Amaravati News : दुर्गम मेळघाटात पोषक आहाराअभावी कुपोषणाची समस्या गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर केव्हीके घातखेडच्या गृह विज्ञान शाखेकडून पुढाकार घेत कंदवर्गीय रताळू पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. कंदवर्गीय पिकाच्या लागवडीवरच मर्यादित न राहता त्यावर प्रक्रिया करून हा पोषक आहार वर्षभर उपलब्ध व्हावा यावर देखील भर दिला जात आहे.
आदिवासीबहूल मेळघाटातील नागरिकांच्या रोजच्या आहारात पोषक घटकांचा समावेश अभावानेच राहतो. जे उपलब्ध असेल त्याचा उपयोग रोजच्या जेवणात करून भूक भागविली जाते. त्याच कारणामुळे या क्षेत्रात कुपोषणाची समस्या गंभीर झाली आहे. राज्य सरकारकडून या भागातील कुपोषणमुक्तीसाठी विविध प्रकल्प राबविले जात असताना या समस्येचे निवारण गेल्या अनेक वर्षांत साध्य झाले नाही.
आहारात पोषक घटकाचा समावेश नसल्याने येथील नागरिकांची प्रतिकारशक्ती देखील कमी आहे. त्यामुळे ते आजाराला देखील लगेच बळी पडतात. यातूनच लाकटु या गावातील सर्वांनाच चिकुनगुनियाची लागण काही वर्षांपूर्वी झाली होती.
याची गांभीर्याने दखल घेत केव्हीके घातखेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अतुल कळस्कर यांच्या मार्गदर्शनात गृहविज्ञान शाखेच्या तज्ज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी जीवनसत्त्व अ व ॲनथ्रोसायनीन युक्त रताळी लागवडीला या भागात प्रोत्साहन दिले.
लाकटू गावातील कुंजीलाल पटोरकर या शेतकऱ्याच्या शेतावर ही लागवड करण्यात आली. या नावीन्यपूर्ण व पोषणयुक्त रताळूला मागणी वाढल्याने नजीकच्या काळात लागवड क्षेत्रातही वाढ नोंदविली गेली आहे.
तिरुअनंतपुरम (केरळ) येथील राष्ट्रीय कंद संशोधन केंद्राद्वारे विकसित भुसोना व भुकंती या दोन रताळू वाणाच्या लागवडीला केव्हीके घातखेडच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आले आहे. दुर्गम मेळघाटातील आदिवासी बांधवाना पोषक आहार मिळत कुपोषणमुक्ती साधली जावी, असा उद्देश यामागे आहे.- प्रणिता कडू, विषय विशेषतज्ज्ञ, गृहविज्ञान शाखा, केव्हीके घातखेड, अमरावती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.