Praksah Hinduja Agrowon
ॲग्रो विशेष

Feudal capitalist : सरंजामदार भांडवलदार

Prakash Hinduja : भारतीय वंशाचे अब्जाधीश प्रकाश हिंदुजा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना स्वित्झर्लंडमधील फौजदारी न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे.

संजीव चांदोरकर

Hinduja Family : भारतीय वंशाचे अब्जाधीश प्रकाश हिंदुजा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना स्वित्झर्लंडमधील फौजदारी न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यांचा गुन्हा काय? तर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या भारतीय नागरिक असलेल्या, निरक्षर असलेल्या, गृह सेवकांचा छळ केला.

छळ केला म्हणजे काय, तर त्यांचा पासपोर्ट जप्त करून ठेवणे, त्यांना बंगल्याबाहेर जाण्यास मज्जाव करणे, कमी वेतन देऊन अधिक काळ काम करायला लावणे इत्यादी. हे कुटुंब त्यांच्या पाळीव कुत्र्यांवर देखील गृह सेवकांना देण्यात येणाऱ्या वेतनापेक्षा काही पटीने जास्त खर्च करत होते.

हिंदुजा कुटुंब किती क्रूर वागले किंवा मानवतावाद कसा लयाला चालला आहे हा आपला मुद्दा नाही. जगभरच्या सरंजामदारी व्यवस्थेत आणि भारतातल्या जातिव्यवस्थेत माणसांना किती क्रूर, हिंसकपणे वागवले जात होते याचे दस्तऐवजीकरण आता जुने झाले आहे. क्लासिकल राजकीय अर्थशास्त्र असे सुचवते की भांडवलशाही प्रणाली ही सरंजामशाही प्रणालीपेक्षा अधिक प्रगत मूल्ये मानणारी आहे.

अशा प्रकारच्या बातम्या हे दाखवून देतात की असे काही नाही आहे. या गोष्टी अपवादात्मक नाहीत. त्या घडतच असतात. फक्त माध्यमांमध्ये त्याची बातमी आली की फक्त आपल्याला कळत असते. जगभरातील कॉर्पोरेट कंपन्यांनी लॅटिन अमेरिकेत चालवलेल्या खाणी, आफ्रिकेतील हजारो हेक्टर जमिनीवरील नगदी पिकांची लागवड ही तर ठळक उदाहरणे आहेतच. चला त्याबद्दल आपल्याला काही फार माहिती नाही असे म्हणून आपली सुटका करून घेऊ.

आज घराघरांत पोहोचलेले नाव आणि अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये काही ट्रिलियन डॉलर्सचे बाजार मूल्य असलेल्या ॲमेझॉन कंपनीची चर्चा करू. ही कंपनी भारतासकट अनेक देशांत तिच्या कामगारांना ठरलेल्या वेळीच नैसर्गिक विधी करायला जाण्याची परवानगी देते, सगळ्यात कमी वेतन देते, माणसांना माणूस म्हणून वागवत नाही, कामगारांना संघटना बनवायला परवानगी देत नाही, असे आरोप या कंपनीवर आहेत.

याची चर्चा कॉर्पोरेट भांडवलशाहीचे समर्थक टाळतात. उद्या समजा ॲमेझॉनने आपल्या कामगारांना जगण्यासाठी आवश्यक वेतन दिले किंवा त्यांना अधिक सोयीसुविधा दिल्या, त्यांना माणूस म्हणून वागवायचे ठरवले, तर ॲमेझॉनच्या शेअरचे भाव खाली येऊन त्याचे बाजारमूल्य कमी होणार आहे. हा परस्पर संबंध खुलवून सांगून जनजागरण करायची गरज आहे.

इथे ॲमेझॉन हे प्रतिनिधिक उदाहरण म्हणून घ्यावे. ॲमेझॉनचे प्रवर्तक आणि मुख्याधिकारी असलेल्या जेफ बेझोस यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण बोलत नाही आहोत. हिंदुजा कुटुंबाला त्यांची वर्तणुक अनैतिक आहे किंवा मानवतावादी नाही म्हणून शिक्षा झालेली नाही. तर ती स्वित्झर्लंडमधील संबंधित आणि प्रचलित कायद्याचा भंग करते म्हणून झालेली आहे.

माणसाची, कॉर्पोरेटची वर्तणूक चांगली का वाईट हे ठरवताना आत्मनिष्ठ निकष न लावता वस्तुनिष्ठ निकष लावण्याचे काम कायदा करते. आणि त्या कायद्याचा भंग केलेल्यांना शिक्षा होईल हे बघण्यासाठी दंड सत्ता लागते. ज्यांना काही मूल्यांवर आधारित मानवतावादी समाज घडवायचा आहे, त्यांनी कायदा करण्याच्या अधिकाराचे महत्त्व आणि दंड सत्ता हातात असण्याचे महत्त्व मनावर बिंबवले पाहिजे. त्यांना कमी लेखल्यामुळे मानवतावादी समाज निर्मितीच्या चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT