Turmeric Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Harvesting : सुधारित पद्धतीने हळद काढणी

Method of Turmeric Harvesting : हळद लागवड पद्धतीनुसार हळद काढणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा.

डॉ. मनोज माळी

डॉ. मनोज माळी

Different Methods of Harvesting Turmeric : महाराष्ट्रातील प्रमुख नगदी मसाला पीक म्हणून हळद पीक ओळखले जाते. हळदीचा उपयोग दैनंदिन आहारात, औषधे, सौंदर्य प्रसाधने, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. हळद लागवडीमध्ये हळद काढणी ही अत्यंत महत्त्वाची कार्यवाही असते. सर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद पीक ७ ते ९ महिन्यांत काढणीस तयार होते.

यामध्ये प्रामुख्याने हळव्या जातींना तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात (उदा. आंबे हळद, आयआयएसआर- प्रगती). तर निमगरव्या जाती या ७ ते ८ महिन्यांत काढणीस येतात (उदा. फुले स्वरूपा). गरव्या जाती ८ ते ९ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात (उदा. सेलम, कृष्णा). त्यामुळे जाती परत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पिकाची पाला कापू नये.

हळद काढणी

जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानावरील हलक्या जमिनीतील पिकाचा कालावधी पूर्ण होतेवेळी ८० ते ९० टक्के पाने वाळलेली असतात. तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते.

हळदीच्या काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पाणी बंद करावे. त्यामुळे पानांतील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी

येते. जर पिकास शेवटपर्यंत पाणी देणे सुरुच ठेवले तर हळकुंडाना नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादनात घट होते.

पाला वाळल्यानंतर १ इंच जमिनीवर खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने हळदीचा पाला कापावा. कापलेला पाला बांधावर गोळा करून ठेवावा. शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे. त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन भेगाळली जाते. त्यामुळे काढणी करणे सुलभ होते.

हळद लागवड पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धतीचा अवलंब करावा. सरी वरंबा पद्धतीत टिकाव अथवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी. तर गादी वाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा.

काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. परिणामी, हळद काढणी करणे सोपे होते.

खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.

काढणीच्या साधारण २ ते ३ दिवसांनंतर हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळदीच्या कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात.

त्यानंतर जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी किंवा सडलेली हळकुंडे या प्रमाणे कच्च्या मालाची प्रतवारी करावी. प्रतवारी केल्यानंतर मालाची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.

काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीवर प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणतः १५ दिवसांच्या आत प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो.

जातीपरत्वे साधारणपणे एकरी १५० ते २०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते. तर प्रक्रिया केल्यानंतर ३० ते ४० क्विंटल उत्पादन मिळते.

पारंपरिक पद्धत

या पद्धतीत पूर्णपणे कंद जमिनीतून निघत नाहीत. १० ते १५ टक्के कंद जमिनीत तसेच राहतात.

सरी वरंबा अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या ठिकाणी या पद्धतीने हळदीची काढणी करता येते.

या पद्धतीने काढणी करण्यासाठी एकरी १८ ते २० मजूर लागतात.

कंदास इजा होण्याची शक्यता असते.

यंत्राद्वारे काढणी

हळद काढणी यंत्र कंदाच्या खालून कंद वर उचलून घेत असल्याने केवळ १ ते २ टक्के कंदच जमिनीमध्ये राहतात.a

फक्त गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या पिकामध्येच यंत्राद्वारे काढणी करता येते.

पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत मजूर संख्येत बचत होते.

यंत्राद्वारे कंद जमिनीतून अलगद उचलत असल्याने कंदास इजा पोहोचत नाही.

प्रतवारी

जेठा गड्डा

मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठा गड्डा (मातृकंद) म्हणतात.

हे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरले जातात. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे त्वरीत सावलीमध्ये ठेवावेत.

सोरा गड्डा

लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदाना ‘सोरा गड्डे’ म्हणतात.

हे गड्डे काळपट रंगाचे मुळ्याविरहित

असतात. त्यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो.

बगल गड्डे

जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, यांस अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात.

हळकुंडे

बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास ‘हळकुंडे’ असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी हळकुंडाचा वापर केला जातो. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास ‘लेकुरवाळे हळकुंडे’ असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT