Pesticide
Pesticide  Agrowon
ॲग्रो विशेष

Glyphosate Ban: ग्लायफोसेट बंदीमागचे अमेरिकन कनेक्शन माहित आहे का?

टीम ॲग्रोवन

केंद्र सरकारने (Central Government) देशात ग्लायफोसेट (Glyphosate) या तणनाशकाच्या (Weedicide ) वापरावर बंधनं घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या बंदीमागे एक अमेरिकन कनेक्शन आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाच्या निवाड्यानंतर ग्लायफोसेटवर बंदी (Ban Glyphosate) घालण्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली. भारतात खूप वर्षापासून ग्लायफोसेटवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

सध्या शेतीत तणं ही शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मजुरांचा तुटवडा असल्यामुळे हा प्रश्न चिघळला आहे. त्यामुळे शेतकरी तणनियंत्रणसाठी मोठ्या प्रमाणावर तणनाशकांवर अवलंबून आहेत. पण सरकारच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करता येणार नाही. परवानाधारक व्यावसायिक किटक नियंत्रकाशिवाय आता कोणालाही ग्लायफोसेटचा वापर करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गोची होणार आहे.

केरळ सरकारने जुलै २०२० मध्ये केंद्राकडे ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने ग्लायफोसेटच्या वापरवर बंधने घालण्यासाठी सर्व घटकांकडून तीन महिन्यांमध्ये सूचना मागविल्या होत्या. केरळ आणि तेलंगणा सरकारने यापुर्वीच ग्लायफोसेटच्या वापरावर बंदी घातली आहे.

ग्लायफोसेटवरच्या या बंदीमागे अमेरिकन कनेक्शनही आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये अमेरिकेतील न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यामुळे ग्लायफोसेट जगभरात चर्चेत आले. मोन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीने अमेरिकेतील एका कर्करोग (कॅन्सर) पिडित शेतकऱ्याला दंड आणि नुकसानभरपाई मिळून तब्बल २८९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे दोन हजार कोटी रूपये) द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मोन्सॅन्टोचे उत्पादन असलेल्या राऊंडअप (ग्लायफोसेट) तणनाशकाच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा त्या शेतकऱ्याचा दावा मान्य करत कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने हा निकाल दिला होता.

ड्वेन जॉन्सन (वय ४६) असे या शेतकऱ्याचे नाव असून ते कीड नियंत्रण व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्यांनी दरवर्षी ३० वेळा या प्रमाणात राऊंडअप तणनाशकाचा वापर केला. या तणनाशकाच्या वापरामुळे आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे सांगत त्यांनी मोन्सॅन्टो कंपनीविरूध्द न्यायालयात दाद मागितली होती. जॉन्सन यांचा आजार शेवटच्या अवस्थेत असून २०२० नंतर ते जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे या खटल्याची चार आठवड्यांत फास्ट्र ट्रॅक सुनावणी पूर्ण करण्यात आली.

ग्लायफोसेट विशेषतः राऊंडअपमुळे कॅन्सर होतो हे माहीत असूनही मोन्सॅन्टोने ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा नफ्याला प्राधान्य दिल्याचा आरोप जॉन्सन यांच्या वकिलांनी केला. मोन्सॅन्टोने आपल्या उत्पादनामुळे कॅन्सर होऊ शकतो असा धोक्याचा इशारा जॉन्सन आणि आपल्या इतर ग्राहकांना दिलेला नव्हती, असे न्यायालयाला आढळून आले.

मोन्सॅन्टोने या निकालाला वरच्या न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले होते. सुमारे आठशेहून अधिक शास्त्रीय अभ्यास आणि परीक्षणांमधून ग्लायफोसेट कर्करोग होण्यास कारणीभूत नाही, हे सिध्द झालेले असून या निकालामुळे ती वस्तुस्थिती बदलत नाही, असेही कंपनीने म्हटले होते.

यूनायटेड स्टेट्स एन्व्हार्यनमेंट प्रोटेक्शन एजन्सीने सप्टेंबर २०१७ मध्ये ग्लायफोसेटमुळे कर्करोग होत नसल्याचा अहवाल दिला होता. परंतु ग्लायफोसेट कर्करोग होण्यास कारणीभूत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही २०१५ मध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकांच्या यादीमध्ये ग्लायफोसेटचा समावेश केलेला आहे. दरम्यान, अमेरिकेत जॉन्सन यांच्याप्रमाणे आणखी पाच हजार जणांनी मोन्सॅन्टोच्या विरोधात अशाच स्वरूपाच्या याचिका दाखल केलेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT