
डॉ. विक्रम कड डॉ. गणेश शेळके डॉ. सुदामा काकडे
ग्राहकांपर्यंत उत्पादन पोचविण्यासाठी लहान युनिट पॅकेजिंग आवश्यक असते. त्यासाठी वापरले जाणारे साहित्य भौगोलिक परिस्थितीनुसार बदलते. उदा. उत्पादक केंद्रांच्या आसपास पॉलिइथिलीन फिल्म्स (HDPE, LDPE), बॉक्सेस, बॅग्स, ट्रे प्रकारचे कंटेनर इ. वापरले जातात. रिटेल पॅकेजिंग हे थेट ग्राहकांना विक्रीसाठी असलेल्या लहान आकाराच्या उत्पादनांसाठी असते. याचा उद्देश उत्पादनाला आकर्षक बनवणे, त्याची माहिती देणे आणि वाहतूक व साठवणुकीदरम्यान त्याचे संरक्षण करणे हा असतो.
ग्राहक (रिटेल) पॅकेजिंगचे मुख्य प्रकार
लवचिक प्लॅस्टिक फिल्म्स भाज्यांसाठी एलडीपीई, पीव्हीसी, पीपी आणि सेल्युलोज ॲसिटेट फिल्म्स वापरल्या जातात. या फिल्म्स वेगवेगळ्या जाडीच्या आणि प्रकारच्या असतात. या फिल्म्सच्या पिशव्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी लहान छिद्रे केलेली असतात. त्यामुळे भाज्या ताज्या राहतात. उदा. वाटाण्याची भाजी पीपी च्या पिशवीत उपलब्ध केली जाते. या पिशवीला हवा खेळती राहण्यासाठी छिद्रे असतात.
ओव्हररॅप केलेले ट्रे
ओव्हररॅप ट्रे हे मोल्डेड पल्प (लगद्यापासून बनविलेले) किंवा ईपीएस, पीव्हीसी आणि पीपीसारख्या प्लॅस्टिक साहित्यापासून बनवलेले असतात. यात प्रत्येक फळ किंवा भाजीसाठी कप्पे असल्यामुळे वाहतुकीत घासून होणारे नुकसान टाळले जाते. ट्रेमुळे उत्पादनाला सर्व बाजूने आधार (कुशनिंग) मिळते.
प्लॅस्टिक पनेट्स
हे बहुउपयोगी, आकर्षक आणि पारदर्शक कंटेनर फळे आणि भाज्यांसाठी उत्तम पर्याय आहेत. त्याच्या विशिष्ट रचनेमुळे उत्पादने स्पष्टपणे दिसतात त्यामुळे ग्राहकांना त्यांची गुणवत्ता तपासण्याची संधी मिळते. या कंटेनरमध्ये योग्य वायुवीजनासाठी छिद्रे दिलेली असतात. त्यामुळे आतील ओलावा नियंत्रित राहतो. उत्पादन अधिक काळ ताजे राहते.
हे अन्नसुरक्षेच्या मानकांनुसार तयार केलेले (food-grade), कोणत्याही प्रकारचा वास नसलेले, वजनाला हलके असल्यामुळे हाताळण्यास सोपे, एकावर एक ठेवता येण्याजोगे (stackable) असते. त्यामुळे जागेची बचत आणि पुनर्वापर करण्यायोग्य असल्याने पर्यावरणासाठीही अनुकूल असतात. हे प्रामुख्याने PET (पॉलिथिलीन टेरेफ्थालेट), PVC (पॉली विनाइल क्लोराइड) किंवा PP (पॉलिप्रॉपिलीन) यांसारख्या प्लॅस्टिक साहित्यापासून बनवले जातात.
प्लॅस्टिक नेट बॅग्स (एक्सट्रुडेड आणि विणलेल्या)
या विशेष प्रकारच्या जाळीदार प्लॅस्टिकच्या पिशव्या लवचिकतेमुळे विविध आकार आणि प्रकारच्या फळांना व भाज्यांना सामावून घेतात. त्या रोलच्या स्वरूपात किंवा विशिष्ट लांबीच्या (२०० मिमी ते ४०० मिमीपर्यंतची ताणण्याची क्षमता) तयार पिशव्यांच्या स्वरूपात उपलब्ध असतात. या पिशव्यांतून हवा खेळती राहते. या पिशव्यांमध्ये ओलावा साठून राहत नसल्यामुळे उत्पादन सडणे आणि वाया जाणे टळते.
त्यामुळे उत्पादनाचा ताजेपणा आणि साठवण कालावधी (shelf-life) वाढतो. रंगीत आणि पारदर्शक जाळीदार पिशव्या विक्रीच्या ठिकाणी आकर्षक दिसतात. ग्राहकांना आतील उत्पादनाचा नैसर्गिक रंग आणि ताजेपणा स्पष्टपणे पाहता येतो. या साधारणपणे उच्च घनता पॉलीइथिलीन (HDPE) किंवा पॉलीअमाइड (PA) सारख्या टिकाऊ प्लॅस्टिक प्रकारांपासून बनविलेल्या असतात.
हलके प्लॅस्टिक क्रेट्स
फळे आणि भाज्यांच्या वाहतुकीसाठी हे एक उत्तम आणि आधुनिक माध्यम आहेत. या क्रेट्सचे वजन कमी असल्यामुळे त्यांची हाताळणी सोपी होते. वाहतूक खर्चही कमी येतो. यांना कोणत्याही बाह्य आवरणाची गरज नसते. याच्या बाजूला आणि तळाशी असलेल्या लहान छिद्रांमुळे हवा खेळती राहते. त्यामुळे आतील फळे आणि भाज्यांचा ताजेपणा टिकून राहतो. हे क्रेट्स एकावर एक ठेवण्यायोग्य रचनेचे बनवलेले असतात.
कमी जागेत अधिक माल साठवणे शक्य होते. हे क्रेट्स उच्च घनता पॉलिइथिलीन (HDPE) किंवा पॉलिप्रॉपिलीन (PP) यांसारख्या उच्च प्रतीच्या प्लॅस्टिकपासून बनवलेले असल्यामुळे ते मजबूत असतात. आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही हे क्रेट्स चांगले असतात, कारण ते सहजपणे स्वच्छ करता येतात. महत्त्वाचे म्हणजे, हे पुन्हा वापरण्यायोग्य आणि पुनर्प्रक्रिया करण्यायोग्य असल्यामुळे पर्यावरणस्नेही आहेत.
फोम स्लीव्ह
ही पॉलिइथिलीन फोमपासून तयार केलेली नळीसारखी लवचिक फिल्म आहे. त्यांचे आरेखन फळांना सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले आहे. ही विविध रंग, जाडी आणि लांबीमध्ये उपलब्ध असल्याने वेगवेगळ्या आकाराच्या फळांना घट्टपणे बसते.
वाहतुकीदरम्यान होणारे घर्षण आणि खरचटणे यांपासून फळांचे प्रभावीपणे संरक्षण करते. ही स्लीव्ह आरोग्यदायी, बिन विषारी आणि गंधहीन असल्यामुळे फळांच्या नैसर्गिक गुणधर्मांवर कोणताही परिणाम करत नाही. फळांना सुरक्षित ठेवण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
श्रिंक रॅप
फळे आणि भाज्या ताजे ठेवण्यासाठी आणि त्यांना आकर्षक बनवण्यासाठी श्रिंक रॅप ही एक आधुनिक आणि लोकप्रिय पद्धत आहे. यात प्रत्येक फळाला किंवा भाजीला एका विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिक फिल्ममध्ये लपेटले जाते. या फिल्मचा मुख्य फायदा म्हणजे ती उत्पादनातील ओलावा नियंत्रित करते. त्यामुळे फळांमधील पाण्याचे उत्सर्जन कमी होते. त्यांचा नैसर्गिक ताजेपणा आणि टणकपणा टिकून राहतो.
ही फिल्म पाण्याच्या वाफेसाठी एक प्रकारे संरक्षक कवच म्हणून काम करते. विशेष प्रकारच्या पारगम्य (selective permeable) प्लॅस्टिक फिल्मचा वापर केल्यास उत्पादनातील पाण्याचे उत्सर्जन ५ ते २० पटीने कमी करता येते. सामान्यतः एकेका उत्पादनाला एका सैलसर लवचिक फिल्ममध्ये लपेटले जाते आणि नंतर ते गरम हवेच्या बोगद्यातून (heat shrink tunnel) पाठवले जाते.
या उष्णतेमुळे फिल्म लगेच आकुंचन पावून उत्पादनाभोवती घट्टपणे चिकटते. त्यानंतर उत्पादन त्वरित थंड केले जाते. परिणामी फिल्म त्याच आकारात स्थिर होते. यासाठी सामान्यतः LDPE (लो डेन्सिटी पॉलिइथिलीन) किंवा LLDPE (लिनियर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन) यांसारख्या पातळ आणि लवचिक फिल्म्सचा वापर केला जातो.
नालीदार किंवा कोरुगेटेड बॉक्सेस
भारतीय बाजारपेठेत अनेक फळांसाठी (उदा. आंबा, सफरचंद, द्राक्षे इ.) २ ते ४ किलो वजनाचे लहान पॅक वापरललेजाते. ते. प्रामुख्याने नालीदार पुठ्ठ्याचे (corrugated paper board) किंवा पॉलिप्रॉपिलीन बॉक्सेस वापरले जातात. हे बॉक्सेस वजनाला खूप हलके असून, त्यांची बांधणी मजबूत असते. केवळ घड्या घालून बॉक्स तयार करता येतात.
त्यामुळे कमी जागेत वाहतूक करता येते. वाहतुकीदरम्यान आतील फळांना चांगला आधार मिळतो. या बॉक्सेसवर आकर्षक आणि माहितीपूर्ण छपाई करणे शक्य असते. त्यामुळे लोगो, ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. ते विक्रीसाठी अधिक आकर्षक दिसतात.
- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७,कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.