Millets In Diet Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Year 2023 : भरड धान्य आरोग्यासाठी फायदेशीर का ठरतात? कोणत्या आजारांना होतो प्रतिबंध?

पौष्टिक तृणधान्य मधुमेह, बद्धकोष्ठता, आतड्याच्या आजारास प्रतिबंध करतात, तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहेत.

विनयकुमार आवटे

International Millet Year बहुतांशी पौष्टिक भरड धान्यांचे (Millet) उगमस्थान हे आशिया व आफ्रिका खंडात आहे. भारतामध्ये २०१८ हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबविण्यात आले. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) म्हणून साजरे करण्यात येत आहे.

पौष्टिक तृणधान्यांमध्ये आपल्याकडील प्रामुख्याने ज्वारी (Jowar), बाजरी, नागली, वरई, कुटकी, कनगी, कोदो, सावा (लिटल मिलेट) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या पौष्टिक तृणधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणतः ७ ते १२ टक्के , स्निग्ध पदार्थ २ ते ५ टक्के, पिष्टमय पदार्थ ६५ ते ७५ टक्के व आहारातील तंतूमय पदार्थ १५ ते २० टक्के असते.

याचबरोबर जीवनसत्त्व व खनिजे जसे की,कॅल्शिअम, लोह, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, तांबे व मानवी आरोग्यास उपयुक्त घटक विपुल प्रमाणात आढळतात. ही तृणधान्ये ग्लुटेन प्रोटीन मुक्त आहेत. (ग्लुटेनमुळे काही लोकांना ॲलर्जी होते.)

पौष्टिक तृणधान्य मधुमेह, बद्धकोष्ठता, आतड्याच्या आजारास प्रतिबंध करतात, तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहेत.

नाचणीमध्ये कॅल्शिअम या खनिज द्रव्याचे प्रमाण सर्वाधिक आढळते. ही पिके बदलत्या हवामानाला योग्य पद्धतीने जुळवून घेतात. ही पिके कमी पाण्यावर, हलक्या जमिनीत चांगली येतात. कीड व रोग प्रतिकारक असतात, कमी उत्पादन खर्च असतो.

वातावरणावरील ताण कमी करतात.कमी कालावधीत तयार होतात. यामुळे अन्न सुरक्षा, आहार सुरक्षा, रोगांपासून सुरक्षा, आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील आरोग्य विषयक महत्त्व लक्षात घेता आता प्रत्येकाने आपल्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, ज्वारीचे आंबिल, नाचणीची पेज, ज्वारीचा हुरडा, बाजरीची भाकरी, ज्वारी-बाजरीच्या लाह्या, राजगिरा लाडू इत्यादी अनेक पदार्थांचे नियमित सेवन करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

१) राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, मध्यप्रदेश, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये प्रामुख्याने या पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन घेतले जाते.

२) देशामध्ये १९६६ मध्ये पौष्टिक तृणधान्याखाली सुमारे ३६९ लाख हेक्टर क्षेत्र होते ते आता१४७ लाख हेक्टर राहिले आहे.

यात प्रमुख पीकनिहाय क्षेत्रातील घट ही ज्वारी ६७ टक्के, नाचणी ५६ टक्के, बाजरी २४ टक्के अशी आहे. महाराष्ट्रामध्ये १९६० साली पौष्टिक तृणधान्याखालील क्षेत्र ८३ लाख हेक्टर होते ते आता २०२१-२२ मध्ये २३ लाख हेक्टर झाले आहे.

३) पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊन हैदराबाद येथे भारतीय पौष्टिक तृणधान्य संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पौष्टिक तृणधान्याचे फायदे ः

१) शरीरातील विषारी पदार्थ कमी करणे.

२) हानिकारक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणे.

३) कर्करोग तसेच मधुमेहास प्रतिबंध करणे.

४)उच्च रक्तदाब नियमित करणे, हृदयरोग पासून संरक्षण.

५) श्वसनाशी निगडित विकार, दमा उपचार करणे.

६) किडनी, यकृत व रोगप्रतिकार क्षमता, कार्य सुधारणे.

७) आतड्याचा कर्करोग, इत्यादी विकार नियंत्रणात ठेवणे .

८) बद्धकोष्ठता, पोटातील वायू, स्नायूमध्ये पेटके येणे हे कमी करणे.

प्रमुख पौष्टिक तृणधान्याखालील क्षेत्र ः

पीक--- १९६०-६१ मधील क्षेत्र (लाख हेक्टर) --- २०२१-२२ मधील क्षेत्र (लाख हेक्टर)

ज्वारी---६२.८५---१६.४९

बाजरी---१६.३५---५.२६

नाचणी---२.३०-०--०.७३

इतर तृणधान्ये---१.७७---०.६०

तृणधान्यांचा आहारातील अभावाचा परिणाम ः

१) चुकीची जीवन पद्धती,पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील अभाव, वाढता मानसिक तणाव या सारख्या बाबींमुळे स्थूलता, अनियमित रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, श्वसनाचे विकार याचा प्रादुर्भाव वाढत आहे.

२) एका सर्वेक्षणानुसार अशा प्रकारच्या संसर्गजन्य नसलेल्या विकारांमुळे सन १९९० मध्ये मृत्यूचे प्रमाण जवळपास ३७.९ टक्के होते, ते वाढून २०१६ मध्ये ६१.८ टक्के झाले आहे.

३) भारतातील ३० ते ६९ या वयोगटातील अकाली मृत्यूच्या प्रमाणामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यांचे प्रमाण ५५ टक्यांपेक्षा अधिक आहे. २०२१ मधील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रात मधुमेहाचे प्रमाण शहरी भागात १०.९ टक्के तर ग्रामीण भागात ६.५ टक्के आढळून येते .

४) आहारातील ज्वारीचे ग्रामीण व शहरी भागातील प्रमाण पाहिले असता १९७३-७४ मध्ये प्रति व्यक्ती, प्रति वर्ष खाण्याचे प्रमाणात ग्रामीण भागात आहारात ज्वारीचा वापर १९ किलो होता.

तो कमी होऊन २०११-१२ मध्ये केवळ २.४ किलो झाले आहे.शहरी भागामध्ये याच कालावधीत याचे प्रमाण ११ किलो वरून घटून १.५६ किलो झाले आहे.

(लेखक कृषी विभागामध्ये कृषी सहसंचालक (वि.प्र. -१) तथा मुख्य सांख्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT