New Delhi News : देशामध्ये पशू गणना पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत केली जाणार आहे. यासाठी २०० कोटी रुपये खर्च येणार असून यातून जमा केलेल्या माहितीतून देशाच्या पशू सुरक्षा, पशू विभागाच्या क्षेत्राचा विकास आणि सरकारला भविष्यात धोरणे आखण्यासाठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी केले.
२१ व्या पशू गणनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २५) करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. त्याचबरोबर या वेळी भारतातील साथीच्या तयारीसाठी आणि प्रतिसादासाठी पशू आरोग्य सुरक्षा बळकट करण्यासाठी २५ दशलक्ष डॉलर ‘पँडेमिक फंड प्रोजेक्ट’ लाँच केला.
पशू गणनेमधील महत्त्वाचे मुद्दे
आतापर्यंत देशात वीसवेळा पशूगणना. शेवटची पशूगणना २०१९ साली झाली होती. यंदाच्या पशूगणनेचे वैशिष्ट म्हणजे मोबाइल आणि माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर.
देशातील २१९ देशी पशू, पक्षांच्या जाती तसेच १६ प्रजातींची नोंद.
गोवंश, म्हैसवर्ग, मिथुन वर्ग, याक, शेळी, मेंढी, वराह, पोनी, उंट, घोडे, खेचर, गाढव, श्वान, ससे, हत्तींची नोंद.
कुक्कुटवर्गीय पक्षांच्या स्वतंत्र नोंदीमध्ये गिली फाऊल, बदक, टर्की, गीज, बटेर, इमू पक्षांचा समावेश.
पशू गणनेमध्ये स्थलांतरित, भटक्या पशू पालकांच्याकडील पशूंची देखील स्वतंत्र नोंद.
पशुपालनामध्ये पुरुष आणि महिलांचा किती प्रमाणात सहभाग याची स्वतंत्र नोंद. याचा विविध योजना आखण्यासाठी उपयोग.
राज्यामध्ये ४ नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात प्रारंभ
विविध कारणांमुळे गेल्या काही दिवस रखडलेल्या २१ व्या पशुगणनेच्या ॲपचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २५) झाले असले तरी, प्रत्यक्षात पशू गणनेला ४ नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले. पशुगणनेच्या ॲपच्या उद्घाटनानंतर जिल्हा पातळीवरील अधिकारी विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी विविध अधिकारी दिल्लीमध्ये दाखल झाले असून, त्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर प्रत्यक्षात ४ नोव्हेंबर पासून गणना सुरू होईल आणि दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असेही आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले.
प्रगणकांना मानधन, मोबाइल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे. पशू गणना करण्यासाठी तीन हजार घरांमागे एक प्रगणक नेमण्यात आले आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले गेले आहे. तसेच, प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी, तसेच पदवीधारक विद्यार्थी प्रगणक म्हणून या मोहिमेत सहभागी होत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.