Jagran Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : जागरण

Article on Jagaran : जागरणाचा दिवस कलतो. दारातल्या मांडवात माणसांची वर्दळ वाढते. अंधारासोबतच वाघ्या-मुरळीही डुलतच येतात. बेलभंडार उधळला जातो. भंडाऱ्याचा भडका उडतो, खोबऱ्याचे कुटके उडतात.

Team Agrowon

समीर गायकवाड

Village Story : गावाकडं उपवर मुलगा, मुलगी असलेल्या घरात लग्नाची चर्चा सुरू होताच कर्ती मंडळी नातलगात, सोयऱ्याधायऱ्यात, मित्रमंडळीत निरोप देऊ लागतात. योग्य स्थळ मिळावे म्हणून लक्ष ठेवून राहतात. मध्यस्थाकडून निरोप आला, की आधी जुजबी माहिती दिली- घेतली जाते. यातून एकमेकांचा अंदाज काढला जातो.

हा टप्पा पार पडला, की जाणती मंडळी नव्या पाहुण्याचं घर बघायच्या निमित्ताने जाऊन चाखाचोळा घेऊन येतात. घर बरं वाटलं, माणसं चांगली वाटली की मग गाडी पुढे सरकते. वर-वधू बघण्याचा दिवस मुकर्रर केला जातो. डझनभर मंडळी हे कार्य पार पाडण्यास जातात. तिथं इतर गोष्टींचा अंदाज लावला जातो. स्थळ पसंत पडलं की बैठकीचे वेध लागतात.

ही बैठक महत्त्वाची असते; कारण निम्मी लग्ने याच टप्प्यात फिसकटतात. देण्याघेण्याची, मानपानाची, विवाहकार्याची सगळी बोलणी यात पक्की होतात. घासाघीसही होते. मध्यस्थ असणारे भाऊसाहेब, रावसाहेब, अण्णासाहेब दोन्ही बाजूंच्या लोकांचा कल घेत अंदाज काढतात. एका मध्यमार्गावर बैठकीत एकमत होते.

तारीख ठरते. कार्यालय पक्के होते. पत्रिका छापून वाटून होतात. दोन्ही घरांत लगीनघाई सुरू होते. साखरपुडा होतो. गडंगनेरांची रांग लागते. पाव्हणेरावळे घरात ठाण मांडून बसतात. दारापुढे मांडव उभा राहतो. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडतो.

थाटामाटात लग्न लागतं. त्यात रुसवेफुगवेही होतात. कुलवऱ्यांची कलकल वाढत जाते. म्हातारेकोतारे एका कोपऱ्यात बसून अडकित्त्यात सुपारी कातरत आस्थेवाईक चौकशांचे बारीक दळण दळत बसतात. वरमायांचा तोरा न्याराच असतो, विहिणींच्या तऱ्हा आगळ्याच असतात, पोट्टे सगळ्याना भंडावून सोडतात, वाजंत्री कहर करतात,

अक्षता वाटून होतात आणि भटजीबुवा एकदाचा ‘स्वस्ति श्री गणनायकम्’चा परिचित चालीतला स्वर आळवतात, मग कुठे नवरानवरीचा जीव भांड्यात पडतो. अंतरपट बाजूला होताच लाजत, हसत ते दोघे एकमेकांना पुष्पहार घालतात. लग्न लागतं. सप्तपदीच्या फेऱ्या होतात. आहेर होतात. रुखवताचा भाव वाढतो. जेवणावळी उरकतात. दिवस मावळेपर्यंत सगळे पांगतात. मोजके सोयरे उरतात.

नव्या नवरीसोबत एक अनुभवी बाई पाठराखीण म्हणून तिच्या सोबत सासरी येते. ती नव्या नवरीला एकटं वाटू नये म्हणून सदान् कदा तिच्या भोवती फेर धरून राहते. तिला धीर देतानाच घरातल्या माणसांना जोखण्याचे काम ती करत असते. पोरीची नणंद कशी आहे, जावा काम करतात की नाही, सासू किती कडक आहे, सासरा चांगला आहे की नाही, दीर कामधंदे करतात की नाही, घराची आर्थिक स्थिती कशी आहे,

नवरा मुलगा कसा वागतो, तो काही कामधाम करतो की नाही अशा अनेक प्रश्‍नांवर ती आपले मत बनवत असते. त्यावरून निष्कर्ष काढून ‘आपल्या साळूचं सासर लई भारी किंवा लई मोक्कार’ यातला एखादा शेरा ती देणार असते. तसेच सासरी कसं वागायचं, कुणापुढं झुकायचं आणि कुणाला वाकवायचं याचे कानमंत्रही ती नवरीला देते.

लग्नानंतर पुढचे विधी सुरू होतात. देवदर्शनाची वारी होते. कुलदैवताला नमस्कार होतो. कुलदेवतेला चोळीबांगडी होते. नवं जोडपं दिसंल त्या देवाच्या पायी मस्तक टेकवतं. पुढच्या आयुष्यासाठी मागणं मागितलं जातं. कातावून गेलेल्या नवरानवरीची थोडी भीड चेपते. स्पर्शखेळासोबतच नेत्रपल्लवीही सुरू होते. आता जागरण-गोंधळ झालं, की मिलनाची ती घडी काही घटिकांच्या अंतरावर आहे याची त्यांना जाणीव झालेली असते. दोघेही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.

जागरणाचा दिवस कलतो. दारातल्या मांडवात माणसांची वर्दळ वाढते. अंधारासोबतच वाघ्या-मुरळीही डुलतच येतात. बेलभंडार उधळला जातो. भंडाऱ्याचा भडका उडतो, खोबऱ्याचे कुटके उडतात. संबळ वाजू लागतो. ढोलकी कडाडतात. दुमडी ताल धरते. हातातली घुंगरं थिरकावत मुरळी ठेक्यात गाऊ लागते- ‘माझ्या मल्हारी रायाचा लगीनसोहळा गाजतो, नवरी झाली बाणाई, दारी चौघडा वाजतो...’ यजमानाकडची पोरंठोरं मुरळीला नाचण्याचा आग्रह करू लागतात. नवखी मुरळी लाजू लागते. तिचं लाजणं रंगत जातं. काही वेळाने गोंधळ फिका वाटू लागतो. मग वाघ्या पुढं सरसावतो. पाय थकलेले असले तरी ठेका धरू लागतो.

हळदीत न्हाऊन निघालेला प्रौढत्वाकडे झुकू लागलेला वाघ्या ताल धरू लागताच मुरळीला नकळत हुरूप येतो. खऱ्या अर्थाने जागरण-गोंधळ सुरू होतं. प्रत्येक नवरानवरीचं पहिलं जागरण-गोंधळ म्हणजे एक सुरस कथाच असते. ते रात्रभर तेलाची धार लावून बसतात. लोक येतजात असतात. मांडवात जेवणावळी सुरूच असतात.

भकाकणाऱ्या लाइटच्या फोकसभोवती चिलटांचा धुडगूस सुरू असतो. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचे लाउडस्पीकरचे कर्णे नंतर गळाटतात. हौशेनवशे जागरणात सामील होतात. पानाची कळी खुडत चुना लेपला जातो, अडकित्त्यात अलगद सुपारी कातरत कातरत तिच्या चिरफाळया उडत राहतात.

पानविडे रंगत जातात, त्याची पिंक हवेतून कारंजे उडवत पानगंध पसरवते. नुकत्याच माहेरी आलेल्या लेकुरवाळ्या पोरीबाळींची चिमणीपाखरं दिवसभर हुंदडून रात्री उशीरपर्यंत जागं राहून अलगद आईच्या मांडीवर गाढ झोपी गेलेली असतात. आजूबाजूच्या म्हाताऱ्याकोताऱ्या बाया डोक्यावरचा पदर सावरत हनुवटीला हात लावून बसत नवरीचा अंदाज घेत तिचा प्रपंच कसा नांदणार याचा अंदाज बांधत राहतात.

एखादी भोचक बाई त्यात संधी सांधून शेरेबाजी करत असते. नवरीच्या कलवऱ्यांचा उत्साह काही केल्या मावळलेला नसतो; पण एकसारखं बसून तिच्या पाठीची कमान मोडलेली असते. तेल घालून कंटाळलेल्या त्या जोडप्याला वाघ्या-मुरळीच्या चहापानाच्या निमित्ताने ब्रेक मिळतो तेव्हा त्यांच्यात अत्यंत आकर्षक नेत्रपल्लवी होते, तिच्या हिरव्याकंच बांगड्या किनकिनतात. मांडी घातल्याने पायांना रग लागलेली असते. नकळत तिच्या पायाची करंगळी मातीत रुतते कारण त्याने हळुवार हात फिरवत फिरवत तिच्या मांडीवर आपलं ओझं टाकलेलं असतं.

चहापानाच्या विश्रांतीनंतर सर्वांची नजर चुकवत ती चोरून त्याच्याकडे पाहत असते. खरे तर तिला वाटत असते, की आपल्याकडे कुणाचेच लक्ष नसावे पण तिचे आडाखे चुकीचे असतात. सगळ्यांच्या चोरट्या नजरा तिच्यावरच तर रोखलेल्या असतात. हळूच ती त्याला चिमटा काढते. त्याचे ते अवघडलेपण उपस्थित पुरुषांच्या नजरेतून सुटत नाही. आपल्या संसाराच्या लोणच्यात कैरीगत मुरलेल्या बायकोच्या कोपराला ढूसण्या देत जुने झालेले नवरे विचारतात, ‘‘तू बी अशीच व्हतीस ना!’’

त्या प्रश्‍नानं त्या सादळलेल्या बिस्किटाच्या बायकोचे गाल लाजून आरक्त होतात. जुनाट तरकटी जुनाट खोंडांना मात्र या सर्वांत कशात स्वारस्य नसते, ते मात्र वाघ्याला ‘दमाने घे रे बाबा, नेमाने होऊ दे’ अशी आर्जव करत राहतात. मधूनच तरणी पोरं उठून नाचून आपली हौस भागवून घेतात. ही नाची पोरं थकत नाहीत, पण दमलेला वाघ्या आभाळातल्या चान्न्या बघून वेळवख्ताचा अंदाज बांधतो. दरम्यान, मध्यरात्र उलटून साखरझोपेचा गारवा सुरू झालेला असतो. निम्म्या लोकांचे डोळे पेंगू लागले की नवरानवरी डोळे भरून एकमेकाला पाहतात. नेमका हा क्षण टिपून झाला की वाघ्या-मुरळी जागरणाच्या अखेरच्या टप्प्यात येतात.

खंडेरायाचा येळकोट पुकारत भला मोठा साखळदंड एका फटक्यात तोडला जातो. त्यातल्याच कडीची पूजा होते. फोकस बंद होतात. गॅसबत्तीचे मेंटल फिके होतात. लाइटचे निम्मे गोळे बंद होतात. थकलेले वाघ्या-मुरळी बसकण मारतात. पुन्हा एकदा चहा होतो. बिदागी देऊन होते.

इतक्यात कोणी तरी आगाऊ शहाणा येऊन “अमक्या तमक्याच्या लग्नात आलेली मुरळी ही नव्हं का? का तर बाईची कंबार लई हललीच न्हाई” असं विरजण घालून जातो. तर आपल्या घरातल्या लग्नाची तारीख पक्की केलेला एखादा वधुपिता पुढे येत पार्टी कुण्या गावची, बिदागी किती याची जुजबी चौकशी करतो. पटल्यास सुपारी देतो.

जागरण सरतं. घरातले दिवे मालवले जातात. दिवसभर ताणलेली माणसं पोटात पाय खुपसून आल्हाद झोपी जातात. वेगवेगळ्या खोल्यांत निजलेले नवरा-नवरी इतक्या वेळ झाकलेले डोळे हळूच उघडतात आणि आपल्याकडे कुणाचे लक्ष तर नाही ना याची खात्री करून घेतात. तो उशी सरकवत थेट दाराच्या उंबऱ्याला भिडतो नि प्रचंड खटपट करून वायल्या खोलीत झोपलेल्या ‘तिचा’ चेहरा नजरं पडतो का याचा अंदाज घेऊ लागतो.

‘त्याच्या’ आवाजाचा ती कानोसाच घेत असते. त्याच्याशी नजरानजर होताच हळदरंगात उमललेल्या तिच्या गालावर जीवघेणी खळी पडते नि आसमंतात निखळ प्रेमाचे धुमारे फुटतात. त्यांचं जागरण असं बहरलेलं पाहून निळ्याकाळ्या आभाळातल्या चांदण्या लाजून चूर होऊन जातात...

: ८३८०९७३९७७

(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT