Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : जल व्यवस्थापनात मौल्यवान कार्य करणाऱ्या ‘जलदुर्गा’

Jaldurga News : सामाजिक सुधारणांबाबत बोलणारे जितके महत्त्वाचे असतात, त्यापेक्षाही प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारे लोक अधिक महत्त्वाचे असतात.

Team Agrowon

Irrigation Management : सामाजिक सुधारणांबाबत बोलणारे जितके महत्त्वाचे असतात, त्यापेक्षाही प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारे लोक अधिक महत्त्वाचे असतात. पाणी व पर्यावरण विषयात काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव व्हायला हवा.

नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर पाणी व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पुणे येथील सहा रोटरी क्लब यांच्या मार्फत रोटरी जलदूर्गा गौरव पुरस्कार सोमवारी (ता. २३) प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, कर्वेनगर येथील डाॅ. भानू नानावटी काॅलेज ऑफ आर्किटेक्चर यांचा मोलाचा सहयोग होता.

या जलदुर्गांच्या कामांचा अल्पसा परिचय ः
१) महिला गटाद्वारे तलावांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या सरिता मेश्राम -

गोदिंया जिल्ह्यातील बारटोला येथील सरिता मेश्राम यांनी आजूबाजूच्या गावातील मासेमारी करणाऱ्या महिलांचा गट तयार करण्याचा वेगळा प्रयोग राबवला. वंचित आणि अतिवंचित समाजातील महिलांना प्रेरणा देत गावातील तलावांतील मासेमारीचा ठेका घेतला.

या वेळी या महिलांच्या कुटुंबीयांचा व अन्य ग्रामस्थांचा मोठा विरोध आणि टीका सहन करावी लागली. पण अनावश्यक दबाबाला न जुमानता महिलांना आत्मविश्वास दिला. त्यातून गटाचा व्यवसाय तयार झाला, तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला.

जैवविविधतेची उत्तम माहिती, छातीइतक्या पाण्यातही उभे राहून काम करण्याची जिद्द, शासकीय अधिकारी व गावातील स्थानिक नेतृत्वाशी संवाद साधण्याचे कौशल्य यातून या महिला मासेमारी व्यवसायात यशस्वी झाल्या आहेत.

मच्छीमार समाजातील स्त्रियांचा आवाज ग्रामसभेत उठवून रोजगार हमी योजनेत तलाव संवर्धनाच्या कामाचा समावेश करण्यासाठी ग्रामसभांमध्ये ठराव करण्यास भाग पाडले.

त्यातून शासनापर्यंत झगडून आवश्यक धोरणात्मक बदल करून घेतले. यातून सर्वदूर ग्रामीण महिलांना रोजगाराची कायमस्वरूपी उपलब्धता झाली आहे. केवळ मासेमारीचा व्यवसाय करण्यावरच न थांबता आपला व्यवसाय ज्या तलावांवर अवलंबून आहे, अशा गावागावांतील तलावांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातून झालेले फायदे ः
- ५९ स्थानिक माशांच्या जातींचे संरक्षण व संवर्धन.

-२१४ प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन.

- ६६ प्रकारच्या पाण्याशी संबंधित पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन.

- तलावातील माशांच्या एकूण संख्येत सहा ते आठ पटीने वाढ झाली, तर वजनात अडीच पट वाढ शक्य झाली.

३५० गावे जलस्वयंपूर्ण करणाऱ्या नूतन देसाई

नूतन देसाई या मुंबईच्या मूळ निवासी असल्या, तरी त्यांची कर्मभूमी आहे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त असे बीड आणि जालना जिल्हे. २०१६ पासून आजवर ३५० हून अधिक गावांना जलस्वयंपूर्ण करण्यासाठी ‘समस्त महाजन प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ओढ्या-नाल्यांना पुनरुज्जीवनाचे काम त्यांनी केले आहे. त्यात पुढाकार, नियोजन व प्रत्यक्ष जमिनीवर उभे राहून काम करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नूतन देसाई सहभाग राहिल्या आहेत.

त्यांच्या कामातून झालेले फायदे ः
- ३५० गावांमधील लोक सहभाग मिळवत तलाव व नाल्यातील गाळ काढला. तसेच शेताशेतामध्ये कंपार्टमेंट बंडिंगचे काम.

- या कामासाठी २५ खोदाई मशिन पुरविण्यात आले. या मशिनचे भाडे समस्त महाजन ट्रस्टने दिले, तर डिझेल व इंधनाचे पैसे लोक सहभाग किंवा सरकारी योजनांतून उपलब्ध करण्यात आले. यातून शेकडो कोटी लिटर पाणी साठविण्याची व्यवस्था निर्माण झाली.

- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना शेततळी बांधून दिली. या बरोबरच तेथील पाच किलोमीटर नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम केले. यातून दहा गावांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.

- गेली चार वर्षे जालना शहरातील सीना व कुंडलिका या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम सुरू असून, त्यातील कचरा, घाण व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नैसर्गिक साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लोकसहभागातून या नद्यांमध्ये येणारे सांडपाणीही शुद्ध करण्यासाठीचे नियोजन सुरू आहे.

नद्यातील प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत शैलजा देशपांडे
नद्यांना माता म्हटले जात असले, तरी त्यांचे मातेप्रमाणे आपण काळजी घेतो का? तर नाही. मात्र पुणे येथील शैलजा देशपांडे गेल्या पंधरा वर्षांपासून विशेषतः पुण्यातील मुळा, मुठा, राम आणि पवना नदी या नद्यांची काळजी एखाद्या मातेप्रमाणे घेतता.

नद्यातील अतिक्रमण, त्यात पडणारा राडारोडा, टाकले जाणारे निर्माल्य, गणपतीसह विविध मूर्त्यांचे विसर्जन, मिसळले जाणारे सांडपाणी अशा अनेक प्रदूषणासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून महापालिका कमिशनरांपर्यंत सर्व घटकांच्या प्रबोधनासाठी शैलजा सातत्याने प्रयत्न करत आहेत.

लोकांना नदीशी जोडणे, त्यातील जैवविविधता आणि शुद्धीकरणाबाबत संवेदना, जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे काम त्या ‘जिवित नदी’ या संस्थेमार्फत राबवतात. उदा. ‘क्लिक द रिव्हर’ ‘पेंट द रिव्हर’,‘रिव्हर वॉक’, ‘कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्प’, ‘नदी स्वच्छता उपक्रम’, ‘नदी विषयावर प्रदर्शने’, ‘नदी महोत्सव’, ‘दत्तक घेऊ किनारा’ इ. उपक्रम राबवले जातात.

- शहरांच्या विकास आराखड्यात नदी व तिची जैवविविधता रक्षणाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरतात.

- आपण नागरीकच नदी प्रदूषणाला जबाबदार आहोत आणि वर उपाययोजना म्हणून ‘शाश्‍वत जीवनशैली’ या पर्यायी जीवनशैलीच्या प्रसारासाठी चौफेर अभियान राबवतात.

- गेली तीन, चार वर्षे पुण्यातला नदी सुधार प्रकल्प पर्यावरणासाठी आणि पुणेकरांसाठी कसा धोक्याचा आहे, याची अभ्यासपूर्ण मांडणी त्या करतात. त्याला विरोध करण्यासाठी जिवाचे रान करत आहेत.

नदीच्या पुराला नियंत्रणात आणणाऱ्या मुग्धा सरदेशपांडे

चिंचवड येथील मुग्धा सरदेशपांडे या साखरपा, जि. रत्नागिरी येथील काजळी नदीच्या पुरावरील नियंत्रणासंदर्भात गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. सातत्याच्या पाठपुराव्यातून ७० वर्षे दर पावसाळ्यात पूर येणाऱ्या काजळी नदीला नियंत्रणात ठेवण्यासाठी शास्त्रशुद्ध कामे केली आहेत.

विशेषतः एक कि.मी. नदीतील दीड लाख घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात आवश्यक तिथे तज्ज्ञांना बोलावणे, उत्तरे शोधणे, निधी जमवणे, लोक सहभाग मिळवणे इ. कामामध्ये त्यांचा पुढाकार होता.

निधीसाठी सरकार दरबारी अर्ज विनंत्या, खेटा मारण्यासोबतच सर्वसामान्यांचेही उंबरे झिजवत लोकसहभागातून निधी जमवला. हे पैसे कमी पडले म्हणून त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने १२ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून कामाला हातभार लावला. ते कर्ज आता त्यांचे कुटुंब हप्त्याहप्त्याने फेडत आहेत.


- या व्यतिरिक्त काही वर्षांपूर्वी युनिसेफच्या प्रौढ साक्षरता अभियानात योगदान.

- गेली २२ वर्षे विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी यांच्या चिंचवड केंद्रात प्रमुख म्हणून जबाबदारी. या केंद्राद्वारे विद्यार्थी, आदिवासी, वृद्ध, अपंग अशा विविध समाज घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवले जातात.

- कोविड योद्धा म्हणूनही त्यांनी कोविड काळामध्ये भरीव कामगिरी.

- नदीविषयक सामान्य ज्ञान वाढवाणाऱ्या ‘नदी की पाठशाला’ हा उपक्रमही राबवतात.

आदिवासींचे हक्क, जबाबदारीसाठी लढा देणाऱ्या इंदवी तुळपुळे -

गेली ४० वर्षे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील आदिवासी समूहांसोबत लोक केंद्री व पर्यावरण स्नेही विकासाच्या दिशेने वन निकेतन या संस्थेच्या आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या माध्यमातून काम सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात जलसंधारणाचे काम केला. त्यानंतर जंगल, जमीन, पाणी यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवरील आदिवासींच्या उपजीविकांविषयक संवैधानिक हक्कासाठी लढे दिले. हक्कासोबतच या संसाधनांच्या संवर्धनाची व व्यवस्थापनाची ही जबाबदारीही आदिवासी समाजावर येत असल्याची जाणीव त्या करून देतात.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील १२ गावांमध्ये पाणलोटक्षेत्र विकासाची ‘माथा ते पायथा’ या तत्त्वावर कामे यशस्वी केली. जलसाठे निर्माण होण्यासाठी छोटे वनतलाव, शेततळी बनविण्यात आली. जुन्या तलावांतील गाळ काढण्याची कामे केली.

हे सर्व ग्रामस्थांच्या संपूर्ण सहभाग, जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी व सामान्यांकडून देणग्या मिळवून केले. नादुरुस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे केली. पाणीविषयक कामाबरोबरच अदिवासींच्या सर्वांगीण विकास, शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास यासाठी त्यांचे भरीव योगदान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT