
सोमनाथ कन्नर
एकविसाव्या शतकाचा पाव हिस्सा जवळपास पूर्ण झाला आहे. भारताला खासगीकरण- उदारीकरण- जागतिकीकरण (खाउजा) धोरण स्वीकारून जवळपास तीसेक वर्षांचा कालावधी पूर्णही झाला. उदारीकणानंतर जन्माला आलेल्या पहिल्या पिढीचं अल्लड तारुण्यही बघता बघता सरलं आणि त्यांच्यात आता पोक्तपणा येऊ लागला आहे.
मागच्या तीस वर्षांत झालेल्या स्थित्यंतराची ही पिढी शेवटची साक्षीदार असणार आहे. यातल्या कुणीतरी बैलगाडीचा प्रवास केलाय, कुणीतरी रानात शेळ्या- गुरं वळलेत, कुणीतरी बापाला विहिरीवरच्या पम्पच्या सेक्शन पाइपमध्ये शेणाचं पाणी पाणी भरताना बघितलंय, इंजिनचं हॅन्डल मारताना बघितलंय.
गावातल्या लाइटच्या तारांवर आकडा टाकून घेतलेल्या लाइटच्या पिवळ्या बल्बच्या उजेडात चुलत्याला कापसाच्या गाठोड्यांचा काटा करताना बघितलंय, तर माय पहाटेच रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात चुलीला पोतारा घेताना बघितलंय. धोतर-टोपी नेसणारा आज्या आणि लुगडं-चोळी नेसणारी आजी ते कुर्ता-पायजमा नेसणारा बाप आणि साडी नेसणारी आई हे दोन्ही बदल घडताना बघणारी पिढीही बघता बघता जीन्सवर आली.
या पिढीकडे अनेक पुसट आठवणी आहेत. बैलगाडीत चारा घालून त्यावर घोंगडी अंथरून गूळ, कापूस, ज्वारी घालून आठवडी बाजाराला जाणाऱ्या बापाची घालमेल आणि एरंड्या, मोहरी आणि पिकांचा सर्वा कुटून तो विकून आलेल्या पैशांच्या चुरगळलेल्या नोटा अन् चिल्लर डाळीच्या उतळणीत साठवणाऱ्या मायची आर्थिक घुसमट, तीन-चार चुलत्यांच्या एकत्र कुटुंबात घराचा कारभारी आणि इतर भावांच्या बायका-मुलांना मिळणारी दुजाभावाची वागणूक, लेकीबाळीच्या माहेरपणाचं कौतुक.
आज्याच्या खांद्यावर पटक्याला धरून बसत पंचक्रोशीतील यात्रा फिरण्याचं भाग्य, गावात गारीगारवाला आला असता रुपया- आठ आण्यासाठी आजीच्या लुगड्याच्या पदराला बिलगून तासन् तास धरलेला घायटा, शाळेत येऊन पोराला बिनधास्त मारण्याची बापाने मास्तराला दिलेली परवानगी, सगळ्या भावंडांनी एकाच रंगाच्या कापडाचे गावातल्या टेलरकडे दिलेलं माप, बाजारातून आणलेल्या मिक्स चिवड्याचे केलेले सारखे वाटे, बोटाने थुंकी लावून काढलेले अनवाणी पायात शिरलेले काटे...अशा कैक आठवणी आहेत.
या पिढीने गोठ्यात दहा-पाच गायी आणि चार-सहा बैलांची दावण अनुभवलीय, गाय विण्याची पंधरा दिवसांआधीपासूनच वाट पाहिलीय, चिकाच्या दुधाचा खरवस वाटीत घालून शिवारातल्या देवांना वाहेपर्यंत कळ काढण्याचा संयम दाखवलाय, शाळा बुडवून गोठ्यात वासरासोबत अख्खा दिवस घालवलाय, बैलांच्या पोटाखालून इकडून तिकडे निघण्याचे तत्कालीन धाडसी प्रयोग केलेत, औतावर बसून पाळी-पाळी केलीय. शिवारातल्या प्रत्येक बैलाचं नाव माहीत असलेली ही शेवटची पिढी ठरली.
प्रत्येक चवीसाठी, कपड्यालत्यासाठी, हव्याशा वस्तूसाठी आधी तरसून मगच तिचा आस्वाद मिळालेली ही पिढी आहे. आपल्या डोळ्यादेखत या पिढीने झपाट्याने होणारं स्थित्यंतर अनुभवलंय. त्यामुळे जुनं चांगलं की नवं या ओढाताणीत पुरती गोंधळलेली दिसते. यांच्या आधीची पिढी जुन्या रूढी-परंपरांना घट्ट चिकटून आहे, तर यांच्या नंतरची पिढी सगळं फाट्यावर मारणारी पूर्णतः अत्याधुनिक आहे. या दोन्हींच्या मध्ये जन्मलेल्या तरुणाईचा उमेदीचा काळ या गोंधळाने पोखरला जातोय.
शहरांमधील तरुणाईला ज्याप्रमाणे या आधुनिकतेशी एकरूप होता आलं, तसं गावकुसात घडताना दिसून येत नाही. वीज, इंटरनेट गावात पोहोचलं असलं, तरी कृषी क्षेत्राचं व्यवस्थेनं केलेलं दमन इथल्या ताज्या दमाच्या पिढीला नाउमेद करताना दिसत आहे. सुरुवातीच्या काळात खासगीकरण- उदारीकरण- जागतिकीकरण (खाउजा) धोरणामुळे कृषी क्षेत्रात झपाट्याने घडून आलेली आधुनिकता धोरणकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आता तितक्याच वेगाने नैराश्याकडे घेऊन जाताना दिसतेय.
कारण आधुनिक शेती आणि शेती निगडित व्यवसाय करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यासाठी लागणारं भांडवल ज्या सहजतेने उपलब्ध होत आहे, त्या धर्तीवर उत्पादित केलेल्या शेतीमालाला प्रतिष्ठित बाजार मिळवून देण्यात प्रचंड उदासीनता दिसून येते. गावागावांत कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँका, पतपेढ्यांचं वारेमाप पीक आलंय. सातबारा उतारे या बँकांच्या बोज्यांनी करकचून बांधले गेलेत. भांडवलवादाचे छुपे धोके समोर येताना दिसतायेत.
गावकुसाला सर्वांत मोठा शाप काय ठरला असेल तर ते म्हणजे शिक्षणाचे खासगीकरण झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था. महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जाच या खासगी महाविद्यालयांनी संपवून टाकला. एकदा प्रवेश घेतल्यावर फक्त परीक्षेलाच जावं लागणाऱ्या या महाविद्यालयांनी गेल्या पंधरा-वीस वर्षांत अकुशल तरुणांच्या लाखोंच्या फौजा निर्माण केल्या. ज्या नंतर स्पर्धा परीक्षांच्या जाळ्यात अडकल्या. तेथील जीवघेण्या स्पर्धेतून टिकून राहताना सततच्या मोटिव्हेशनल भाषणांनी पेटून पुन्हा पुन्हा थंड होण्याच्या सवयीने आता त्यांना कशाचंच काही वाटत नाही.
त्यातच सोशल मीडिया सहज हाताशी आल्याने व माध्यम साक्षरता नसल्याने या पिढीला अजून गोंधळात टाकलं. संपूर्ण जगाचं ज्ञान प्राप्त करण्याच्या आव आणणाऱ्या या पिढीला फ्यूजच्या वायरी बदलता येत नाहीत, शे पन्नास रुपये देऊन एका दिवसात तहसीलमधून नऊ/चार-नऊ/तीनचा नमुना उतारा काढता येत नाही, खतं आणि कीटकनाशकांतील घटक कळत नाहीत. हे सगळं आपला अल्पशिक्षित बाप सहजपणे करून टाकतो, हे समजल्यावर आपल्या तीसेक वर्षाच्या एकूण शैक्षणिक आयुष्याची गोळाबेरीज शून्य असल्याचा साक्षात्कार होतो.
आपल्या व्यवस्थेने या सगळ्या नकारात्मक बाबी निर्माण होण्यासारखी परिस्थिती जन्माला घातली आहे. ग्रामीण समाजजीवनावर त्याचे गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. कृषी क्षेत्रातील असुरक्षितता सर्वांसमोर उघड आहे. अशातच माध्यमांमध्ये चुकूनमाकून एखाद्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाल्याची बातमी व्हायरल होते आणि अनेक तरुणांना शेतीकडे आकृष्ट करण्यास भाग पाडते. अशातून मग होतात जुन्या-नव्या पिढीतील टिपिकल संघर्ष. एकीकडे अनेकदा ठेच खाऊन आलेला पक्व अनुभव, तर दुसरीकडे तारुण्यातील हार्मोन्सच्या उलथापालथीमुळे संचारलेला उत्साह. या सगळ्या संघर्षात काळ झपाट्याने पुढे निघून जातोय. गावातून चार-दोन यशस्वी झालेले अपवादात्मक तरुण इतरांच्यात नाहकची चरफड निर्माण करतात. ज्यांना राजकीय नेत्यांच्या मागेपुढे करून भजन जमवता येतं त्यांचं यशही आदर्श म्हणून समोर ठेवलं जातंय.
नैतिक- अनैतिक असं कुणाला काहीच वावडं नाही. पूर्वजांच्या इमानदारीचा, प्रामाणिकपणाचा, शब्दाला जागल्याचा इतिहास तुच्छ वाटू लागलाय. लग्नव्यवस्था अंतिम टप्प्यात असून गटांगळ्या खाताना दिसून येतेय. तरुणी ग्रामीण भागात राहण्यास अजिबात तयार नाही. दोष त्यांचाही नाही. ग्रामीण भागाने संस्कृतीच्या जपलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या त्या हकनाक बळी ठरतात. गाव नावाच्या व्यवस्थेत त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणतंही क्षेत्र खुलं नाही. त्यांच्या हक्कांसाठी कुटुंब व्यवस्थेला शिंगावर घेण्याची तरुणांचीही तयारी नाही. त्यांना बाळगुटीत पाजलेल्या ‘मातृ-पितृ देवो भव’ या विचारांचा परिपाक त्यांना बुळा बनवतोय हे त्यांना स्वीकारायचं नाही. अति सामाजिकतेच्या फायद्या-तोट्यांपैकी हा एक मोठा तोटा आहे.
ग्रामीण व्यवस्थेत अनेक कमतरता आहेत. मात्र त्यात सुधारणा करण्यासही बराच वाव आहे. इतर क्षेत्रांत आलेला संपृक्तपणा अजून तिच्यात आलेला नाही. मात्र त्यासाठी तरुणांना बऱ्याच समाजमान्यतांना सुरुंग लावण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. जुन्या नॉस्टॅल्जिक गोष्टींना कुरवाळत बसल्यास ते त्यांना अजून नैराश्यात नेणारं ठरू शकतं. त्यासाठी समाजभान असणाऱ्या एका पिढीला या भागात स्वतःला वाहून घ्यावं लागेल.
समाजव्यवस्थेचे अनेक कालबाह्य पाश, हराळी कुंद्यासारखे मुळासकट हळूहळू खणून काढावे लागतील. ग्रामव्यवस्था अधिकाधिक सुधारणावादी बनवावी लागेल. ग्रामव्यवस्थेकडे इतर बाबीत दुय्यमत्व असलं तरी तिच्याकडे एक महत्त्वाचा शाश्वत घटक आहे- तो म्हणजे निसर्ग आणि त्याचं सृजन. या सगळ्यांची योग्य सांगड घातल्यास राजकीय व्यवस्थेतही अनुकूल बदल घडायला सुरू होतील.
९१५८१ ४५१०९
(लेखक युवा शेतकरी व पत्रकार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.