Jalgaon News : मागील काही दिवसांपासून खानदेशात ढगाळ, विषम वातावरण आहे. याचा फटका बाजरी पिकास बसत असून, उगवणीवरही परिणाम झाला आहे. बाजरीची पेरणी खानदेशात स्थिर आहे. अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्यासह धान्यासाठी बाजरीची पेरणी केली आहे. पेरणी जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे.
धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर बाजरी पीक आहे. खानदेशात कमी पाऊसमान राहील्यास पेरणी साडेपाच हजार हेक्टरपर्यंत केली जाते. तर पाऊसमान चांगले राहील्या पेरणी सहा ते साडेसहा हजार हेक्टरवर केली जाते. या वेळेसही पेरणी साडेपाच हजार हेक्टरपर्यंत झाल्याची माहिती आहे. पेरणी जानेवारीतच अनेकांनी केली. तसेच या महिन्यातही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.
परंतु मागील महिन्यात थंडी होती. या काळातही बाजरीच्या उगवणीवर परिणाम झाला. तसेच या महिन्यातही किमान तापमान सरासरी १३ अंश सेल्सीअस एवढे राहीले आहे. बाजरीच्या उगवणीसाठी कमाल ३५ व किमान १५ ते १६ अंश सेल्सीअस तापमान अनुकूल मानले जाते. परंतु तापमान कमी आहे. त्यात ढगाळ वातावरणही मागील काही दिवसांपासून आहे.
यामुळे कोवळ्या बाजरी पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भावही काही भागात दिसत आहे. ही समस्या अधिक फोफावलेली नाही. मोठ्या किंवा एक महिन्याच्या बाजरी पिकात अळीची समस्या नाही. परंतु ढगाळ व विषम वातावरणामुळे पिकवाढीवर काहीसा परिणाम झाला आहे. एक महिन्याच्या पिकात दोन वेळेस सिंचन झाले आहे.
कमाल क्षेत्रातील बाजरी पिकास पाट पद्धतीने खानदेशात सिंचन केले जात आहे. तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात केळी पिकातही बाजरीची पेरणी झाली आहे. कंदेबाग केळीची काढणी ९५ ते ९८ टक्के पूर्ण झाल्यानंतर ही पेरणी शेतकऱ्यांनी केली. केळी पिकातील बाजरीला ठिबकची सुविधा आहे. यामुळे पिकाची वाढ जोमात आहे. दोन वेळेस खतेही शेतकऱ्यांनी दिली आहेत. काही शेतकऱ्यांनी एक वेळेस अळीनाशकाची फवारणीदेखील पिकात घेतली आहे. पिकवाढीसाठी काही शेतकऱ्यांनी संप्रेरकांची फवारणीदेखील घेतली आहे.
पीक स्थिती अशी...
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर, जामनेर या भागात बाजरी पीक आहे. केळी पिकाच्या बेवडसाठीदेखील अनेकांनी बाजरीची पेरणी केली आहे. तर धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा,साक्री व धुळे या सर्वच भागात कमी अधिक क्षेत्रात बाजरी पीक आहे.
नंदुरबारातील नवापूर, नंदुरबार भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. अन्य भागात कमी पावसामुळे किंवा विहिरींची जलपातळी घटल्याने पेरणी होवू शकलेली नाही. यामुळे क्षेत्र सुमारे ७०० ते ८०० हेक्टरने कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.