डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे
Eco-Friendly Packaging: मोठ्या प्रमाणात मालाच्या वाहतुकीसाठी किंवा साठवणीसाठी किंवा होलसेल ग्राहकांसाठी मोठ्या आकाराच्या पॅकेजिंगची आवश्यकता असते. याला इंग्रजीमध्ये ‘बल्क शिपमेंट’ असे म्हणतात. त्यासाठी नालीदार (Corrugated) बॉक्सेस, मोल्डेड पल्प ट्रे (Molded pulp trays), फोम केलेले पॉलीस्टायरीन ट्रे (Foamed polystyrene trays) वापरले जातात. त्यामुळे उत्पादनांची वाहतूक, हाताळणी आणि साठवणूक सुलभ होते.
टोपल्या
हा पॅकेजिंगचा पारंपरिक प्रकार असला, तरी अद्याप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पारंपरिक टोपल्या पानांच्या, बांबूच्या विणलेल्या पट्ट्यांपासून बनविल्या जातात. बांबूच्या वेगवेगळ्या आकार आणि प्रकारातील टोपल्या नाशिवंत शेतीमालाच्या विक्रीसाठी वापरल्या जातात. त्यांची परिमाणात्मक स्थिरता आणि एकावर एक रचल्यानंतर येणारा भार (stacking load) सहन करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे अशा टोपल्या डोक्यावरून शेतीमाल वाहण्यासाठी किंवा खूप कमी अंतरावरील वाहतुकीसाठी योग्य असतात. अलीकडे यात प्लॅस्टिक टोपल्या येऊ लागल्या आहेत.
पोती आणि जाळी
पोती आणि जाळी विविध प्रकारच्या नैसर्गिक, कृत्रिम तंतू किंवा कापडांपासून बनवता येतात. त्या त्या प्रकारानुसार किंमत, टिकाऊपणा आणि संरक्षणामध्ये फरक पडतो.
नैसर्गिक तंतू (ज्यूट, कापूस) : हे पर्यावरणपूरक आणि स्वस्त पर्याय असून, कृत्रिम तंतूंपेक्षा कमी टिकाऊ असतात. त्यात ओलावा शोषला जातो.
कृत्रिम तंतू (पॉलीप्रॉपिलीन, पॉलीइथिलीन) : हे तंतू मजबूत, हलके आणि ओलावा प्रतिरोधक असतात. ते जास्त काळ टिकतात. नाशवंत वस्तूंसाठी चांगले संरक्षण देऊ शकतात.
विणलेले आणि न विणलेले कापड : या प्रकारच्या सामग्रीचा वापर त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांनुसार केला जातो. उदा. ताकद, लवचिकता आणि हवा खेळती राहण्याची क्षमता इ.
फायदे
पोती आणि जाळी साधारणपणे इतर पॅकेजिंग प्रकारांपेक्षा स्वस्त असतात.
वजनाला हलकी आणि कमी जागा व्यापणारी असते. कमी वजन / आकारमान गुणोत्तरामुळे वाहतूक आणि साठवणूक खर्च कमी होतो.
कृत्रिम तंतूपासून बनविलेल्या असल्यास त्या ओलावा प्रतिरोधक असतात. त्यामुळे बुरशीमुळे कुजत नाहीत. दीर्घकाळ टिकतात.
तोटे
पोती आणि जाळी फाटणे किंवा वजनामध्ये दबली जाणे, कंपन (हालचाल) आणि खाली पडणे यांसारख्या शारीरिक नुकसानीपासून पुरेसे संरक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळे नाजूक वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी ती योग्य मानली जात नाहीत.
पोत्यांचा आकार आणि त्यांची लवचिकता यामुळे एकावर एक रचण्यामध्ये अडथळा येऊ शकतो.
साठवणुकीत जास्त जागा लागते आणि अस्थिरता येते.
लाकडी क्रेट्स
लाकडी फळ्या खिळ्यांनी किंवा वायरने जोडून तयार करण्यात येतात. या स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध घटकांपासून स्थानिक पातळीवर तयार किंवा दुरुस्त करता येतात. लाकूड हे हवामान आणि पाण्याला काही प्रमाणात प्रतिरोधक असते. त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. अशा क्रेट्स मोठ्या फळांसाठी कार्यक्षम ठरतात. त्यात वायुविजनाची सोय केलेली असते. मात्र लाकडी फळ्यांवर योग्य ते उपचार केलेले नसल्यास लाकूड बुरशी व जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतात. रासायनिक उपचार उत्पादनांमध्ये प्रदूषणाची समस्या उद्भवू शकते. लाकडाचा कठीण पृष्ठभाग मऊ फळांसाठी कठोर ठरू शकतो. त्याला आतून अस्तराची गरज भासते. मात्र लाकडी फळ्यांच्या उपलब्धतेसाठी नैसर्गिक वनसंपत्ती तोडली जाण्याचा धोका वाढतो. मात्र मजबूत कोपरे आणि जोडलेल्या फळ्यांची रचना त्यांना स्थिरता देते.
नालीदार फायबरबोर्ड (CFB)
नक्षीदार / नालीदार फायबरबोर्ड (CFB) हे हलके, स्वस्त आणि चांगल्या कुशनिंग क्षमतेचे पॅकेजिंग साहित्य आहे. हे बॉक्स कोणत्याही डिझाइनमध्ये बनवता येतात. त्यामुळे त्यांची जोडणी आणि वाहतूक सोपी असते. त्यावर प्रिंटिंग क्षमता चांगली असते. जैवविघटनशील (बायोडिग्रेडेबल) असल्याने पर्यावरणपूरक आहेत. मात्र त्यांची ताठरता कमी असून, ओलावा शोषत असल्यामुळे त्यांची स्टॅकिंग क्षमता मर्यादित असते. नाशिवंत वस्तूंसाठी योग्य वायुविजन आवश्यक असते. त्यासाठी छिद्रांचे क्षेत्रफळ किमान ५ टक्के असावे. उभे लांबट छिद्रे अधिक प्रभावी ठरतात. मात्र मेण किंवा पॉली लायनिंगमुळे वायुविजनात अडचणी येऊ शकतात.
सॉलिड फायबरबोर्ड बॉक्सेस
सॉलिड फायबरबोर्ड बॉक्सेसवर आकर्षक रंगसंगती किंवा ब्रॅण्ड माहिती छापणे सोपे असते. ते हलके आणि हाताळण्यास सोपे असले तरी आर्द्रता आणि दमट हवामानास संवेदनशील असतात. धुतलेले उत्पादन कोरडे करूनच पॅक करावे लागते. रिकामे बॉक्सेस कोरड्या जागी साठवावे लागतात. लहान वायुविजन छिद्रे बॉक्सची ताकद वाढवतात. योग्य आकार आणि प्रमाण नसल्यास किंवा टेलिस्कोपिंग झाकण व्यवस्थित बंद न झाल्यास उष्णता विनिमय कमी होऊन उत्पादन लवकर खराब होते. उभ्या लांबट छिद्रांमुळे झाकण पूर्णपणे बंद असतानाही हवा खेळती राहते. हे बॉक्सेस सामान्यतः पुनर्वापरायोग्य नसतात. त्यांचा टोमॅटो, काकडी आणि आले अशा उत्पादनासाठी प्रामुख्याने वापर केला जातो.
प्लॅस्टिक क्रेट्स
प्लॅस्टिक क्रेट्स हे प्रामुख्याने उच्च घनतेच्या पॉलीइथिलीन किंवा पॉलीप्रॉपिलीनपासून बनविलेले असतात. लाकडी किंवा पुठ्ठ्याच्या बॉक्सपेक्षा सुरुवातीला महाग असले तरी त्यांच्या टिकाऊपणामुळे दीर्घकाळात स्वस्त ठरतात. विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे क्रेट्स स्वच्छ करणे आणि निर्जंतुकीकरण करणे सोपे असते. पाणी प्रतिरोधक असल्याने दमट हवामान आणि हायड्रो कूलिंगसाठी योग्य आहेत. तथापि, त्यांच्या कठीण पृष्ठभागामुळे उत्पादनांना नुकसान होऊ शकते. नाजूक उत्पादनासाठी आतून अस्तरांचा वापर आवश्यक असतो. आकारमान स्थिर असल्याने परतीच्या वाहतुकीचा खर्चही विचारात घ्यावा लागतो. एकावर एक रचण्यायोग्य आरेखनामुळे जागेचा कार्यक्षम वापर होतो.
डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७,कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.