Work Participation Agrowon
ॲग्रो विशेष

Women Participation Index : उत्पादक कामातील महिलांच्या सहभागाचा निर्देशांक

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Role of Women in Agriculture : भारतीय उपखंडामध्ये कृषी क्षेत्रातील एकूण मनुष्यबळापैकी सर्वसाधारण ३२ टक्के मनुष्यबळ हे महिलांचे आहे. कुटुंबातील पुरुषांचे शहराकडे होणारे स्थलांतर वाढल्याने यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे घरगुती कामांसोबतच नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनातून कौटुंबिक अन्न व पोषणद्रव्यांच्या सुरक्षिततेमध्ये महिलांचा वाटा मोठा आहे. ग्रामीण महिला किती कामे करतात, याचा विचार करू पाहा.

उदा. घरातील नियमित कामांसोबतच स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडे गोळा करणे, गुरांच्या व गोठ्याच्या स्वच्छतेपासून चारापाणी करणे, शेतातील कामे इ. यातील अनेक कामे कष्टदायक असली तरी अनुत्पादक किंवा कमी उत्पादक मानली जातात. परिसरातील मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्धता असताना त्यांच्या कष्टामध्ये वाढ होते. पाणलोट क्षेत्र विकासाच्या अंमलबजावणी व व्यवस्थापनातून नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता वाढत असल्याने त्यांची ही कामे कमी होऊ शकतात किंवा त्यांचे कष्ट वाचू शकतात.

पर्यायाने महिलांना कृषी क्षेत्रातील अधिक उत्पादक उपक्रमांसाठी वेळ देता येतो. ही बाब आपल्याला हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, निढळ, कडवंची, जवखेडा अशा काही गावांमध्ये दिसून येते. एकूणच पाणलोटाच्या यशाचे प्रमाण जाणण्यासाठी उत्पादक कामातील महिलांच्या सहभागाचा निर्देशांक (Women’s Productive Time Utilization Ratio, WPTUR) महत्त्वाचा ठरतो. या लेखामध्ये त्याची माहिती घेऊ.

Formula

पाणलोट क्षेत्र विकास आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापनानंतर गावातील पीक पद्धती बदलते. महिलांचे अनुत्पादक कामात जाणारा कालावधी कमी होऊन अधिक उत्पादक कामांकडे वळल्यामुळे एकूणच कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. उदा. दुग्ध व्यवसाय, फळबाग व पीक लागवड, कृषिपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग इ. त्यामुळेच पाणलोट क्षेत्राची यशस्विता मोजण्यासाठी हा निर्देशांक महत्त्वाचा ठरतो. तो काढण्यासाठी प्रकल्प पूर्व व प्रकल्प पश्‍चात बदललेली परिस्थिती विचार घ्यावी लागते.

उदाहरण म्हणून आपण वर्धा जिल्ह्यातील निजामपूर टाकळी (ता. आर्वी) या गावातील प्रेरणा महिला शेतकरी गटाची माहिती घेऊ. या गटाला पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘फार्मर कप’ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. २०१७ पासून कार्यरत या महिला शेतकरी गटात ७२ महिला असून, त्या १७.५ एकर जमीन कसतात.

या महिलांनी एकत्रितरीत्या त्यांच्या कुटुंबाकडील एकूण जमिनीपैकी काही जमीन कसण्यासाठी घेतली आहे. पाणी फाउंडेशन अंतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणी झाल्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेती व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी रासायनिक कीटकनाशकाऐवजी दशपर्णी अर्काची निर्मिती व वापर सुरू केला.

गट स्थापण्यापूर्वी या साऱ्या महिला वर्षभर घरगुती व कमी उत्पादक कामांमध्ये गुंतलेल्या असत. उदा. पाणी भरणे, चुलीसाठी आवश्यक जळाऊ लाकूड गोळा करणे व जनावरे सांभाळणे इ. पाणलोट प्रकल्प व फार्मर कप स्पर्धेच्या पश्‍चात परिस्थितीमध्ये (२०२२ मध्ये) तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे या महिलांनी शेतीमध्ये आवश्यक बदल केले. परिणामी, त्यांच्या उत्पन्नात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली.

या सर्व ७२ महिलांशी फोनवरून संपर्क करून मी स्वतः माहिती घेतली. ७२ महिलांपैकी बहुतांश सर्वांनी सांगितले, की पाणलोट कामानंतर सिंचनासाठी व घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध आहे. मात्र त्या वर्षातील सुमारे २८० हून अधिक दिवस घरगुती आणि शेतीतील अनुत्पादक कामांमध्ये गर्क होत्या.

जेव्हा त्यांच्या प्रेरणा महिला शेती गटाकडे शेतीची जमीन, त्यासाठी आवश्यक पाणी व अन्य नैसर्गिक संसाधने उपलब्ध झाले, तेव्हा त्यांच्या कामांचे नेमके मूल्य त्यांना कळाले. पण किती वेळ कोणत्या कामांना देतो, हे त्यांच्या लक्षात आले. उदा. या गटातील प्रत्येक महिला जळण गोळा करण्यासाठी वर्षातून किमान सरासरी १५ दिवस घालवत असत.

पाणी उपलब्ध असूनही वर्षात त्यांचे किमान सरासरी ४६ दिवस पाणी भरण्यात जात. प्रकल्पपूर्व काळात ७२ महिलांचे सुमारे २४,५५२ मनुष्यबळ दिवस हे अनुत्पादक कामामध्ये वाया जात होते. प्रकल्प पश्‍चात ते २५९२ मनुष्यबळ दिवस इतके कमी झाले. उत्पादक कामाचा कालावधी ६४८ वरून वाढून ५१८४ मनुष्यबळ दिवस झाला. (तक्ता १)

तक्ता क्र. १ - निजामपूर टाकळी येथील महिलांच्या विविध कामांचे वर्गीकरण व त्यावरून काढलेले प्रति वर्ष मनुष्यबळ दिवस.

अ. नं. कामाचे वर्गीकरण प्रकल्प पूर्व परिस्थिती २०२१ प्रकल्प पश्चात परिस्थिती २०२२ नंतर

एका महिलेचे प्रतिवर्ष वापरले जाणारे सरासरी मनुष्यबळ दिवस (अ) ७२ महिलांचे प्रतिवर्ष वापरले जाणारे सरासरी मनुष्यबळ दिवस

(अ गुणिले ७२) एका महिलेचे प्रतिवर्ष वापरले जाणारे सरासरी मनुष्यबळ दिवस (ब) ७२ महिलांचे प्रतिवर्ष वापरले जाणारे सरासरी मनुष्यबळ दिवस

(ब गुणिले ७२)

कमी उत्पादनक्षम उपक्रम

१ पाणी भरणे ४६ ३३१२ १२ ८६४

२ जळाऊ लाकूड गोळा करणे १५ १०८० ४ २८८

३ गुरे चराई २८० २१६०० २० १४४०

एकूण २४५९२ २५९२

अधिक उत्पादनक्षम उपक्रम

४ जमीन मशागत १ ७२ ६ ४३२

५ शेणखत देणे ० ० ७ ५०४

६ सिंचन ० ० १० ७२०

७ तण व्यवस्थापन २ १४४ १० ७२०

८ खत व्यवस्थापन ० ० ६ ४३२

९ कीटकनाशक (रासायनिक/ दशपर्णी अर्क) ० ० १४ १००८

१० खणणी १ ७२ ४ २८८

११ पीक काढणे २ १४४ ६ ४३२

१२ पिक मळणी १ ७२ ४ २८८

१३ धान्य वाहतूक ० ० ३ २१६

१४ स्वच्छता व साठवण २ १४४ २ १४४

१५ खरेदी विक्री ० ० ० ०

१६ चौकशी ० ० ० ०

१७ धान्य विक्री ० ० ० ०

१८ मजूर पुरवठा ० ० ० ०

एकूण ६४८ ५१८४

आकडेवारीमध्ये हा बदल प्राथमिकदृष्ट्या अत्यल्प भासला तरी त्यातून त्यांचे उत्पन्न खूप वाढले. महिलांच्या हाती पैसा आल्यामुळे त्या त्या सक्षम झाल्या. पूर्वी निविष्ठा किंवा शेतीमालाची खरेदी विक्री, बाजारभाव, मजूर अशा महत्त्वाच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा फारसा समावेश नसे, घरातील मंडळीनाही ते आवश्यक वाटत नव्हते.

आजही त्यात फार काही फरक पडला नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून जाणवले. मात्र, या महिला शेती व त्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतात, हे ग्रामस्थ मान्य करू लागले आहेत. या निर्देशांकाची किंमत ५० पर्यंत वाढवायला आणखीही प्रयत्न आवश्यक आहेत, हे निश्‍चित. पण महिलांचा आत्मविश्‍वास वाढला असून, त्यांचा गावातील विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग वाढला आहे.

निजामपूर टाकळी या गावातील या निर्देशांकाच्या किमती पुढील प्रमाणे...

Formula

नैसर्गिक साधन संपत्ती व महिला सक्षमीकरण याचा संबंध :

जागतिक पातळीवर असो की भारतात अवर्षण प्रवण क्षेत्रांतील जलसंकट हा महिलांच्या आयुष्याशी जोडलेला महत्त्वाचा प्रश्‍न आहे. राजस्थानमध्ये ग्रामीण महिलांना सरासरी २.५ किलोमीटर प्रति दिन पाण्याच्या स्रोतापर्यंत चालावे लागते, हे भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाचे मत आहे.

जागतिक पातळीवर पाणी संकलनाच्या या अनुत्पादक कामांमध्ये महिलांचे सरासरी २०० दशलक्ष तास वाया जातात, तर अतिटंचाईमध्ये त्याचे प्रमाण वाढून २६६ दशलक्ष तास वाया जातात. अगदी मुंबईपासून १८५ कि.मी. अंतरावरील डेंगामाळ या पाचशे लोकसंख्येच्या गावात तीव्र पाणीटंचाई आहे. या गावात केवळ पाण्यासाठी बहूपत्नीत्व रूढ झाले आहे. या गावात अनेक कुटुंबामध्ये पुरुषांना कायदेशीर लग्नाची एक आणि कुटुंबाला आवश्यक पाणी भरण्यासाठी एक ते तीन बायका आहेत.

या अन्य दोन, तीन बायकांना ‘पाणीवाली बाई’ म्हणून संबोधतात. या महिला बारा ते पंधरा लिटरची कळशी किंवा बादली घेऊन नदीपर्यंत पाणी आणण्यासाठी दिवसात सर्वसाधारणपणे १२ किलोमीटर चालतात. विशेष म्हणजे या गावाजवळून भातसा धरणातून मुंबईला थेट घरपोच पाणीपुरवठा केला जातो. (संदर्भ - इंडिया टाइम्स न्यूज, डाऊन टू अर्थ, अनुज बेहेल, डिंपल बेहेल १६ ऑगस्ट २०२१).

महाराष्ट्रातील १९ हजार खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. तालुक्यांचा विचार केला तर १६३ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंकट हे तीव्र स्वरूपाचे आहे. म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेल्या राष्ट्रीय जल जीवन मिशन या कार्यक्रमाचे अंतरिम मूल्यमापन होणे गरजेचे आहे.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनामध्ये महिलांचा वाटा नेहमीच मोठा राहिलेला आहे.

- उत्तर प्रदेशातील (आज उत्तराखंड) हिमालयीन प्रदेशामध्ये खेजरी वृक्षांच्या बचावासाठी १९७० मध्ये झालेले चिपको आंदोलन. ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट यांच्या बरोबरीने श्रीमती. गौरादेवी या महिलेने अहिंसक पद्धतीने केले होते. कारण वृक्षवल्ली असो की कोणतीही नैसर्गिक साधनसंपत्ती महिलांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते.

डॉ. वंगारी मथाई यांची हरितपट्टा चळवळ

केनियातील डॉ. वंगारी मथाई (१ एप्रिल १९४०- २५ सप्टेंबर २०११) या महिलेला २००४ मध्ये शांततेचे नोबेल देण्यात आले. कारण होते त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेले काम. केनियातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार बाबत अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की उत्पादक अशा नैसर्गिक संसाधनाच्या अभावामुळेच समाजात महिलांना कायम दुय्यम स्थान दिले जाते.

१९७७ पासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी डॉ. मथाई यांनी ‘हरित पट्टा चळवळ’ उभी केली. झाडे लावून त्यातून महिलांना उत्पन्नांचा स्रोत मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या माध्यमातून ३० दशलक्ष झाडे लावली. त्यातून नऊ लाख केनियन महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यातून पर्यावरणाला फायदा होण्यासोबतच महिलांचे जीवन सुकर होण्यास मदत झाली. आपल्याकडेही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनातून महिलांना अधिक उत्पन्न मिळवून देतील, अशा योजना केंद्र आणि राज्यांनी आखण्याची गरज आहे. केवळ रोख रक्कम देऊन महिलांची बोळवण करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पायावर उभ्या करणाऱ्या ‘लखपती दीदी’ सारख्या अधिक योजनांची गरज आहे. त्यातही नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्याचा विचार असल्यास अतिउत्तम!

(टीप : एक मनुष्यबळ दिवस हा आठ तासांचा ग्राह्य धरण्यात येतो.)

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT