Kaikadi and Godavari Donkey Agrowon
ॲग्रो विशेष

Indigenous Donkey Breeds: कैकाडी-गोदावरी गाढवांना मिळणार राज्यात ओळख

Donkey Recognition: महाराष्ट्रात कैकाडी व गोदावरी या स्थानिक गाढवांच्या जातींना शासकीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विशेष मोहिम सुरू केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: ‘माणसाची दुःख सारी पाठीवर घेत, तरी त्याला म्हणत्याती गाढवाची जात’ या शब्दात शाहीर दादा कोंडके यांनी गाढवाच्या उपयोगीतेचे वर्णन केले होते. आजही अनेक समाजात ओझे वाहण्याकरिता गाढवांचा उपयोग होतो. त्याचीच दखल घेत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने राज्यात गाढवांच्या दोन जातींना ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

देशात अवर्णित जनावरांची संख्या शून्यावर आणण्यासाठी कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू आनुवांशिक संशोधन ब्यूरोद्वारा पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील अशा अवर्णित जनावरांच्या सर्व्हेक्षणाचे काम ‘माफसू’वर सोपविण्यात आले आहे. त्यानुसार, माफसूने पश्‍चिम विदर्भात आढळणाऱ्या तसेच कैकाडी समाज बांधवांद्वारे संगोपन होणाऱ्या कैकाडी तसेच गोदावरी गाढवाविषयी माहिती संकलनाचे काम हाती घेतले आहे.

या विषयी माहिती देताना माफसूचे डॉ. प्रवीण बनकर यांनी सांगितले, की कैकाडी गाढव हे अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात आढळते. याचा रंग राखाडी असून याचे वैशिष्ट्य म्हणजे उंच असते. अधिक तापमानातसुद्धा ५० ते ६० किलो वजन सहज वाहून नेते. काम नसेल त्या वेळी कैकाडी समाज मराठवाड्याकडे स्थलांतरीत होतो. तेथे वाळू उपसाकामी गाढवांचा वापर होतो.

त्यानंतर पावसाळ्यात ते विदर्भात परततात. गाढवांना वयाच्या दीड वर्षापासून कामाला जुंपले जाते. त्यानंतर ते आठ दहा वर्षे काम करतात. २०१२ मध्ये ६९ हजार असलेल्या या गाढवांची संख्या आज सुमारे ३२ हजार आहे. कैकाडी, भोई, वडार समाजात त्यांचे संगोपन होते. त्यातही कैकाडी समाज परंपरागत गेल्या अनेक वर्षांपासून याचे संगोपन करीत असल्याने ‘कैकाडी गाढव’ म्हणून याला ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे.

गोदावरी गाढव

कैकाडीप्रमाणेच मराठवाड्यात गोदाथडी गाढवांचे संगोपन धोबी समुदाय आणि भांडे बनविणाऱ्यांकडून होते. यामुळेच यांना गोदावरी गाढव म्हणून ओळख मिळवून देण्याचा प्रस्ताव आहे. संपूर्ण मराठवाडा, कर्नाटक आणि तेलंगणालगतच्या भागात त्यांचा प्रसार झाला आहे. ओढकामासाठी यांचा वापर होतो. वीटभट्टयांवर वीट, वाळू तसेच इतर साहित्याची वाहतूक यांच्याद्वारे होते. गाढवांना मराठवाड्याच्या सांस्कृतिक वारशातदेखील स्थान आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यात विडा गावात होळीच्या निमित्ताने गावातील नवीन जावई गाढवावर स्वार होतो. ही परंपरा ९० वर्षांहून अधिक काळ पाळली जात आहे.

कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्यासह संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांच्या पुढाकारातून राज्यातील अवर्णित जनावरांना ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. या अंतर्गत गोदावरी गाढव विषयक डॉ. जी. आर. चन्ना, डॉ. पी. व्ही. जाधव, तर कैकाडी गाढवाच्या सर्व्हेक्षणाचे काम डॉ. प्रवीण बनकर यांच्याद्वारे होत आहे.
डॉ. अनिल भिकाने, विस्तार शिक्षण संचालक, माफसू, नागपूर
कोणाला मूर्ख संबोधण्यासाठी गाढव शब्दाचा वापर केला जातो. मात्र गाढव हे ज्या पाण्यात आपली प्रतीमा दिसेल असे स्वच्छ पाणीच पितात. अनेकांना या विषयी कदाचित माहिती नाही. ओढकामासाठी त्यांचा उपयोग होतो. जागतिकस्तरावर ८ मे हा गाढव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
डॉ. प्रवीण बनकर, पशुतज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

SCROLL FOR NEXT