Marathi Language Agrowon
ॲग्रो विशेष

Marathi Language : अमृतातेंही पैज जिंकली मराठी

Team Agrowon

Information of Marathi Language : मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. बारा कोटी मराठी जनतेची, बोलणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची ही भाषा राष्ट्रस्तरावर अभिमान म्हणून देशमान्य, राजमान्य झाली. जगात दहाव्या क्रमांकावर असलेली मराठी अभिजात म्हणून अव्वलस्थानी होतीच पण आता केंद्रीय स्तरावरून त्यावर शिक्कामोर्तब झाले.

त्यामुळे मराठी मनांवर आनंदाचे उधाण आले आहे. हे निर्विवाद होते की मराठी मुळातच अभिजात आहे. कारण राज्य आणि राज्याबाहेर तसेच देश आणि देशाबाहेर सर्वत्र मराठी बोलणारा, वाचणारा, लिहिणारा वर्ग आजपासून नाही तो पूर्वापारच आहे.

तथापि या दर्जासाठी दहा वर्षे लढावे लागले. भाषेची चळवळ सक्रिय करावी लागली. निवेदने द्यावी लागली. प्रस्तावांचा मारा सतत चढता ठेवावा लागला. व्यक्ती, संस्था, भाषा मंडळे, भाषा समित्या या कामी सतत शासन यंत्रणांशी संवादी राहिल्या. हे सगळे श्रम अभिजात फलश्रुतीचे द्योतक ठरलेले आहेत.

मराठीचा इतिहास थोडकासा नाही. तो हजारो वर्षांचा आहे. प्रा. रंगनाथ पठारे अध्यक्ष असलेल्या अभिजात भाषा दर्जा समितीने तगडा अभ्यास करून, सखोल संशोधन करून प्राचीन ग्रंथ, प्राचीन काव्य, मऱ्हाटीची उत्पत्ती, शिलालेख, ताम्रपट अशा पायाभूत सामग्रीचा अभ्यास करून अभिजात दर्जा मिळावा, यासाठीचा जो अहवाल तयार केला, याचे मुख्य फळ म्हणून या दर्जाकडे पाहावे लागेल.

अतिप्राचीन मराठीची मौखिक परंपरा, संस्कृतीचे जतन करणारी आमची लोकधारा, श्रेष्ठ संतांचे वाङमय, कवण-गीतांची, प्रबोधनाची परंपरा, धार्मिक-सांप्रदायिक उद्बोधक नीती परंपरा, प्राचीन ग्रंथ हा सर्व सर्व मराठीचा ऐवज कालानुकाल अभिजातच राहिला आणि ते सर्वज्ञातही आहे. एकाच वेळी सांस्कृतिक आणि त्याचवेळी सामाजिक वाङमयीन अशी तीन पदरी महत्ता मराठीची केवळ श्रेष्ठतम म्हणून सत्वर ओळखली गेली.

नेमकी ही महत्ता आता राजपदी आरूढ झाली, याचा आनंद अधिक सुखावणारा म्हणायला हवा. शिवाय शिक्षणातील पुस्तकांच्या बाहेर पण मराठीचे अथांग जग आहे. ज्यांनी आपल्या जिभेवर हजारो वर्षांपासून मराठी जतन केली आहे, या मराठीला भावाविष्कारांचा भाग बनवले आहे. समाजाच्या मध्यवर्ती या मराठीला ठेवले आहे. या आम जनतेचेही या अभिजात दर्जासाठी अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.

अभिजात ठरविण्याचे दंडक

हजारो वर्षांचे, त्यापेक्षाही अधिक भाषेचे वयोमान असावे.

अभिजात होण्यासाठी भाषा स्वयंभू असावी.

भाषेची साहित्याची परंपरा अस्सल हवी.

भाषेने इतर भाषांकडून उसनवारी घेतलेली नसावी.

भाषेत प्राचीन ग्रंथ, प्राचीन काव्य, प्राचीन परंपरा, शिलालेख, ताम्रपट आदी पायाभूत साधन सामग्रीचे पुरावे असले पाहिजे.

भाषेचा प्राचीन, आधुनिक गाभा कायम राहावा. आणि त्यासंबंधीचा मौल्यवान वारसा भाषेमध्ये असावा.

इतिहास आणि समृद्ध वारसा म्हणून मराठीने या सर्व अर्हता वस्तुतः कधीच्याच पूर्ण केलेल्या आहेतच, हे पण सत्य आहे.

मराठी अभिजात झाली - फायदे काय?

अर्थातच मराठी अभिजात होण्यात फार फायदे सकृत दर्शनी दिसतात. मराठीच्या सर्वांगीण विकासाकरिता केंद्र सरकार राज्याला दरवर्षी ९५० कोटी रुपये एवढे अनुदान देईल, अभिजात होण्याचे हे पहिले फळ.

मराठीच्या समग्र बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन यांना गती प्राप्त होईल. यासह सर्व अभिजात मराठी साहित्याचे संग्रहण, संवर्धन, संरक्षण, डिजिटायझेशन होईल. प्राचीन ग्रंथांच्या अनुवाद कार्याला मोठा वेग प्राप्त होईल. कमी नव्हे तर बारा हजारांपेक्षा जास्त राज्य-ग्रंथालयांचे यामुळे सक्षमीकरण, आधुनिकीकरण होईल.

मराठीच्या उत्कर्षासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना, तरुणांना, संधीसह भरीव आर्थिक सहाय्यही या अभिजात दर्जामुळे मिळेल. आणि ठळक गोष्ट म्हणजे भारत देशामधील ४५० विद्यापीठांमधून मराठी शिकवण्याची, संशोधन करण्याची सोय यामुळे होईल.

एक लेखक, भाषा प्रेमी, बोली अभ्यासक म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीला ह्या सर्व गोष्टींचा मनःपूर्वक आनंदच झाला. सकाळ दैनिकाच्या सर्व आवृत्त्यांसह ॲग्रोवनमधून मराठी भाषेविषयी मला सतत लेखन करता आले, यामुळे हा आनंद शतगुणित झाला आहे.

आता पुढची पावलं

मराठीला प्राप्त झालेला अभिजाततेचा दर्जा हा सांस्कृतिक विजयाचे सुचिन्ह आहे. आता पुढे केंद्रात तसेच राज्यांत मराठीची नवी संशोधन केंद्रे उभे राहतील. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लक्षणीय पुरस्कारांमध्ये मराठीपण राहील. शैक्षणिक संशोधन या क्षेत्रांत रोजगारांच्या, कौशल्यांच्या संधी उभ्या राहतील. सांस्कृतिक मंत्रालय, शिक्षण मंत्रालय येथे मराठीला सन्मानांची स्वतंत्र जागा मिळेल. राज्याचा मराठी विभाग मराठीला सत्वर सन्मान देईल, निधी वितरण करील.

आता मराठी बोली ज्ञानभाषा होण्याकडे लक्ष हवे. विज्ञान, तंत्रज्ञानाने मराठी अवकाश स्वीकारावा. त्यायोगे तरुणांना रोजगाराच्या संधीचे दार मोकळे व्हावे. मराठी भाषेचे न्यूनगंड गळावेत. मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढायलाच हवा. मराठीची हेळसांड कुठल्याही पब्लिक सेक्टरमध्ये होता कामा नये.

‘मराठीत बोला-लिहा-वाचा’ हा प्रेमळ सल्ला सर्वठायी रुजावा. समाजांच्या एकूण स्तरावर मराठीचा, बोलीचा, भाषेचा प्रसार प्रचार गतीने व्हावा. मराठीबद्दल शुद्ध अशुद्धतेच्या अवडंबराला, खोट्या वदंतेला फाटा मिळावा. या सर्व जबाबदाऱ्यांसह व या फलश्रुतींसह ‘अभिजात’ सन्मान घेऊन आपण उभे राहू या... चालत राहू... अखेर कवी वि. म. कुलकर्णींच्या शब्दात मायमराठीचे वैभव काय नि माय मराठीचा बुलंद वारसा काय, हे असे सांगता येते...

ज्ञानोबांची - तुकयांची

मुक्तेशाची - जनाईची

माझी मराठी चोखडी

रामदास - शिवाजींची

डफ - तुणतुणे घेऊन

उभी शाहीर मंडळी

मुजऱ्याची मानकरी

वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ

अभंगाच्या तालावर

कोवळीक विसावली

पहाटेच्या जात्यांवर!

कृष्णा - गोदा - सिंधुजळ

हिची वाढविते कांती

आचार्यांचे आशीर्वाद

हिच्यामुखी वेद होती।।

(लेखक ज्येष्ठ मराठी भाषा, बोली तज्ज्ञ असून महाराष्ट्र शासनाच्या भाषा समितीसह मराठी विद्यापीठ मसुदा समितीचे सदस्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT