डॉ. व्ही. व्ही. गौड
Wheat Crop Management : गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. राज्यात गहू लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गहू पिकाची हेक्टरी उत्पादकता १८ ते २० क्विंटलपर्यंत आहे. गहू पिकात येणाऱ्या रुंद पानांच्या चांदवेल, रान मोहरी, रानमेथी, बथुवा, कृष्णनील, रान मटर, काटेमाठ इत्यादी तसेच गवतवर्गीय तणांमुळे पिकाचे सुमारे ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
गव्हाच्या अधिक उत्पादनक्षम, कमी उंच वाढणाऱ्या वाणांमध्ये रुंद पानी तणांच्या समस्या तीव्र झाली आहे. या तणांचे नियंत्रण पारंपरिक पद्धतीद्वारे करणे शक्य होत नाही. या तणांमुळे गहू पिकाच्या उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी योग्य तणनाशकाची निवड अत्यंत आवश्यक आहे. तण नियंत्रणासाठी योग्य वेळी योग्य तणनाशकाचा वापर केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते.
गहू पिकात येणाऱ्या तणांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी परंपरागत (२,४-डी) तणनाशकावर अवलंबून होते. परंतु या तणनाशकाच्या वापरामुळे गहू लागवडीशेजारील मोहरी किंवा हरभरा या रुंदपान असलेल्या पिकांचे नुकसान संभवते. त्यासाठी अनेक पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे गव्हात येणाऱ्या तणांचे प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदतहोते.
एकात्मिक तणनियंत्रण
जमिनीची योग्य मशागत, प्रमाणित बियाण्याचा वापर, वेळेवर पेरणी, पूर्ण कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खताचा वापर, रासायनिक खतांचा समतोल व योग्य पद्धतीने वापर, योग्य पाणी व्यवस्थापन, वेळेत पीक संरक्षण व रासायनिक तणनाशकांचा आवश्यकतेनुसार वापर या बाबींचा अवलंब करून गहू उत्पादनात वाढ मिळविणे शक्य होते.
गहू पिकात तण व्यवस्थापन करण्यासाठी उत्पादन खर्चात होणारी अतिरिक्त वाढ टाळण्यासाठी एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धती फायदेशीर ठरते. एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये विविध तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे तणांचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते.
रासायनिक तणनाशकाचा अंश व्यवस्थापनासाठी उपाययोजना
तणनाशकांच्या अति वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. वारंवार तणनाशक वापरामुळे भविष्यात तणनाशक अंश वाढीचा धोका लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये तणनाशकांच्या अंशाचे प्रमाण वाढू नये यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
शिफारशीत मात्रेमध्येच तणनाशकाचा वापर करावा.
एकाच तणनाशकाचा सतत वापर टाळावा.
पिकांची फेरपालट करावी.
सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीतील तणनाशकांचे अंश धरून ठेवले जातात. तसेच सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण सुद्धा वाढते. त्याचाच परिणाम तणनाशकाचे विघटन होण्यास होते.
तणनाशक फवारणीवेळी घ्यावयाची काळजी
तणनाशकाची शिफारशीत मात्रेत व वेळेनुसार फवारणी करावी.
उगवणपूर्व तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित व सपाट जमिनीवर पुरेसा ओलावा असताना फवारावे.
फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे.
उगवणपूर्व रासायनिक तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर १५० लिटर, तर उगवणपश्चात २०० लिटर पाण्याचा वापर करावा.
सतत एकाच तणनाशकाचा वापर टाळावा.
तणनाशक फवारणीसाठी वेगळ्या पंपाचा वापर करावा.
तणनाशक फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.
२,४-डी सारख्या तणनाशकाचा वापर हवा शांत असताना करावा. गहू पिकात फवारणी ३० ते ४० दिवसांच्या दरम्यान करावी. त्या अगोदर किंवा उशिरा फवारणी केल्यास गव्हाच्या ओंब्या वाकड्या निघून उत्पादनात घट येते.
गहू पिकानंतर ज्वारी, मका किंवा चवळी या पिकाची लागवड करायचे नियोजित असल्यास तणनाशकांमध्ये सल्फोसल्फुरॉन या क्रियाशील घटकाचा समावेश असलेल्या तणनाशकाचा वापर टाळावा.
२,४-डी किंवा सल्फोसल्फुरॉन तणनाशकाचा वापर हवा शांत असताना करावा. अन्यथा, शेतालगतच्या रुंद पानी मोहरी वा हरभरा पिकांचे नुकसान संभवते.
दोन भिन्न तणनाशके किंवा तणनाशकासोबत इतर कोणतेही कृषी रसायन मिसळून फवारणी करू नये.
तणनाशकावरील लेबलवरील माहिती नीट वाचून घ्यावी.
तणनाशक वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- डॉ. व्ही. व्ही. गौड, ८६३७७०७६४५, (प्रमुख अन्वेषक, अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी. मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.