Satara News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागील वर्षी बियाणे कमी पडल्याने शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) केली होती. यावर्षी कृषी विभागाने ४७ हजार ३३९ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवली आहे.
उसाचे क्षेत्र वाढले असले तरी ज्वारीचे दर (Soybean Rate) वाढल्याने सोयाबीनच्या बरोबरीने खरीप ज्वारीकडेही शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे.
सध्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकांतून शेतकऱ्यांना अपेक्षित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करायला हवेत. अन्यथा केवळ बैठक घेऊन ऐन हंगामाच्या तोंडावर बियाण्यांची टंचाई जाणवते.
जिल्ह्यात उसाखालील क्षेत्र वाढत असले तरी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे बियाणे महाग असल्याने शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांची पेरणी केली होती. सध्या ज्वारी व कडब्याच्या दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात संकरित ज्वारीच्या लागवडीकडेही शेतकरी वळू शकतो.
सोयाबीनचे दर यावर्षी वाढले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. तरीही काही शेतकऱ्यांनी दर वाढेल या अपेक्षेने सोयाबीन साठवणूक करून ठेवली आहे. या शेतकऱ्यांना बियाण्याच्या वेळी चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.
ज्वारीचे दर वाढलेले असल्याने आतापर्यंत दुर्लक्ष केलेला शेतकरी पुन्हा ज्वारीकडे वळू शकतो. त्यामुळे सोयाबीन आणि ज्वारीचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करायला हवेत. जिल्ह्यातील खरिपाचे सरासरी क्षेत्र तीन लाख ९७ हजार ३४८ हेक्टर आहे.
त्यासाठी ४७ हजा३ ३९ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. तसेच एक लाख ३६ हजार ५०० टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात ६३ हजार ५६१ टन खत उपलब्ध आहे. यामध्ये मागील हंगामातील ५५ हजार ८६२ टन खत शिल्लक आहे. तर एक एप्रिलपासून सात हजार ६९९ टन खतपुरवठा केलेला आहे.
रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच खतांच्या सुयोग्य समतोल वितरणासाठी जिल्ह्यात १२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते बियाणे व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले द्यावीत. तसेच शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठांविषयी शंका असल्यास संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.