Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : वर्षभरात सहा चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : बदलत्या हवामानाच्या परिणाम गेल्या काही वर्षांपासून जाणवत आहे. यामुळे अतिवृष्टी, चक्रीवादळे तयार होणे, अवकाळी पाऊस पडणे अशा अनेक घटना वाढत असून चक्रीवादळांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येते आहे. मागील वर्षात तब्बल सहा चक्रीवादळे तयार झाली होती. विशेष म्हणजे चक्रीवादळाच्या कालावधीतही वाढ होत असून दहा वर्षांच्या काळातील ही सर्वाधिक चक्रीवादळे आहेत.

मागील वीस ते तीस वर्षांत वातावरणात मोठे बदल होत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटनांतही वाढ होत आहे. त्याचबरोबर दरवर्षी तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात मे महिन्यात बंगालच्या उपसागरात मोचा, ऑक्टोबरमध्ये हामून, नोव्हेंबरमध्ये मिधिली, डिसेंबरमध्ये मिन्चॉग अशी चार चक्रीवादळे तयार झाली होती.

तर अरबी समुद्रात जून महिन्यात बिपोरजॉय आणि सप्टेंबर महिन्यात तेज अशी दोन चक्रीवादळे तयार झाली होती. वर्षभरात तयार झालेल्या चक्रीवादळामध्ये सर्वाधिक तीव्र असलेल्या चक्रीवादळामध्ये बिपरजॉय वादळ गणले गेले आहे. हे पूर्व-मध्य अरबी समुद्रावर तयार झालेले एक शक्तिशाली आणि अनिश्‍चित उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते. साधारणपणे सहा ते १९ जून असे एकूण १३ दिवस त्याची तीव्रता होती.

चक्रीवादळासोबत बंगालच्या उपसागराच्या नैॡत्य भागात ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. तर एक ते ३ ऑगस्ट या कालावधीत बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात खोल कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. अरबी समुद्रात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते.

तर २०२२ मध्ये बंगालच्या उपसागरात ७ ते १२ मे दरम्यान आसनी हे चक्रीवादळ तयार झाले होते. तर ६ ते १० डिसेंबर या कालावधीत तीव्र मंदोस नावाचे चक्रीवादळ तयार झाले होते. तर बंगालच्या उपसागर, अरबी समुद्र, हिंद महासागरात एकूण १३ कमी दाबाचे, खोल कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. २०२२ च्या तुलनेत विचार केल्यास २०२३ मध्ये सर्वाधिक चक्रीवादळे तयार झाल्याचे दिसून येते.

चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?

समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होते. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सिअस तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते.

चक्रीवादळ विध्वंसक का ठरते?

चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते. या वाऱ्यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूरही येऊ शकतो.

बंगालच्या उपसागरात सर्वाधिक वादळे का?

भारताच्या दोन्ही बाजूंनी समुद्र असूनही सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरातूनच तयार होतात. याचे कारण म्हणजे दोन्ही समुद्रांच्या तापमान, बंगालच्या उपसागराचे तापमान मॉन्सूनआधी आणि मॉन्सूननंतर अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे पावसाआधी किंवा नंतर खास करून ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.

त्यातही वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भौगोलिक रचना. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्याला पूर्व भारताजवळ तिन्ही बाजूंनी जमीन असल्याने वाऱ्यांना कमी जागा मिळते. त्यामुळेच ते अधिक विध्वंसक बनतात. याच्या उलट अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाला आजूबाजूला केवळ समुद्र असल्याने ते लवकर विरते. बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार होणारे चक्रीवादळ यांतील गुणोत्तर चारस एक आहे.

गेल्या काही वर्षांत हवामानात मोठे बदल होत आहे. या बदलामुळे अनेक नैसर्गिक घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने चक्रीवादळात झालेली वाढ ही महत्त्वाची आहे. मागील वर्षातही सहा चक्रीवादळे तयार झाली आहेत. यात अरबी समुद्रात दोन तयार झाली आहेत.
- डॉ. कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, भारतीय हवामान विभाग, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT