Agriculture Import Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Pulses Import: भारताकडून शेतीमाल आयातीला पायघड्या

Indian Market Update: शेतीमालाची आयात वाढल्याने भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागले. भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण २ हजार ७०० कोटी डाॅलर्स किमतीचा शेतीमाल आयात केला.

Team Agrowon

Pune News: भारताची शेतीमाल आयात मागील वर्षभरात तब्बल २० टक्क्यांनी वाढली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाची कापूस आयात दुप्पट झाली, तर कडधान्य आयातीत ४६ टक्क्यांची वाढ झाली. केंद्र सरकारने तूर, हरभरा, उडीद, पिवळा वाटाणा या कडधान्यांची आयात मुक्त केल्याने आयातीचा लोंढा वाढला. तसेच खाद्यतेल आणि फळे, भाजीपाला यांच्या आयातीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

शेतीमालाची आयात वाढल्याने भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागले. भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण २ हजार ७०० कोटी डाॅलर्स किमतीचा शेतीमाल आयात केला. मागच्या वर्षी ही आयात २ हजार २१३ कोटी डाॅलर्स होती. गेल्या वर्षभरात खाद्यतेल, कडधान्य, कापूस, फळे आणि भाजीपाला यासह इतर शेतीमालाच्या आयातीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण आयातीत खाद्यतेलाचा मोठा वाटा आहे. खाद्यतेलानंतर कडधान्याची सर्वाधिक आयात झाली. त्यानंतर फळे आणि भाजीपाला तसेच कापूस आयातीचा क्रम लागतो. खाद्यतेल आयातीवर नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात १ हजार ७३३ कोटी डाॅलर्स खर्च झाले. त्या आधीच्या वर्षात खाद्यतेल आयातीसाठी १ हजार ४८७ कोटी डाॅलर्स खर्च करण्यात आले होते. म्हणजेच खाद्यातेल आयातीवर आधीच्या वर्षीच्या तुलनेत १६.५५ टक्के अधिक खर्च झाला. खाद्यतेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळेही हा खर्च वाढला आहे.

दि साॅल्वेंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीईए) कार्यकारी संचालक भारत मेहता यांच्या मते देशात गेल्या वर्षभरात १५५ ते १६० लाख टन खाद्यतेल आयात झाल्याचा अंदाज आहे. २०२३-२४ मधील आयात १५५ लाख टन होती. पण वर्षभरात पाम तेल महागल्याने आयातीवरचा खर्च जास्त झाला. तसेच पामतेलाच्या वाढलेल्या भावामुळे सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाची आयात वाढली आहे.

कडधान्य आयातीत ४६ टक्के वाढ

मागील वर्षभरात खाद्यतेलाबरोबरच कडधान्य आयातही वाढली आहे. सरकारने तूर, हरभरा, उडीद, मसूर आणि पिवळ्या वाटाण्याची आयात मुक्त केल्यामुळे भारताची कडधान्य आयात वाढली आहे. २०२४-२५ या वर्षात कडधान्याची आयात ४६ टक्क्यांनी वाढली. या आयातीसाठी भारताला ५४७ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागले. एकूण आयात ६७ लाख टनांवर पोहोचली आहे. आधीच्या वर्षी ती ४४ लाख टन होती.

कापूस आयात दुप्पटीवर

भारताची कापूस आयात जवळपास दुप्पट झाली. देशातील कापूस उत्पादन दरवर्षी कमी कमी होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या तुलनेत कापसाचे भाव कमी आहेत. त्यामुळे भारतातील व्यापारी आणि उद्योगांनी कापसाची आयात वाढवली. त्याचा परिणाम म्हणून २०२४-२५ मध्ये १२१ कोटी डाॅलर्स किमतीचा कापूस आयात करण्यात आला. मागच्या वर्षी कापूस आयातीचे मूल्य केवळ ५९ लाख डाॅलर्स एवढेच होते.

फळे भाजीपाला आयात ११ टक्के अधिक

देशात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार फळे आणि भाजीपाल्यालाही मागणी वाढत आहे. तसेच लोकांचे उत्पन्न आणि जीवनमान उंचावल्यामुळे त्यांच्याकडून परदेशातील फळे आणि भाजीपाल्याला पसंती मिळत आहे. सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, अवाकॅडो, बेरीज अशा फळांची आयात वाढत आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या तुलनेत फळे आणि भाजीपाला आयात ११ टक्क्यांनी वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा

Labor Migration : रोजगाराअभावी पुसद तालुक्‍यात मजुरांचे स्थलांतर

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी २८.५३ कोटींचा निधी मंजूर

E-Peek Pahani : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीकडे पाठ

Flood Crop Damage : संकटाच्या काळातही शेतजमिनी घेण्यासाठी चाचपणी

SCROLL FOR NEXT