Rural Story : निसर्गाचं दान

Article by Samir Gaikwad : भूतप्रेत, पिशाच्च यांचे अस्तित्व बाह्य जगात नसते, ते फक्त मनात असते. फास घेतलेल्या माळावर आता अंधश्रद्धेचा बाजार फुलत असला तरी एक बरे झालेय, ते म्हणजे निसर्ग त्याला हवा तसा वाढतोय, बहरतोय; कारण तिथे आता माणसाचा हस्तक्षेप शून्य उरलाय. पुनर्जन्म जर होत असेल, तर त्या हिरवाईत हे दोन जीव पानाफुलांच्या रूपाने पुन्हा पुन्हा जन्मास येत असतील नि त्यांच्यातला बहर जिवंत ठेवत असतील!
Rural Story
Rural StoryAgrowon

Village Story : कलीच्या माळावरून खाली गेलं की पाझर तलावाचा भराव दिसतो. उन्हाळ्याच्या आधीच करपत चाललेल्या खुरट्या झुडपांचे बेचके जागोजाग दिसू लागतात. बरड रान असल्यानं इथं काही पिकत नाही. दीड-दोन कोस उभा आडवा इलाखा सगळा या झुडपांनी वेढलेला. पुढं चालत गेलं की जमिनीला उतार लागतो आणि थोडी काळी करडी माती लागते. इथं दर पावसाळी हंगामात घास गवत उगवतं. एकदम सुळसुळीत आणि रसरशीत. सोसाट्याचं वारं आलं की या गवताच्या लाटा आल्यासारखं वाटतं.

गवतातनं चालत गेलं की ते अंगाला लगटायला बघतं, कुत्र्या-मांजराने लाडाने हात चाटावेत तसं ते हातापायाला चाटू पाहतं. उन्हे कडक होऊ लागल्यापासून गवत पिवळं पडू लागलंय, सुकून चालल्यामुळं ते हालत नाही की डुलत नाही, ते भगवंतासारखं स्थितप्रज्ञ झालंय. अधूनमधून वेड्या बाभळीची झाडं अंगाचा पसारा मांडून बसलेली, त्यांच्या कोरड्या खरबरीत पानांवर धुळीची पुटं चढलेली. यांच्या काट्याच्या बुडाशी पांढऱ्या कोळ्याची चिवट दाट जाळी सुरू झालेली. फांद्याफांद्यात या जाळ्यांची नक्षी आणि त्यात अडकलेली चिलटे, माशा, किडे नकळत नजर खेचून घेतात. एखाददुसऱ्या फुलपाखराचा लाल काळ्या ठिपक्याचा पंख सुद्धा दिसतो. कुठल्या तरी गुराच्या वाळून खडंग झालेल्या विष्ठांचे अवशेष आजूबाजूला दिसतात.

डाव्या अंगाने खाली गेलं, की पालव्याच्या धोंड्याचा जुना पिंपळ लागतो. एकदम जुनाट जीर्ण. सगळीकडं पानाची चळत लागलेली. मोहर गळून पडलेला. वरती शेंड्याला काटक्यांची मोकळी घरटी. पानगळ जोमात असल्याने कपडे उतरवलेल्या खंग्री पैलवानाच्या बरगड्या दिसाव्यात तशा त्याच्या पानमोकळ्या फांद्या दिसतात.

शेंड्याच्या टोकाला थोडीफार नवी पाने दिसतात, त्याच्या झुल्यावर एखादा चुकार रावा नजरेस पडतो. एव्हाना वाऱ्याचं घुंघुं संगीत सुरू झालेलं असतं. पिंपळाचा बुंधा उघडा पडलेला, त्यात खोपच्या मारलेल्या. लाल करड्या डिंकाचे ओघळ आणि आगमुंगळ्याच्या शिस्तीतल्या रांगा यांची हालचाल एका विशिष्ट सूत्रबद्ध लयीत होत राहते. झाडाखाली बसावं म्हटलं तर सावलीचा मागमूस नाही.

Rural Story
Rural Story : अंतःकरणातला राम...

इकडं तिकडं डोळे भरून पाहण्यात बराच वेळ गेल्यानंतर उन्हे पुढे सरकल्यामुळे मोठ्यालठ बुंध्याची सावली येते आणि तिच्याखाली बसून भाकरीचं फडकं सोडलं की पोटातल्या भुकेची जाणीव होते. हात धुऊन जठराग्नी शांत केल्यानंतर वारा डोळ्यांवर पेंग घेऊन येतो. पाठ मातीला कधी टेकते कळत नाही. निळ्या पांढऱ्या आभाळातून विरळ ढगांच्या अभ्र्यातून एका सुरात आवाज काढत जाणाऱ्या टिटव्यांच्या थव्याने जाग येते. तोंडावर पाण्याचा सपकारा मारून उठावं म्हटलं तरी पाय निघत नाहीत.

धोंडीबाचा जीव इथंच गेलेला. पालव्यांच्या घरातला आडदांड गडी. अंगाने दांडगादुंडगा माणूस. अवघी पंचविशी गाठलेला भला इसम. भरावाचे काम सुरू असताना त्यांच्या अंगावर दगडांची मोठी रास कोसळून त्यात तो जखमी झालेला. काही दगड बैलाइतके मोठाले होते, जे त्याच्या छाताडावर पडले होते. सगळा आजोरा बाजूला हटवून त्याला बाहेर काढून जखमी अवस्थेत उचलून बाहेर काढलं तेव्हा त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होते. डोकं फुटलं होतं. मातीचा रक्ताचा चिखल झाला होता. त्याचा विदीर्ण झालेला देह पिंपळाच्या याच झाडाखाली आणून ठेवलेला. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं तेव्हा त्याच्या अंगात थोडीशी धुगधुगी बाकी होती. मात्र अवघे काही क्षणच त्यानं श्‍वास घेतला. बघता बघता चार आचके देऊन त्यानं जगाचा निरोप घेतला.

त्या दिवसापासून या पिंपळाचं नावच पालव्याच्या धोंड्याचा पिंपळ असं पडलं. धोंडीबा गेला, त्याची बहिणी-भावंडे उघड्यावर आली. म्हातारा बाप खचून गेला. आईच्या दुःखाला पारावार उरला नाही. दुःख त्याच्या एकट्याच्या उंबऱ्यापुरतं सीमित नव्हतं. त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कलावतीच्या डोक्यावर परिणाम झाला. आपण ज्याच्यावर जीव लावला तो असा एकाएकी गेला हे तिला मान्यच होत नव्हते. त्याच्या विरहधक्क्याने ती भ्रमिष्ट झाली. ती तासनतास इथं येऊन बसू लागली.

गुरं वळायला म्हणून यायची आणि इथं बुंध्याला पाल चिकटावी तशी बसून राहायची. काहीबाही पुटपुटायची, हसायची, एकटक बघत बसायची. गाव म्हणू लागलं, की कलीला धोंड्याने झपाटलं. खेड्यातले लोक वाट्टेल ते उपाय सुचवू लागले. देवऋषी झाले हकीम-फकीर झाले. झाडफूक करून पाहिली, अंगारे धुपारे झाले. उपास तापास, राख, करणी नजर टोटके सारं करून झालं. परंतु तिला कुणी कुठल्या दवाखान्यात नेलं नाही. शॉक देऊन मारतील अशी कुणा अर्धवटरावाने भीती घातली होती. तिचा मानसिक आजार बळावत गेला. ती अधिकाधिक उग्र होत गेली नि तिला मारझोड सुरू झाली. तिच्या घरच्यांनी नंतर नंतर तिला पलंगाला बांधून ठेवलं. सर्व अघोरी उपाय करून झाले. तिचे हाल हाल झाले.

एका लग्नसराईच्या हंगामात तिच्या घरचे सगळे लोक पान्खेडला गेले आणि शेजाऱ्यांची नजर चुकवून कली इथं पिंपळापाशी आली. दिवस मावळायच्या वेळेपर्यंत बुंध्याला टेकून बसून राहिली. अंधार पडू लागल्यावर ती यंत्रवत समोरच्या दिशेने निघाली. घासगवताचं रान ओलांडून बरडमाळ पायाखाली घालून वरच्या पांढऱ्या मातीच्या माळावर आली आणि डोक्यात पक्कं केल्यानुसार तिथल्या बांधावरच्या जुनाट लिंबाच्या झाडाला तिनं फास लावून घेतला. संध्याकाळी उशीरपर्यंत तिचा देह तिथे लोंबकळत होता. तिचे प्राणपाखरू मुक्त झाले तेव्हा पिंपळाला गहिवरून आलं होतं. गावात बोंब उठल्यावर तिचा निष्प्राण देह खाली उतरवला गेला.

तेव्हापासून हा माळ कलीचा माळ या नावाने कुप्रसिद्ध झाला. साहजिकच या इलाख्याविषयी अनेक भयकथा रचल्या गेल्या. लोकांनी ही दोन्ही ठिकाणे वर्ज्य केली. इथं कधी कुठल्या माणसाला इजा झाल्याचे कधीच ऐकिवात नव्हते; मात्र इथल्या निस्पर्श गवताची गोष्ट सर्वदूर झाली. वर्दळ कमी झाल्याने माळावर पाऊस उरकताच भलंमोठं हिरवं लुसलुशीत गवत उगवलं, जे दरसाली येतच राहिलं. मात्र चुकून माकूनही इकडं आलेलं एकही जित्राब त्याल तोंड लावत नाही, त्यामुळं कुठला गुराखी देखील इकडं फिरकत नाही. याचा परिणाम गावभर भीतीच्या कंड्या पिकण्यात झाला. काही महिन्यांतच इथं रानटी झुडपांचं साम्राज्य पसरलं. आजूबाजूच्या लोकांनी आपल्या शेतशिवाराकडं जाणाऱ्या वाटांच्या दिशा बदलल्या. गावातल्या काही चुकार तरुणांनी हा पिंपळ तोडायचा प्रताप करून पाहिला. पण तो सपशेल अयशस्वी झाला. पिंपळ जोमाने वाढत राहिला.

Rural Story
Rural Story : अनोख्या माहेरओढीचा संतोषगिरी...

गावाकडे हे असंच असतं. कुठे कुणी फास लावून घेतला, कुणाचा चुकूनमाकून जीव गेला वा कुणी जीव दिला तर त्या जागी जायचं लोक टाळू लागतात. जीव दिलेल्या विहिरीतलं पाणी उपसायचं कमी करतात. कुण्या बांधावरच्या बाभळीला, लिंबाला कुणी फास घेतला असला की एक तर तो बांध ओसाड होतो नाहीतर ते झाडच कापलं जातं. कुणी अकस्मात मेलं गेलं की तिथं मोठ्याला शिळा रचतात; जेणेकरून तिथं कुणी जाऊ नये. हे सर्व करण्यामागं त्या स्मृती नष्ट व्हाव्या हा हेतू असावा असेच वाटते.

कुणाचं असं एकाएकी जाणं काळजाला चुटपूट लावून जातं आणि त्या घटनेची स्मृती जागवेल अशी चिन्हे नष्ट करण्याकडे लोकांचा कल राहतो. खेड्यापाड्यात हे अजूनही चालते, कारण सहजतेने ‘त्या’ दुःखद जागा टाळता येतात. ‘माळावरचे फास’ हे म्हणूनच अधिक दुःखद ठरतात, कारण त्यांना किती जरी टाळले तरी ते कोणत्या न कोणत्या रूपाने समोर येत राहतात. सालागणिक त्याची पुनरावृत्ती होत राहते आणि माळांचे, बांधांचे, वस्त्यांचे नाव बदनाम होत राहते. हवेचा रोख पाहता वाढत्या फासांची भव्यता आता आकर्षक वाटत जाईल की काय अशी कुशंका येते.

पालव्याच्या धोंडीच्या माळावर तसे तर काहीच अभद्र वाईट नाही, कारण तिथे एक जीव हकनाक गेला नि दुसरा जीव त्याच्या विरहात निघून गेला. ते कशाला कुणाला त्रास देतील! भीती मनात असते. भूतप्रेत पिशाच्च यांचे अस्तित्व बाह्य जगात नसते, ते फक्त मनात असते. फास घेतलेल्या माळावर आता अंधश्रद्धेचा बाजार फुलत असला तरी एक बरे झालेय ते म्हणजे निसर्ग त्याला हवा तसा वाढतोय, बहरतोय;

कारण तिथे आता माणसाचा हस्तक्षेप शून्य उरलाय. पुनर्जन्म जर होत असेल तर त्या हिरवाईत हे दोन जीव पानाफुलांच्या रूपाने पुन्हा पुन्हा जन्मास येत असतील नि त्यांच्यातला बहर जिवंत ठेवत असतील! अस्तित्व शोधता यायला हवं. भिंतीवर फोटो चढवून त्याला हार घालण्यापेक्षा त्या जीवाला अनुरूप अशी स्मृती निर्माण करायला हवी. माणूस हे अपवादाने करतो परंतु निसर्ग मात्र त्याचे दान भूमिपुत्राच्या झोळीत न चुकता टाकत असतो.

८३८०९७३९७७

(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com