमाशंकर बेरुळे
बऱ्याच ७/१२ वर खातेदाराच्या नावापुढे ‘ए.कु.क.’ अशी नोंद दिसून येते. ‘ए.कु.क.’ म्हणजे ‘एकत्र कुटुंब कर्ता’ होय. अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाटणी संदर्भात मोठ्या प्रमाणात संधिग्धता असल्याचे दिसून येते.
शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यानंतर शेतकरी गाव कामगार तलाठी यांच्याकडे येऊन शेतजमिनीची विभाजन करून देण्याची मागणी करतात, तेव्हा तलाठी हे नोंदणीकृत वाटणी पत्र, न्यायालयाचा वाटणीबाबतचा आदेश किंवा तहसीलदार यांच्या आदेशाची मागणी करतात.
अशा परिस्थिती वाटणीबाबत कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत हे पाहणे गरजेचे आहे. वाटणी ही कोणत्या मालमत्तेच्या होऊ शकतात हे महत्त्वाचे आहे. वाटणी ही संयुक्त/एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीच्या वाटणी करता येईल. मग संयुक्त कुटुंब म्हणजे काय व संयुक्त कुटुंबाच्या मिळकतीच्या विभाजनाची कायदेशीर पद्धत काय आहे. हे आपण या लेखात पाहणार आहोत.
एकत्रित हिंदू कुटुंब ही संकल्पना हिंदू समाजात अति प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भारतीय समाजात एकत्रित कुटुंबपद्धती फार पूर्वीपासून प्रचलित आहे. एकत्रित कुटुंब हे आपल्या समाजाचे ठळक वैशिष्ट्य आहे. एकत्रित हिंदू कुटुंब हे मालमत्ता, भोजन व उपासना यात एकत्र असते.
एकत्रित संपत्ती असणे हे एकत्रित कुटुंबासाठी आवश्यक नाही. संपत्ती नसलेले एकत्रित कुटुंबसुद्धा असू शकतात. एकत्रित संपत्ती असलेल्या एकत्रित कुटुंबात, संपत्तीचे विभाजन झाल्यावर, कुटुंबाचे संयुक्त स्वरूप संपुष्टात येते. प्राचीन काळापासून मोठ्या कुटुंबातील सर्व जण एकत्र गुण्यागोविंदाने राहत असत.
कुटुंबाचा कारभार हा त्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कारभारी (एकत्र कुटुंब कर्ता) म्हणून बघत असे. हा कारभारी होण्याचा मान ज्येष्ठ बंधूला असे. सर्वांच्या एकीच्या बळामुळे विहीर खोदणे, जमीन खरेदी करणे, लग्नकार्य व्यवस्थित पार पाडणे असे मोठे व्यवहार सहज पार पाडले जात. त्याचबरोबर शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना घरच्या घरी शेतात काम करणारी मंडळी असल्याने मजूर लावण्याची गरज नसे.
त्यामुळे मजुरी खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत होत असे. त्याचबरोबर मोठ्या कुटुंबाचा गावात धाक असे. मात्र पुढे कालांतराने एकत्रित कुटुंब पद्धतीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. एकत्रित कुटुंब पद्धतीत अल्पशा कारणास्तव घरात तंटे निर्माण होऊ लागले. आणि शासनाच्या धोरणानुसार ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ (शासनाने लोकसंख्या वाढीस आळा यावा या उद्देशाने हे ब्रीदवाक्य आणले आणि जनतेने विभक्त राहण्याच्या उद्देशाने हे अंगीकारले) म्हणून एकत्र कुटुंबातील सदस्य वेगळ्या चुली मांडू लागले.
वारसांमधील वाटणी होऊन जमिनीचे लहान लहान तुकडे होऊन शेतकरी अल्पभूधारक झाले. लग्नकार्य संकट वाटू लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात जाऊन राहू लागल्याने गावे ओस पडत आहेत.
हिंदूंमध्ये एकत्र कुटुंबास एक विधिमान्य दर्जा व त्यांच्या घटकांस काही वैशिष्ट्यपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत. घराण्याचा अस्तित्वात असलेला समान पुरुष पूर्वज, त्याची कुठल्याही श्रेणीपर्यंत असणारी पुरुषानुवर्ती पुरुषसंतती व या सर्वांच्या बायका, विधवा व अविवाहित मुली या सर्वांचे मिळून एक एकत्र हिंदू कुटुंब होते. याप्रमाणे हिंदू कुटुंब हा कायद्याने नसून रक्ताने जोडलेला वरील मर्यादेत बसणारा एकगोत्री आप्तवर्ग होय.
एकत्रित कुटुंबात एका पूर्वजापासून उत्पन्न झालेली व्यक्ती, त्यांच्या बायका व मुले असे सदस्य असतात. संयुक्त कुटुंबात रक्ताचे नाते असलेले, विवाहाचे नाते असलेले व दत्तकामुळे नाते असलेले लोक असतात. एकत्रित कुटुंबात गरीब नातेवाइकांना व आश्रितांना सुद्धा स्थान असते. एकत्रित हिंदू कुटुंब, भोजन, उपासना व संपत्तीमध्ये संयुक्त असल्याचे गृहीत धरले जाते. एकत्रित कुटुंबाची संपत्ती “संयुक्त संपत्ती” असल्याचे गृहीत धरले जाते.
एकत्रित कुटुंब व सहदायिकाची प्रमुख लक्षणे
हिंदू जीवनपद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकत्रित कुटुंबपद्धती होय. एका पूर्वजापासून उत्पन्न झालेले सर्व नाते बांधत एकत्रितपणे, त्यांच्या बायका, विधवा व अविवाहित किंवा परित्यक्ता मुलींसोबत एका कुटुंबात राहतात. संपत्ती शिवायदेखील एकत्र कुटुंबसुद्धा असू शकते.
हिंदू एकत्रित कुटुंबाचे अस्तित्व त्याच्या सदस्यांशी निगडित आहे. हिंदू सहदायक हिंदू एकत्रित कुटुंबातील एक घटक आहे. यात स्त्रिया नसतात. हिंदू सहदायक केवळ पुरुष सदस्यांनी तयार होते. एक पुरुष सदस्य, त्याचा मुलगा, त्याच्या मुलाचा मुलगा आणि त्याच्या मुलाचा मुलगा अशा चार पिढ्यांचे पुरुष सदस्य मिळून एक सहदायिका निर्माण होते.
अशा चार पिढ्यांची सहदायिका, जोपर्यंत शृंखला तुटत नाही तोपर्यंत अविरत सुरू राहते. सर्वांत वयस्क पुरुषापासून तिसऱ्या शृंखलेपर्यंत असलेले पुरुष सदस्य सहदायिकेचे सदस्य असतात. अशी शृंखला आजोबा, काका, पुतणे इत्यादी मिळून सुरू राहते.
एकत्र (संयुक्त) कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात. एकत्र कुटुंब पद्धतीत नवीन विचारधारणा रूढ होत असल्याने ग्रामीण भागात ही पद्धत प्रचलित असली, तरी शहरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत आहे. शहरातील फ्लॅट संस्कृतीप्रमाणेच ग्रामीण भागातून एकत्रित कुटुंब पद्धती कालबाह्य होत असून, बरेच जण स्वतंत्र राहणे पसंत करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकत्र कुटुंब म्हणजे हिंदू समाजातील एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे.
एकत्रित कुटुंबाची संपत्ती
वैयक्तिक संपत्ती
एकत्र कुटुंबाची संपत्ती ः म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती. ज्यात कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा अधिकार असतो. एकत्रित कुटुंबाच्या सदस्यांची स्वतःच्या स्वतंत्र मालकीची वैयक्तिक संपत्तीसुद्धा असू शकते.
वैयक्तिक संपत्ती ः वैयक्तिक संपत्तीचा मालकी हक्क फक्त त्या ठरावीक सदस्याचा असतो. तो त्याच्या मनाप्रमाणे वैयक्तिक संपत्तीची विल्हेवाट लावू शकतो.
वैयक्तिक संपत्तीच्या मालकाचा मृत्यू झाल्यावर त्याची वैयक्तिक संपत्ती त्याच्या वारसांकडे जाते; परंतु एकत्रित कुटुंबाची संपत्ती, त्याच्या वारसांकडे न जाता सहदायिकेच्या इतर सदस्यांकडे जाते.
पिता, आजोबा किंवा पणजोबा यांच्यापासून मुलगा, नातू किंवा नातूचा मुलगा यास वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीस ‘वडिलार्जित’ असे म्हणतात. अन्य कुठल्याही व्यक्तीकडून वा कुठल्याही मार्गाने मिळवलेली संपत्ती ही सर्वसाधारणपणे स्वकष्टार्जित होय. अर्थात, पित्याची स्वकष्टार्जित संपत्ती ही वारसाहक्काने पुत्राच्या हाती पडल्यास ती पुत्राचे हाती वडिलोपार्जित संपत्ती बनते.
या संपत्तीच्या अवस्थांतूनच सहदायक वर्ग जन्मास येतो. हिंदूंमध्ये मुख्यतः मिताक्षरा व दयाभाग हे दोन वर्ग/पंथ आहेत. मिताक्षरा व दयाभाग प्रमाणे अशा सहदायक वर्गाची व्याख्या व व्याप्ती वेगवेगळी असते. मिताक्षरा पंथानुसार पुत्राला जन्मतःच पित्याच्या वडिलोपार्जित व स्वकष्टार्जित दोन्ही प्रकारच्या संपत्तीत मालकी हक्क मिळतो.
तरी न्यायनिर्णित विधीप्रमाणे मिताक्षरापंथीय पुत्राला पित्याच्या स्वकष्टार्जित संपत्तीमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळत नाही, फक्त वडिलोपार्जित मध्येच मिळतो, असे ठरले गेले आहे. त्यामुळे पित्याच्या स्वकष्टार्जित वारसाहक्काने पुत्राच्या वडिलोपार्जित मध्ये रूपांतर झाल्याबरोबर, अशा पुत्राचे स्वतःचे पुत्र, पौत्र व प्रपौत्र हे त्या संपत्तीमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळवतात व या सर्वांचा एक सहदायक वर्ग निर्माण होतो.
अशा रीतीने सहदायक वर्गात फक्त पुरुषच असतात व एकावेळी एकंदरीत फक्त चार पिढ्यांचेच पुरुष त्यामध्ये मोडतात. अर्थात, उपर्युक्त मूळ पुरुष निवर्तल्यावर त्याच्या पुढील चार पिढ्यांचे पुरुष सहदायक वर्गाचे सभासद होतात. हा सहदायक वर्ग विभाजन होईपर्यंत पिढ्यान् पिढ्या चालू शकतो.
परंतु दयाभाग पंथाप्रमाणे सहदायक वर्ग हा चार पिढ्यांचाच असला, तरी दयाभागानुसार पुत्राला पित्याच्या कुठल्याही संपत्तीमध्ये जन्मसिद्ध अधिकार नसल्यामुळे व पित्याची दोन्ही प्रकारची संपत्ती पुत्राला पित्याच्या मरणानंतरच मिळत असल्यामुळे सदरहू सहदायक वर्गामध्ये पिता असेपर्यंत पुत्राचा अंतर्भाव होऊ शकत नाही. त्यामुळे दयाभाग पंथीय सहदायकवर्ग हा भिन्न शाखीय वंशजातीचा बनलेला असतो.
उदा., वडिलार्जित संपत्ती मिळविणाऱ्या पुत्राबरोबर त्याचे बंधू, मृत बंधूंचे पुत्र, मृत बंधूंच्या मृत पुत्रांचे पुत्र इ. भिन्नशाखीय पुरुष वंशज त्यांच्या सहदायक वर्गामध्ये समाविष्ट होतात. हे सर्व पूर्वीपासून एकत्र कुटुंबाचे घटक असतातच, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त एकत्र कुटुंबामध्ये स्त्रिया व चार पिढ्यांनंतरची पुरुष संतती यांचाही समावेश होऊ शकतो.
याप्रमाणे एकत्र कुटुंब व सहदायादवर्ग यामध्ये थोडा फरक असला, तरी वरील रीतीने प्राप्त झालेली सहदायक वर्गाची संपत्ती म्हणजेच एकत्र कुटुंबाची सामाईक संपत्ती हे समीकरण कायदेनिहित आहे. हा बाह्यतः विरोधाभास वाटला, तरी अशा एकत्र कुटुंबाची सामाईक संपत्तीवर सहदायक वर्गाचा मालकी हक्क असतो.
मिताक्षर
दयाभाग
दयाभाग सहदाययिकेचे नियम मिताक्षर सहदायिकेपेक्षा थोडे वेगळे आहेत. दयाभाग सहदायिका वडिलांच्या मृत्यूच्या वेळेस अस्तित्वात येते. जेव्हा त्यांचा मुलगा/मुलगी त्याच्या संपत्तीचा वाटा घेतात.
दयाभाग सहदायिकेत मुलाच्या मृत्यूनंतर त्याची विधवा सदस्य होऊ शकते. सहदायिकेत स्त्रीला सदस्य होता येत नाही. दयाभाग सहदायिकेत स्त्री व पुरुष दोघे सदस्य होऊ शकतात.
दयाभाग सहदायिकेत सदस्यांचे हिस्से निश्चित असतात. मिताक्षरमध्ये हिस्से ठरावीक नसतात. दयाभाग सहदायिकेत वडील संपूर्ण संपत्तीचे मालक असतात, मिताक्षरमध्ये हे सहदायिकेच्या इतर सदस्यासहित एकत्रित मालक असतात.
दयाभाग पंथ मुख्यतः बंगालमध्ये रूढ असून मिताक्षरा पंथ हा भारतात इतरत्र रूढ आहे. दयाभाग सहदायकाची काही खास लक्षणे आहेत. सहदायक वर्गाच्या चार पिढ्यांच्या मर्यादेपर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस जन्मसिद्ध हक्क मिळतो व त्या वर्गापैकी कुठलीही व्यक्ती मृत झाल्यास तिचा सामाईक मालमत्तेमधील हक्क तिच्या वारसांकडे न जाता उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार उर्वरित सहदायकाकडे अनुक्रमित होतो.
एकत्र कुटुंबातील सहदायक वर्गापैंकी सर्वांची सहदायकावर सारखीच मालकी असल्यामुळे व नवीन सहदायक जन्मास आल्यास इतरांचा वैयक्तिक मालकीहक्क कमी होणे आणि एखादा सहदायक मृत झाल्यास इतरांचा मालकी हक्क त्या प्रमाणात वाढणे क्रमप्राप्त असल्यामुळे, विभागणी होईपर्यंत कुठल्याही विशिष्ट सहदायकाला सहदायकाच्या कुठल्याही विशिष्ट भागांवर आपला खास वैयक्तिक हक्क सांगता येत नाही. त्याचप्रमाणे काही खास अपवाद वगळल्यास मिताक्षरा पंथीय सहदायकास आपला सहदायकामधील अविभक्त हिस्सा हस्तांतरित करता येत नाही.
सहदायकांची सहदाय मालमत्ता म्हणजेच एकत्र किंवा अविभक्त कुटुंबाची सामाईक मिळकत. सदरील मिळकत ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते व तिच्यामध्ये वडिलार्जित संपत्ती, एखाद्या सहदायादाने सामाईक संपत्तीमध्ये समाविष्ट केलेली त्याची वैयक्तिक स्वकष्टार्जित संपत्ती तसेच हिंदू एकत्र कुटुंबाच्या सदस्याने/सहदायकानी वडिलार्जित संपत्तीच्या मदतीने व सामाईक प्रयत्नांनी मिळवलेली संपत्ती, या सर्वांचा समावेश होऊ शकतो. अविभक्त असेपर्यंत सहदायकाच्या बाबतीत सर्व सहदायकाना हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उपभोगाचा समान हक्क असतो. सहदायकातून आपल्या निर्वाहाची व्यवस्था करून घेणे व सर्व हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर ताबा असणे, हे प्रत्येक सहदायकाचे महत्त्वाचे अधिकार आहेत.
सहदायक वर्गामध्ये प्रथमत: ज्येष्ठ पूर्वज व त्यांच्या मृत्यूनंतर उर्वरितांमधील सर्वसाधारणत: ज्येष्ठ पुरुष हा कर्ता म्हणून समजला जातो. या कर्त्यास पूर्वीच्या सहदायकांचे सर्वसामान्य अधिकार असतातच. त्याशिवाय सामाईक मालमत्तेची व्यवस्था पाहणे, कुटुंबाचे उत्पन्न स्वमतानुसार कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च करणे, एकत्र कुटुंबाचे वादामध्ये वादी वा प्रतिवादी या नात्याने भाग घेणे, संविदेत सहभागी होणे, अशा कुटुंबाचा सामाईक धंदा चालवणे व कौटुंबिक गरजेसाठी प्रसंग विशेषी कर्ज उभारणे इ. अनेक हक्क त्याला कर्ता या नात्याने प्राप्त होतात. परंतु विशेष म्हणजे विधिमान्य गरजेसाठी किंवा सहदायक म्हणून लाभासाठी कर्त्याला इतर सहदायकांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या मनाविरुद्धसुद्धा मालमत्तेचे किंवा तिच्या विशिष्ट भागाचे हस्तांतर करण्याचा अधिकार आहे, असे सबळ कारण/ कौटुंबिक गरजेशिवाय त्याने केलेले हस्तांतर बेकायदेशीर असते व त्यास इतर सहदायकापैकी कोणीही आक्षेप घेतल्यास दिवाणी न्यायालय ते हस्तांतर व्यवहार रद्दबातल करू शकते.
हिंदू एकत्र कुटुंबाच्या सामाईक मालमत्तेचे वैयक्तिक संपत्तीमध्ये रूपांतर करण्याचा एक सर्वसाधारण मार्ग म्हणजे विभाजन (वाटणी). सामाईक जमीन कसणे हा कुटुंबाच्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग राहिला नसल्यामुळे व त्याला नोकरी, धंदा इ.व्यक्तिगत पर्याय उपलब्ध झाल्यामुळे तसेच औद्योगिकीकरण, लोकसंख्येचे नागरीकरण, सामाजिक परिवर्तन इ. कारणांमुळे एकत्र हिंदू कुटुंब हे दिवसेंदिवस आई-बाप व अज्ञान मुले एवढ्यांपुरते संकुचित होत आहे व काहीअंशी लयाला जाऊ पाहत आहे.
परंतु एकाच गोत्रातील बंधूंना एकमेकांविषयी विलक्षण ओढ अजूनही वाटते, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. त्याशिवाय १९६१ च्या आयकर अधिनियमान्वये व्यक्तिगत उत्पन्नापेक्षा अविभक्त हिंदू कुटुंबास आयकरातून जास्त सूट मिळत असल्यामुळे, तसेच धंदा करताना परक्या लोकांबरोबर भागीदारी करण्यापेक्षा आपापसांत एकत्र कुटुंब या नात्याने धंदा करणे जास्त चांगले आहे.
असे अनेक धनिक पितापुत्रांना आढळून आल्यामुळे हिंदू समाजामध्ये विशेषतः व्यापारी वर्गामध्ये, एकत्र कुटुंबपद्धतीला चिकटून राहण्याची, एवढेच नव्हे, तर संमिश्रणाच्या मार्गाने नवनवीन सहदायकवर्ग निर्माण करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबाच्या भवितव्याविषयी निश्चित अंदाज वर्तविणे कठीणच आहे.
पुढील भागात हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे विभाजनाची/वाटणीची पद्धत व प्रत्येकी हिस्सा या विषयी माहिती घेऊ...
कर्ता कोण व त्याचे अधिकार कोणते
एकत्र हिंदू कुटुंबाच्या प्रमुखाला कर्ता असे म्हणतात. एकत्रित हिंदू कुटुंबाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची, देखरेखीची व सर्व व्यवहार पाहण्याची जबाबदारी कर्त्याची असते. सहसा, कुटुंबाचा सर्वांत ज्येष्ठ पुरुष कर्ता असतो.
कुटुंबाचे सर्व व्यवहार पाहण्यासाठी कर्त्याला असलेले अधिकार जसे की, १) कुटुंबाच्या व्यवस्थापनेचे अधिकार. २) कुटुंबाचे उत्पन्न घेण्याचा अधिकार. ३) कुटुंबाचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार. ४) कुटुंबाच्या वतीने तडजोड करण्याचा अधिकार. ५) मध्यस्थीच्या द्वारे वाद सोडविण्यास लवाद नेमण्याचा अधिकार. ६) कुटुंबाच्या वतीने कुटुंबाचे ऋण मान्य करण्याचा अधिकार. ७) कुटुंबाच्या वतीने कोर्टात दावा दाखल करण्याचा अधिकार.
कर्त्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या
हिंदू एकत्रित कुटुंबाच्या कर्त्यावर उक्त अधिकारासोबत कर्त्याला कुटुंबाच्या प्रति काही ठरावीक कर्तव्ये व जबाबदाऱ्या सुद्धा सोपविल्या आहेत. कर्त्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत ः
कर्त्याने एकत्रित कुटुंबाच्या संपत्तीचा, त्या संपत्तीहून होणाऱ्या मिळकतीचा व उत्पन्नाचा संपूर्ण हिशेब कुटुंबाच्या इतर सदस्यांना द्यायचा असतो.
कर्त्यांनी एकत्र कुटुंबाच्या संपत्तीची विल्हेवाट लावण्यापूर्वी सर्व संबंधितांची सहमती घेणे आवश्यक असते.
एकत्र हिंदू कुटुंबाच्या कर्त्याने कुटुंबासाठी खर्च करताना योग्य पद्धतीने खर्च करायचा असतो. अवाजवी व वायफळ खर्च करू नये.
कुटुंबाच्या वतीने दिलेले कर्ज वसूल करण्याचे कर्तव्य कर्त्याचे आहे. असे कर्ज कर्ता माफ करू शकत नाही. त्यात योग्य तशी तडजोड करण्याचा अधिकार कर्त्याकडे असतो.
कुटुंबातील इतर सदस्यांच्या माहिती व सहमतीशिवाय कर्ता नवीन कारभार किंवा उद्योग सुरू करू शकत नाही. ज्यामुळे की कुटुंबाच्या सदस्यांच्या हितासंबंधी काही प्रश्न उभे राहू शकतील.
सामान्यत: हिंदू कुटुंब हे एकत्र कुटुंबच आहे, अशी कायद्याची धारणा आहे व विभाजनाचा प्रत्यक्ष पुरावा दाखविल्याखेरीज या धारणेचे खंडन होत नाही. सामाईक रहिवास, सामाईक देवता, सामाईक भोजन व सामाईक मालमत्ता ही सर्वसाधारणपणे एकत्र कुटुंबाची लक्षणे आहेत. परंतु सामाईक मालमत्ता हे मात्र एकत्र कुटुंबाच्या अस्तित्वाचे अपरिहार्य लक्षण नव्हे. त्यामुळे सामाईक मालमत्तेशिवायही एकत्र कुटुंब अस्तित्वात असू शकते. घराण्याचा अस्तित्वात असलेला समान पुरुष पूर्वज, त्याची कुठल्याही श्रेणीपर्यंत असणारी पुरुषसंतती व या सर्वांच्या पत्न्या, विधवा व अविवाहित मुली या सर्वांचे मिळून एक एकत्र हिंदू कुटुंब होते. याप्रमाणे हिंदू कुटुंब हा कायद्याने नसून रक्ताने जोडलेला वरील मर्यादेत बसणारा एकगोत्री
आप्तवर्ग होय. कायद्याच्या भाषेत सहदायक म्हणजे हिंदू एकत्र कुटुंबातील प्रत्येक सदस्य होय. कायद्याच्या क्षेत्रात एकत्र कुटुंबाला तद्ंतर्गत असणाऱ्या सहदायक वर्गामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ः bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.