Intercropping Agrowon
ॲग्रो विशेष

Intercropping : आंतरपीक, मिश्र व नैसर्गिक पध्दतीचे बोरगड यांचे शेती तंत्र

Mixed Cropping : हिंगोली जिल्ह्यातील सातेफळ (ता.वसमत) येथील प्रल्हाद बोरगड यांनी मिश्र व आंतरपीक पध्दतीचे आदर्श व्यावसायिक तंत्र मॉडेल व तेही नैसर्गिक पध्दतीच्या शेतीतून विकसित केले आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

माणिक रासवे
Farming Techniques : हिंगोली जिल्ह्यातील सातेफळ (ता.वसमत) येथील प्रल्हाद बोरगड यांनी मिश्र व आंतरपीक पध्दतीचे आदर्श व्यावसायिक तंत्र मॉडेल व तेही नैसर्गिक पध्दतीच्या शेतीतून विकसित केले आहे.

हळद व तूर ही मुख्य पिके, त्यात भाजीपाला, फुले, एरंड, द्विदलवर्गीय पिके अशी विविधता जपत वर्षभर ताज्या उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. त्यातून शेतीतील उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासह जमिनीची सुपीकताही जपली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सातेफळ (ता.वसमत) येथील प्रल्हाद रामराव बोरगड हे प्रगतिशील, प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेतच. याशिवाय राज्यातील प्रसिद्ध ‘सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर’ कंपनीचे ते अध्यक्ष आहेत.

एकेकाळी शेतीत मजुरीचा अनुभव घेतलेल्या बोरगड यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक, दूरदृष्टीने व अभ्यासूवृत्तीने शेतीची व कंपनीची प्रसंशनीय प्रगती साधली आहे. पत्नी कावेरी यांनीही पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यात मोलाचा वाटा उचलला आहे. तेलगाव (ता.वसमत) येथे कंपनीचे मुख्य कार्यालय,धान्य प्रतवारी, हळद प्रक्रिया युनिट, ऊस प्रक्रिया, शेतीमाल खरेदी केंद्र आदी सुविधा तयार केल्या आहेत.

शेती पद्धती

-बोरगड यांची सातेफळ, तेलगाव, भोगाव आदी ठिकाणी मिळून सुमारे सव्वा आठ एकर शेती.
-गाव शिवारीतील विहिरीवरून पाईपलाईनव्दारे सातेफळ शिवारात पाणी आणले.
-तेलगाव शिवारात बोअर व शेततळे. सर्व शेती ठिबक सिंचनावर.
-हळद हे मुख्य पीक. (दरवर्षी दोन ते तीन एकर). त्यात सेलम, प्रतिभा व काळी हळद हे तीन वाण. काळी हळद वाणात औषधी गुणधर्म अधिक असल्याचे बोरगड सांगतात.
-सोयाबीन काढणीनंतर दोन एकरांत ऊस. त्यात रब्बी भुईमूग. बाकी गहू, लसूण, चारा पिके, २० गुंठे केळी व पपई आदी पिके.

ॲग्रो विशेष

मिश्र व आंतरपीक पध्दतीचे तंत्र

१) हळद आधारित मॉडेल


उन्हाळी मशागतीनंतर ट्रॅक्टर चलित यंत्राव्दारे गादीवाफे (बेड) तयार केले जातात. दोन बेडमधील अंतर ४ ते ४.५ फूट असते. जूनच्या सुमारास (यंदा जुलैमध्ये) बेडवर दोन ओळींत एक फूट व दोन झाडांत ६ ते ९ इंच अंतर ठेवून झिगझॅग पद्धतीने हळद लागवड होते. बेडमधील सरीमध्ये टोकण पद्धतीने मूग लागवड होते.

खुरपणीद्वारे तण व्यवस्थापन होते. हळद उगवण्याआधी थोड्या क्षेत्रावर मिरची व अल्प कालावधीतील भाजीपाला लावण्यात येतो. हळदीचे दर दहा बेड सोडून बेडवरच सुमारे २० फुटांवर एरंडी लावण्यात येते. एरंडी व हळदीचा कालावधीत सारखाच आहे.

हळद शिजविण्यासाठी एरंडीचे लाकूड इंधन म्हणून वापर करतात. एरंडीची सावली हळदीला मानवते. एरंडीच्या बियांपासून तयार केलेले द्रावण हळदीच्या कंद माशीला रोखण्यासाठी होतो.

२)तुरीवर आधारित मॉडेल

साडेतीन ते चार फूट अंतरावर तुरीसाठी बेड तयार केले जातात. त्यावर वखराचे खोड फिरवून बेड सपाट करून घेतात. त्यावर दोन ओळींत एक फूट व दोन झाडांमध्ये ६ इंच अंतर ठेवून टोकण यंत्राव्दारे मूग लागवड होते.

एक बेड आड मुगाच्या दोन ओळीमध्ये टोकण यंत्राव्दारे दोन झाडांत दीड फूट अंतर ठेवून तूर लागवड होते. याच पद्धतीने उडीद घेण्यात येतो. मूग किंवा उडीद असलेल्या बेडच्या
सरीत टोकण यंत्राव्दारे सोयाबीनची सहा इंचावर लागवड होते.

यंदा पाऊस कमी असल्याने सोयाबीनची उगवण थोडी कमी झाली. मूग, तूर लागवडीनंतर घन जीवामृताचा वापर करताना त्यात तीळ मिसळलेले असतात. पुढे तिळाची विरळणी होते. दसरा- दिवाळीसाठी मागणी लक्षात घेऊन या मिश्र- आंतरपीक पद्धतीत झेंडूही लावण्यात येतो.

यंदा मुगाची वाढ समाधानकारक नव्हती. त्यामुळे तो उभा असतानाच सव्वा एकरांत झेंडूच्या २३०० रोपांची लागवड केली. मुगानंतर मिरचीची अडीच फुटांवर लागवड होते.

(Weather News)

मिरचीचे उन्हाळ्यात उत्पादन

दसरा, दिवाळीला झेंडू काढणीनंतर मिरचीचे पीक वाढीस लागते. तुरीची वाढ झाल्यानंतर मिरची वाढीवर थोडा परिणाम होतो. मात्र जानेवारीत तूर परिपक्व होऊन पाने जमिनीवर पडून नैसर्गिक मल्चिंग तयार होते.

मग मिरचीचे फेब्रुवारी ते मार्च कालावधीत चांगले उत्पादन मिळते. एप्रिल- मेमध्ये मशागतीची कामे होतात. जूनमध्ये हळद लागवड होते. अशा रीतीने फेरपालट चक्र सुरू राहते. पुढील जूनमध्ये आले लागवडीचे नियोजन आहे.

बोरगड यांना झालेले सहजीवन पध्दतीचे फायदे

-मुख्य पीक व बाकीची मिश्र वा आंतरपिके ही सहजीवन पद्धती आहे. याद्वारे एक पीक पद्धतीतील जोखीम वा अवलंबित्व कमी होते. एखाद्या पिकातील नुकसान दुसरे पीक भरून काढते.
-दर महिन्याला ताजे उत्पन्न मिळत राहते.
-फेरपालट केल्याने किडी- रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
-जमिनीची सुपीकता वाढते.
-मुख्य पिके आर्थिक दृष्ट्या बोनस ठरतात. आंतरपिकांमधून खर्च निघून जातो.

मिळणारे उत्पादन (एकरी)

हळद- १५ ते २० क्विंटल.
-तूर- ७ ते८ क्विंटल
-सोयाबीन-१ ते १.५ क्विंटल
-मूग ४ ते ५ क्विंटल (यंदा सव्वा क्विंटल)
-झेंडू- २ ते ३ टन
-तीळ- ५० किलोपर्यंत उत्पादन
-हिरवी मिरची- १० ते १५ क्विंटल. बाजाराची स्थिती पाहून लाल मिरची विक्रीचेही नियोजन.

विक्री व्यवस्था

बचत गटाच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या मूग, तूर, उडीद, हरभरा आदींपासून
कावेरीताई घरगुती जात्यांवर डाळी तयार करतात. हळद पावडर, उसाचा रस, त्यापासून कुल्फी, चुस्की, इमली चटणी, गूळ आदी उत्पादनेही तयार करतात.

सूर्या कंपनीच्या प्रवेशव्दाराजवळ स्टॉलद्वारे थेट विक्री होते. भीमथडी जत्रा (पुणे), महालक्ष्मी सरस प्रदर्शन (मुंबई), दिल्ली, चेन्नई आदी प्रदर्शनात सहभाग असतो. दरवर्षी विविध उत्पादनाच्या विक्रीतून सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल होते.

नैसर्गिक शेती अन कुटुंबाची एकी

बोरगड दांपत्याला आई लक्ष्मीबाई ( प्रल्हाद यांच्या आई) यांचीही मोठी मदत होते. मोठी मुलगी कामिनी बीएएमएस, राजेश बीकॉम. करीत आहे. मुलगी रोहिणी परभणी येथे अन्न तंत्र पदवीचे शिक्षण घेत आहे. बोरगड २०१२ पासून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. लाल कंधारी आणि गीर मिळून सुमारे सात देशी गोधन आहे.

वासरांना पाजून दररोज पाच लिटर दूध घरी वापरण्यात येते. देशी तुपाची निर्मिती व विक्री केली जाते. शेण, गोमूत्र, गूळ, बेसन पीठ, पिकांच्या मुळाजवळील माती आदींपासून जीवामृत तसेच दशपर्णी अर्क, निंबोळी अर्कं घरीच तयार करतात.

बाजारातील सेंद्रिय निविष्ठांचा वापर गरजेनुसार करतात. फवारणीसाठी ताकाचा वापर होतो. पाच गुंठ्यात ‘व्हर्टिकल फार्मिंग’ उभारले आहे. तेथे स्ट्रॉबेरी व भाजीपाला लागवडीचे नियोजन आहे.

मिश्र व आंतरपीक पद्धतीतून स्वावलंबी, आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेतीचे मॉडेल मी विकसित केले आहे. या पद्धतीत पैशांसाठी हात पसरण्याची किंवा कर्ज काढण्याची गरज भासत नाही.
प्रत्येक शेतकऱ्याने माझ्याप्रमाणे विषमुक्त शेती करावी. सुरवातीला घरच्यापुरता एक एकरांत प्रयोग करावा. त्यानंतर त्याचा विस्तार करावा. थेट विक्री करावी.
प्रल्हाद बोरगड
९८५०३८५७२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT