Organic Paddy Farming : सेंद्रिय भातशेतीसह देशी गोपालन, कुक्कुटपालन

Paddy Production : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा गुरामवाडी (ता.मालवण) येथील आनंद रावले १२ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने भातशेती करतात. पारंपरिक वाण त्यांनी जतन केले आहेत. विविध देशी गोवंशाचे संगोपन, कुक्कुटपालन व शेतमालाची थेट विक्री अशी वैशिष्ट्ये जपत एकात्मिक शेतीचा आदर्श त्यांनी उभारला आहे.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

एकनाथ पवार

Paddy Farming Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात कट्टा गुरामवाडी हे महत्त्वपूर्ण गाव आहे. कसाल-मालवण मार्गावर असल्याने त्यास काहीसा शहरीकरणाचा भास होतो. आंबा, नारळ, सुपारी यासह विविध पिके गावशिवारात होतात. मालवण शहर अवघ्या काही अंतरावर असूनमालवण किल्ला, तारकर्ली बीच यासह विविध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी या भागात पर्यटकांची कायम रेलचेल असते.

त्या प्रसंगाने दिली सेंद्रिय शेतीची दिशा

गावातील आनंद वसंत रावले यांनी लहानपणापासून वडिलांकडून शेतीचे धडे घेतले. बीकॉम पर्यत शिक्षण घेतल्यानंतर शेतीतच काम सुरू केले. खरिपात भात व रब्बीत ते मित्राच्या मदतीने कलिंगड, भाजीपाला घेत. शेती करताना आनंद यांनी सामाजिक भान देखील जपले आहे याचा एक प्रत्यय आला.

एके दिवशी जवळच्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाले. खरे तर ही व्यक्ती कोणतेही व्यसन करीत नव्हती. आनंद यांना या गोष्टीचा धक्का बसला. आणखी दोन तीन रुग्णही याच रोगाने पीडित झाल्याचे त्यांच्यापर्यंत आले होते. अधिक अभ्यास केल्यानंतर त्यांनी रासायनिक शेतीला पूर्णविराम द्यायचे असे ठरवले. कीडनाशकांचा वापर थांबवायचा, सेंद्रिय शेती सुरू करून आरोग्यदायी अन्नाचे उत्पादन घेण्यास सुरवात करायची असे पक्के केले.

Paddy Farming
Paddy Sowing : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १७३२ हेक्टरवर भात पेरण्या पूर्ण

आनंद यांची आजची सेंद्रिय शेती

शेतीत २४ वर्षापेक्षा अधिक तर १२ वर्षापासून शंभर टक्के सेंद्रिय शेती.

दोन एकर शेती सामाईक मालकी. पाच एकर भाडेकरारावर.

तीन एकरांत भात. एसआरआय तंत्रज्ञानाचा वापर.

मॅटवर भातरोपे तयार केली जातात. दोन काडीची पुनर्लागवड. एका रांगेत रोपे यावीत या,दृष्टीने दोरीचा वापर,

रब्बीत वाल, भेंडी, काकडी, कारली यांचे उत्पादन. कलिंगडाचेही उत्पादन.

पिकांसाठी शेणखत स्लरी. गोमूत्र, गांडूळखत, लेंडीखत, घनजीवामृत, निंबोळी अर्क, वेस्ट डी कंपोजर, दशपर्णी अर्क आदींचा वापर.

Paddy Farming
Paddy Farming : पट्टा पद्धतीच्या भात लागवड तंत्रातून मजूरसमस्येवर मात

उत्पादन

पूर्वी रासायनिक शेतीत प्रति गुंठा २५ ते ३० किलो भात उत्पादन मिळायचे. सेंद्रिय पद्धतीत आता हेच उत्पादन ८५ ते ९० किलोपर्यंत मिळू लागले आहे. तांदूळ तयार करून दरवर्षी सुमारे ६०० किलो तांदळाची प्रति किलो १०० रुपयांप्रमाणे विक्री होते. त्यापासूनही आर्थिक उलाढाल चांगली होते.

गोसंपोगन व पूरक व्यवसाय

सेंद्रिय शेती करण्यासाठी शेणखत, गोमुत्राची अधिक गरज भासत असल्याचे लक्षात आले. शेणखत प्रत्येकवेळी खरेदी करून परवडणार नाही हे लक्षात आले. मग म्हशी व कालांतराने देशी गायी खरेदी केल्या. सन २०११ मध्ये म्हशी खरेदीसाठी पावणेदोन लाखांचे तर २०१४ मध्ये गायी खरेदीसाठी दीड लाखांचे कर्ज बँकेकडून घेतले. आज साहिवाल, गीर, राठी, कोकण गिड्डा अशा एकूण १८ गायी आहेत. जोडीला कुक्कुटपालन असून ५० ते १०० गावरान कोंबड्यांचे पालन केले जाते. त्यांची वृद्धी व विक्री यातून उत्पन्न मिळवले जाते.

पूरक उत्पादने

शेणापासून वर्षाला २० टन गांडूळखताची निर्मिती करतात. शेतीत वापरून उर्वरित खताची प्रति किलो दहा रुपये दराने विक्री होते. त्यातून सुमारे दोन लाखांची उलाढाल होते. वर्षाला १५० किलो देशी तुपाचे उत्पादन व प्रति लिटर २५०० रुपये दराने विक्री होते. त्यापासून दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. शेतीत वापर होऊन शिल्लक ताकाचीही विक्री होते.

लेंडीखतापासून पावडर निर्मिती

विविध उत्पादनांची विक्री सुरू करतानाच सहकाऱ्याने लेंडीखत तयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार यंदापासून लेंडीखताची पावडर निर्मिती सुरू केली आहे. स्वयं रोजगार ॲग्रो या नावाने किलोला २० रुपये या दराने दोन टनांपर्यंत त्याची विक्री केली आहे. शेतकऱ्यांकडूनही ते लेंडी खरेदी करतात. अशा प्रकारे पावडर तयार करून विक्री करण्याचा जिल्ह्यातील बहुधा पहिला प्रयोग असावा. राज्यातही असे प्रकल्प कमीच असावेत.

आनंद यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

संकरित भात वाणांचा वापर न करता भाताच्या दुर्मिळ होत चाललेल्या पारंपरिक वाणांवर भर.

त्यांचे संवर्धन व प्रसारासाठी बियाण्यांचा पुरवठा.

वालय, बेळा, वाडाकोलम, आजरा, रक्तसाळ, इंद्रायणी यांचा वापर. भातपिकांमधील दुर्मिळ होत चाललेल्या पांरपरिक वाणांची लागवड ते करतात.या वाणांचे संवर्धन आणि प्रसारासाठी बियाण्यांचा पुरवठा देखील ते करतात. त्यांच्याकडील पारंपरिक वाणाच्या बियाण्याला व सेंद्रिय तांदळाला मोठी मागणी असते.

आपला सर्व शेतीमाल व पूरक उत्पादनांसाठी थेट ग्राहक तयार केले आहेत.

आनंद यांना पत्नी अन्यन्या यांची भक्कम साथ आहे. शेती आणि पूरक व्यवसायातील सर्व कामे त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून करतात. पॉवर टिलर त्या चालवतात. आई वंदना, वडील वसंत यांचे मार्गदर्शन मिळते. कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे व संपूर्ण कृषी विभागाचे विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य मिळते. कृषी अधिकारी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा आदर्श घेण्याचा सल्ला देतात.

आनंद रावले  ९४२०२०६९४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com