Pune News : लोकसभेच्या गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पारंपरिक काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला अनिल शिरोळे आणि नंतर स्व. गिरीश बापट यांनी मोदी लाटेत भाजपकडे तीन साडेतीन लाखांच्या मताधिक्याने खेचून आणला. यानंतर मात्र राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरच्या पुण्यामधील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.
याच समिकरणांमध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा कसबा पॅटर्न तयार झाला आणि दिवंगत गिरीश बापट यांचा बालेकिल्ला असलेला कसबा महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने काबीज केला. त्याच कसबा पॅटर्नची संधी लोकसभेला साधणार की हुकणार यावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
कसबा पॅटर्नच्या माध्यमातून काँग्रसच्या विजयानंतर, आत्मविश्वास गमावलेल्या भाजपने खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेणे जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पोटनिवडणूक टाळल्याबाबत झालेल्या न्यायालयीन याचिकेवर देखील उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने ताकसुद्धा फुंकून पिण्याचे धोरण अवलंबत, लोकसभा मतदार संघ बळकट करण्यासाठी कोथरूडच्या नाराज माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
या सर्व राजकीय घडामोडींनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी देऊन हाच पॅटर्न पुन्हा राबविण्याचा प्रयत्न करत, पुन्हा विजयश्री खेचून आणण्यासाठी लढाई सुरू केली आहे.
तर भाजपने देखील सर्व शक्यतांचा विचार करून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन, अनिल शिरोळे, स्व. गिरीष बापट यांच्या विजयाची घौडदौड कायम ठेवण्याचा आटापिटा सुरू केला आहे. मोहोळ यांना उमेदवारी देताना, भाजपच्या श्रेष्ठींना प्रबळ दावेदार असलेल्या जगदीश मुळीक यांची समजूत काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
मुळीक यांची नाराजी जरी दूर झाली असली तरी, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने कोथरूडमध्येच एकवटलेली सत्तेची पदे इतर मतदार संघावर अन्यायकारक ठरत असल्याची भावना भाजपच्या इतर विधानसभा मतदार संघांत असल्याची चर्चा आहे. तर पुण्यातील सहाही विधानसभा मतदार संघ महायुतीकडे असल्याने या मतदार संघांतून मोहोळ यांना किती मताधिक्य मिळते हा चर्चेचा विषय आहे.
‘वंचित’, ‘एमआयएम’चा फायदा कोणाला?
वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे, ‘एमआयएम’चे अनिस सुंडके यांची उमेदवारी धंगेकर यांना तोट्याची तर मोहोळ यांना फायदेशीर ठरण्याची चिन्हे असल्याची चर्चा आहे.
मोदी, गांधीच्या सभेने रंगत
पुण्याची जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेसकोर्स येथे सभा घेतलीतर राहुल गांधी यांनी धंगेकरयांच्यासाठी ‘एसएसपीएमएस’च्या पटांगणावर सभा घेतली. दोन्ही सभांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.
पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर
पुणे मनपामध्ये प्रशासकीय राजवटीमधील विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने तो प्रचाराचा मुद्दा केला आहे. यामध्ये नदी सुशोभीकरण प्रकल्प, पर्यावरणाची हानी, बालभारती येथील प्रस्तावित रस्ता, शहरातील रस्ते आणि उड्डाणपुलाची रखडलेली कामे हे मुद्दे प्रचाराचे केले आहेत.
मेट्रो, इनोव्हेशन हब हे महायुतीचे मुद्दे
पुणे शहरातील मेट्रोचे जाळे, आयटी पार्कमधील तरुणांसाठी नवनवी इनोव्हेशनसाठी केंद्र सरकारचे प्रोत्साहन हे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रचारात आणले आहेत.
मुरलीधर मोहोळ यांच्या सकारात्मक बाजू
नगरसेवक ते महापौर असा प्रवास
कोरोना काळात उत्तम काम
संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम
शहरातील कसबा वगळता सर्व भाजपाचे आमदार खासदारसोबत
मोदी, फडणवीस यांचा विश्वासार्ह चेहेरा
मोहोळ यांच्या नकारात्मक बाजू
मंत्री चंद्रकांत पाटील, स्वतः मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी हे सर्व कोथरूडमधीलच असल्याने सर्व महत्त्वाची पदे कोथरूडमध्येच
नदी सुधार प्रकल्प, बालभारती रस्ता पर्यावरणीय प्रश्नांबाबत सजग पुणेकरांसोबत नसल्याचा आरोप
लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार जगदीश मुळीक यांची नाराजी
रवींद्र धंगेकर यांच्या सकारात्मक बाजू
शिवसेना शाखाप्रमुख, मनसेचे नगसेवक ते कॉंग्रेसचे आमदार
कसबा पॅटर्नमुळे देशभरात नाव
शहराच्या मध्यवस्तीत सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध
हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ
धंगेकर यांच्या नकारात्मक बाजू
स्वतः एकमेव आमदार असून, इतर विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या मदतीचा अभाव
काँग्रेसकडून प्रभावी प्रचार यंत्रणेचा अभाव
आबा बागुल यांची नाराजी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.