Ranmeva Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Fruits: ओळख पोषक रानमेव्याची...

Forest Biodiversity: प्रमुख फळांचा हंगाम संपल्यानंतर रानात उगम पावणाऱ्या देशी झाडांवरील करवंद, आळवे, जांभळे यासारखा रानमेवा चविष्ट, पोषक आणि औषधी असतो. जैवविविधता दिनाच्या निमित्ताने या स्थानिक वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

Team Agrowon

डॉ. प्रदीप दळवे

Wild Berries: प्रमुख फळांचा हंगाम संपताच नैसर्गिक अधिवासात वाढलेली कार, करवंद, आळवे, नेरले, धामणे, इरामणे, जांभळे, भोकर, गोदन, चारे, हुंबाटे, कामिन्या, निळुंब्या, शिंदोळ्या अशी अनेक फळे वनक्षेत्रामध्ये येत असतात. या प्रत्येकाची एक विशिष्ट चव आणि स्वाद असून, रानमेवा बाळगोपाळांना नक्कीच हवाहवासा वाटतो. त्यातील सर्वांगीण पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्मामुळे शरीरासही अनेक फायदे मिळतात. येत्या आठवड्यामध्ये येत असलेल्या जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर या देशी झाडांची जैवविविधता जपण्याची गरज सांगणारा हा लेख...

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात विविध फळांची अगदी रेलचेल असते. त्यात व्यावसायिक पद्धतीने लागवडीखाली असलेली द्राक्ष, चिकू, अंजीर, अननस, आंबा, खरबूज, कलिंगड अशा फळांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. मात्र या फळांचा हंगाम संपत आल्यानंतर नैसर्गिक अधिवासात वाढलेल्या फळे स्थानिक आदिवासी बांधव गोळा करून बाजारात आणतात. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाणी आणि शर्करा कमी होऊन सतत थकवा जाणवतो. त्यापासून बचावासाठी निसर्गाने सर्व सजीवांना दिलेली ही खास भेटच समजायला हवी. भरपूर पोषण मूल्ये आणि औषधी गुणधर्म असलेल्या या फळांचा आहारात मुद्दाम समावेश करावा. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याला आणि स्थानिक आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाला आधार देणे शक्य होते.

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले विविध खेळांसोबतच रानावनात भटकंती करून रानमेवा खाण्याची धमाल उडवत असत. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आणि मोबाइलमध्ये गुंतून गेल्यामुळे या आनंदाला मुकत आहेत. व्यायाम आणि त्यामुळे पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे मुलांच्या वाढीवर आणि एकूणच विकासावर विपरीत परिणाम होत आहे. या लेखात आपण चवीला स्वादिष्ट आणि विविध पोषण व औषधी मूल्ये असलेल्या रानमेव्याची माहिती घेऊ.

आळव / हेळू

ही रुबियासी कुटुंबातील वनस्पती जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात वाढते. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर तसेच सातपुडा पर्वत रांगांतील नंदुरबार, नाशिक या भागात ही भरपूर उंच वाढणारी वनस्पती आढळते. पावसाळ्याच्या सुरुवातीस फळे पक्व होतात. काहीशी चिकूसारखी तपकिरी दिसणारी पक्व फळे चवीला आंबट - गोड आणि स्वादिष्ट लागतात. फळामध्ये पाच ते सहा बिया असतात.

भोकर

बोराजिनेसी कुटुंबातील हे झाड पानझडी प्रकारातील असून, पाच ते सात मीटर उंच व एक खोड पद्धतीने वाढते. याचे लाकूड फर्निचर निर्मिती, तर पाने चारा म्हणून उपयोगी आहेत. कच्ची फळांची मुख्यतः भाजी व लोणचे करतात. पक्व फळे आकाराने स्थानिक बोराएवढी, फिकट गुलाबी रंगाची, तर चवीला गोड व चिकट असतात. फळे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून, त्यामुळे पचनसंस्था सुधारते, पोटातील कृमींचा नाश होतो, केसांचे आरोग्य सुधारते.

जांभूळ

हा मूळ भारतीय वृक्ष असून पेरुच्या कुळातील आहे. हा सदाहरित वृक्ष शेताच्या बांधावर हमखास आढळून येतो. फळे अँथोसायनिन्स, मायरेसेटिन, इलाजिक ऍसिड, आइसोक्वेरसेटिन, ग्लुकोसाइड, केमफेरॉल यासारख्या जैवरासायनिक संयुगांनी समृद्ध असतात. फळे चवीला आंबट-गोड असून मधुमेह विकारावर गुणकारी असतात. फळांपासून स्क्वॅश, ज्यूस, जॅम, जेली आणि वाइन यांसारखी अनेक उत्पादने तयार केली जातात.

नेरली / आंबोळी

ही इलेग्नेसी कुटुंबातील झुडूपवर्गीय काटेरी वनस्पती असून वेलीसारखी वाढते. पश्चिम घाटातील सातारा, कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील जंगली भागात आढळते. एप्रिल - मे महिन्यात पांढरट-गुलाबी रंगाची फळे येतात. पक्व फळांवर तसेच पानांच्या खालच्या बाजूस चंदेरी लव असते. फळे आकाराने लहान व चवीला आंबट-गोड, चविष्ट असतात. फळांमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने, मेदाम्ले आणि तंतुमय पदार्थ असतात. खोकला, अतिसार, खाज, आणि कर्करोग इ. व्याधींवर औषध म्हणून आंबोळीचा उपयोग करतात.

गोदन

ही भोकर कुळातील वनस्पती असून फळे भोकर वनस्पतीच्या फळासारखी असतात. झाड बहुखोड पद्धतीचे व झुडूप वर्गात मोडते. फळे मोत्याएवढी, चवीला मधुर व आकर्षक गर्द नारंगी रंगाची असतात. जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात फूलधारणा होते. फुलांचा रंग दुधी पांढरा असतो. फळे साधारणपणे एप्रिल - मे महिन्यात पक्व होतात. बियांचे आवरण कठीण असल्याने उगवण क्षमता कमी असते. विविध प्रकारचे पक्षी, खारी, वटवाघळे, माकडे, वानरे, निशाचर प्राणी फळाकडे आकर्षित होतात आणि बियांचा प्रसार करतात. यातूनच या वनस्पतीचे नैसर्गिक पुनरुत्पादन होते.

धामणी

स्थानिक भाषेत धामणी किंवा करकरणी या नावानेही ओळखली जाते. ही मालवेसी कुळातील मध्यम आकाराचा वृक्ष आहे. झाडाची पाने शेळ्या, मेंढ्या आवडीने खातात. फळे चवीला आंबट-गोड आकाराने फार लहान, गोलाकार आणि मांसल असतात. कच्च्या फळांपासून लोणचे, चटणी, भाजी केली जाते, तर पिकलेल्या फळांपासून सरबत, जाम, जेली आणि कढी बनवतात. झाडाची पाने आणि साल अतिसार, मूळव्याध स्नायूंच्या वेदना, कमी तीव्रतेची विषबाधा, खोकला, अल्सर, श्वसनाचे आजार इ. विकारांवर औषध म्हणून वापरली जाते.

कार

रुबियासी कुटुंबातील शुष्क प्रदेशात वाढणारी झुडूपवर्गीय काटेरी वनस्पती असून मध्यम उंच वाढते. मराठवाड्यातील धारशिव, लातूर, बीड तर कर्नाटक सीमेवरील बिदर आणि गुलबर्गा या भागात ही वनस्पती माळरानावरील पडीक जमिनी व शेताच्या बांधावर आढळते. याची पाने शेळ्या-मेंढ्या आवडीने खातात. फळे लालसर तपकिरी रंगाची असून पक्व झाल्यावर गोड आणि स्वादिष्ट लागतात. त्यामुळे विविध पक्षी, कीटक, खारी या फळांना खूप पसंत करतात. पाने सॅलॅडप्रमाणे तसेच भाजी करून खाल्ली जातात. पानांचा काढा लहान मुलांना कृमिनाशक म्हणून देतात. तर जनावरांच्या जखमा भरून येण्याकरिता काढा दिला जातो.

करवंद

स्थानिक भाषेत काळी मैना / डोंगरची मैना या नावाने प्रचलीत. ही काटेरी झुडूप वर्गीय सदाहरित वनस्पती अपोसायनेसी कुळातील असून शुष्क उष्ण कटिबंध आणि उप-उष्ण कटिबंधीय प्रदेशात डोंगराळ भागात आढळते. फळे चवीला आंबट-गोड जीवनसत्त्व ‘क’, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस इ. खनिजानी समृद्ध असतात. कच्च्या फळांपासून लोणचे बनविले जाते. पक्व फळांमध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त असते. यापासून जेली, जॅम, स्क्वॅश, सरबत, चटणी इ. प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

शिंदी / शिंदोळ्या

ही नारळाच्या कुळातील काटेरी वनस्पती असून खूप उंच वाढते. शेताच्या बांधावर, ओढे, नद्यांच्या काठी ही झाडे हमखास आढळून येतात. फळे दिसायला खजुरासारखी, चवीला गोड असतात. या झाडाच्या खोडापासून नीरा नावाच्या पेयाचे उत्पादन घेतले जाते. नीरा चवीस मधुर तर पोटाच्या आरोग्याकरिता उपयोगी असते. यापासून गूळही बनवला जातो. पानांचा उपयोग पारंपरिक केरसुणी बनविण्यासाठी केला जातो.

तोरण

ही रमनेसी कुटुंबातील झुडूपवर्गीय काटेरी वनस्पती असून मध्यम उंच वाढते. महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम घाटातील जंगलात आढळते. एप्रिल-मे महिन्यात या झुडुपाला पांढरट - हलकीशी गुलाबी रंगाची फळे येतात. फळे आकाराने लहान व चवीला पिठाळ-गोड आणि स्वादिष्ट असतात. फळामध्ये एकच बी असते. विविध प्रकारच्या व्याधींवर पानाचा, सालीचा आणि फुलांचा औषध म्हणून उपयोग होतो.

- डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके - अंजीर आणि सिताफळ संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन भावात सुधारणा; कापूस तेजीतच, कांदा दबावातच, आल्याचे भाव टिकून तर शेवग्याला उठाव

Cotton Seed Shortage: सरळ कापूस वाण यंदाही अल्प

Agriculture Pump Cable Theft: केनवड शेतशिवारात केबल चोरट्यांचा धुमाकूळ

Monsoon 2026 : माॅन्सून ‘जैसा थे’ च, विदर्भात उष्णतेची लाट; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Tree Plantation Campaign: वृक्षारोपण व्यापक लोकचळवळ

SCROLL FOR NEXT