Soluble Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Soluble Fertilizer : विद्राव्य खतांचे महत्त्व

Fertilizer Management : रासायनिक खताचे भौतिक गुणधर्म, आकार, घनता यावरून घन खते, द्रव खते, पाण्यात विरघळणारी (विद्राव्य) खते असे प्रमुख तीन प्रकार पडतात.

Team Agrowon

Use Of Soluble Fertilizer : मयूरी अनुप देशमुख

रासायनिक खताचे भौतिक गुणधर्म, आकार, घनता यावरून घन खते, द्रव खते, पाण्यात विरघळणारी (विद्राव्य) खते असे प्रमुख तीन प्रकार पडतात. वनस्पतींच्या अन्नद्रव्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी वनस्पतीच्या वाढीची अवस्था व जमिनीतील ओलावा यानुसार योग्य त्या विद्राव्य खतांचा वापर केल्‍यास अधिक फायदा होतो.

रासायनिक खतांचे मुख्य प्रकार पुढील प्रमाणे -

१) घन खते - घन खतांचेही प्रकार आणि आकारानुसार वर्गीकरण केले जाते. उदा. दाणेदार (ग्रॅन्युल), प्रिल, कांडी (पॅलेट्स) आणि भुकटी (पावडर) इ.

२) द्रव खते - द्रव खते अचूक प्रमाणात वापरासाठी पातळ किंवा अधिक तीव्र स्वरूपात तयार केलेली असतात.

३) पाण्यात विरघळणारी (विद्राव्य) खते -पाण्यात विरघळणाऱ्या स्फटिक किंवा दाणेदार स्वरूपामध्ये येणारी ही खते पाण्यात उत्तम विरघळतात. क्रिस्टल्समध्ये येतात. त्यांचा वापर पाण्यासोबत सिंचन प्रणालीतून देण्यासाठी केला जातो. या प्रक्रियेला ‘फर्टिगेशन’ म्हणतात. विद्राव्य खतांचा वापर करणे तुलनेने सुलभ असून, अधिक मनुष्यबळ लागत नाही. त्याच प्रमाणे मुळाच्या कक्षेत पाण्यासोबत दिली जात असल्याने त्यांची उपलब्धताही अधिक राहू शकते.

विद्राव्य खते म्हणजे काय?

विद्राव्य खते ही मुलतः घन खताप्रमाणेच असून, ती पाण्यास विरघळतात. त्यात एक किंवा अन्य अन्नद्रव्यांचा समावेश असू शकतो.

विद्राव्य खते का वापरावी?

हवामानातील बदल, जमिनीचा प्रकार, सुपीकता, ओलावा, उपलब्ध अन्नद्रव्ये, पीक संरक्षण व व्यवस्थापन या सर्व बाबींचा पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परिणाम दिसून येतो. त्याच प्रमाणे पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याची गरज बदलत असते.

पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जमिनीतून एकदा किंवा दोन वेळा विभागून रासायनिक खते देतो. मात्र विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यासोबत देता येत असल्यामुळे पिकाच्या गरजेप्रमाणे अनेक वेळा विभागून देता येतात. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागत नाही. तातडीने पुरवठा करायचा असल्यास फवारणीद्वारेही विद्राव्य खते देता येतात.

विद्राव्य खतांचे महत्त्व

१) विद्राव्य खते ही रासायनिक घन खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात.

२) अन्नद्रव्याचा तातडीने पुरवठा करायचा असल्यास ही खते फवारणीद्वारेही देता येतात.

३) पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खताचा वापर यात सांगड घालणे सोपे जाते.

४) या खतांमुळे जमिनीच्या गुणधर्मावर परिणाम होत नाही.

५) विद्राव्य खते अनेक वेळा विभागून देता येतात.

६) पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरा होण्याची किंवा वायुरूपात वाया जाण्याची शक्यता कमी असते. दाणेदार आणि द्रव स्वरूपातील रासायनिक खते कशी वापरता येतात :

१) दाणेदार खते :

दाणेदार खते पिकांना देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. बांगडी पद्धत, ओळीतून किंवा फेकूनही दिली जातात. खते दिल्याबरोबर जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते.

या प्रकारच्या खतामधील काही खते पूर्णतः पाण्यात विद्राव्य असतात. उदा. युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश इ. अशी खते पाण्यात विरघळवून ठिबक सिंचनाद्वारे दिली जाऊ शकतात. मात्रा माती परीक्षणाच्या अहवालानुसार पिकांना शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.

२) विद्राव्य खते :

सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खते उपलब्ध आहेत. पाण्यात पूर्णपणे विरघळणारी ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रामुख्याने ठिबकद्वारे दिली जातात.

गरज व तातडीनुसार फवारणीतूनही वापर करता येतो. मात्र ती पानांसोबत चिकटून राहावीत, यासाठी चिकटद्रव्याचा वापर करावा लागतो. मात्र फवारणीतून देण्याची मात्रा ही कमी (जमिनीतून वापराच्या तुलनेत) व अचूक ठेवाली लागते. आता पिकाच्या वाढीनुसार खतांच्या ग्रेड उपलब्ध आहेत.

विद्राव्य खतांची फवारणी कोणत्या परिस्थितीमध्ये करावी?

-पिकाला जास्त दिवसांपासून जमिनीतून खत देणे शक्य न झाल्यास.

-जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी उशीर होत असल्यास.

- भरपूर पाने-फुले असताना आवश्यकतेप्रमाणे जमिनीमधून खतांचा पुरवठा होत नसल्यास.

- विशेषतः वनस्पतींच्या अवयवांवर कमतरतेची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने अन्नद्रव्याच्या पुरवठ्यासाठी फवारणीतून खते द्यावीत.

चांगल्या विद्राव्य खतांची लक्षणे

-ही खते कोणत्याही तापमानात सहज विरघळणारी असावी.

-ठिबक सिंचन पद्धतीमध्ये वापरताना ड्रिपर व फिल्टर चोक होणारी नसावीत.

-ही खते एकमेकांमध्ये मिसळता यावीत.

-ही खते हाताळण्यासाठी सुलभ व सोपी असावी.

-ठिबकमधून वापरताना पाण्यात उत्तम प्रकारे मिसळून मुळांपर्यंत जावीत. उदा. साका बनू नये.

-पाण्याच्या सामू (पी.एच.)मध्ये मोठा बदल करणारी नसावीत.

खतांच्या फवारणीमधील महत्त्वाचे मुद्दे व फायदे

-जमिनीत ओलावा कमी असतानाही फवारणीतून खते देता येतात.

-आपत्कालीन परिस्थिती किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरता दाखवणारी तातडीची परिस्थितीमध्ये फवारणीतून विद्राव्य खते द्यावीत.

-अलीकडे चिलेटेड स्वरूपातील विद्राव्य खते उपलब्ध आहेत. त्यांचे शोषण पानांद्वारे अधिक चांगल्या प्रकारे होते.

-विद्राव्य खतांची फवारणी ही कडक व तीव्र उन्हामध्ये करू नये.

खते मिसळताना या बाबी टाळाव्यात...

- कॅल्शिअम नायट्रेट हे खत कोणत्याही परिस्थितीत सल्फेट खतांबरोबर मिसळू नये. कारण त्यामुळे पाण्यात न विरघळणारे क्षार तयार होतात. उदा. जिप्सम (कॅल्शिअम सल्फेट).

-कॅल्शिअम नायट्रेट हे कोणत्याही फॉस्फेटयुक्त खतांमध्ये मिसळल्यास त्यापासून न विरघळणारे कॅल्शिअम फॉस्फेट तयार होते.

-अमोनिअम सल्फेट सोबत पोटॅशिअम क्लोराइड व पोटॅशिअम नायट्रेट सोबत मिसळल्यास त्यापासून न विरघळणारे पोटॅशिअम फॉस्फेट तयार होते.

-मॅग्नेशिअम क्षार हे मोनो किंवा डायअमोनियम फॉस्फेटबरोबर मिसळल्यास त्यातून न विरघळणारे मॅग्नेशिअम फॉस्फेट तयार होते.

-फॉस्फरसयुक्त खताबरोबर फेरस सल्फेट मिसळल्यास फॉस्फेटचा साका तयार होऊन तो पिकांना उपलब्ध होत नाही.

ठिबक सिंचन पद्धतीद्वारे विद्राव्य खते दिल्याने होणारे फायदे

-पिकांना ओलिताचे पाणी व खते आवश्यकतेनुसार अचूक प्रमाणात देता येतात. त्यांची उपलब्धता वाढते.

-खते पीकवाढीच्या अवस्थेनुसार व शरीरक्रियाशास्त्रानुसार पिकांना खते विभागून देता येतात. हवेतून किंवा निचऱ्याद्रारे होणारा ऱ्हास टाळता येतो.

- खते ही पाण्यातून दिल्यामुळे वेळ, मजूर व कार्यक्षमतेत बचत होते.

-हलक्या व कमी खोलीच्या जमिनीत पीक उत्पादनासाठी अत्यंत उपयोगी ठरते.

- खतांची मात्रा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाचविता येते.

-तणाचा प्रादुर्भाव कमी राहतो. खते व पाण्यासाठी पिकांशी स्पर्धा होत नाही.

फर्टिगेशन करताना या बाबी लक्षात ठेवा

- देण्यापूर्वी खते पाण्यात पूर्णपणे विरघळल्याची खात्री करावी.

- कोणती खते कोणत्या खतांसोबत द्यायची नाहीत, हे लक्षात ठेवा.

जमिनीच्या व पिकांच्या प्रकारानुसार खताच्या मात्रेमध्येबदल होत असतो. त्यामुळे पीकवाढीच्या अवस्थांनुसार खतांचा वापर करावा.

-पिकांच्या वाढीनुसार खतांचा शिफारशी जाणून घ्या.

- पाण्याचा पी.एच. व क्षारता हे गुणधर्म अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे खते देताना त्याचाही विचार करावा.

-खते देताना त्यात बुरशीनाशक व कीटकनाशक मिसळू देऊ नये.

- खते दिल्यानंतर जास्त पाणी देणे टाळावे. अन्यथा, खतांचा मुळाच्या कक्षेतून निचरा होतो.

मयूरी देशमुख, ९२८४५२२२८४

(सहायक प्राध्यापक, मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka | शेतजमिनीसाठी एकरी ३० ते ४० लाख दर; अप्पर कृष्णा प्रकल्पासाठी भूसंपादन

Nidva Cane Subsidy : ‘क्रांतिअग्रणी’कडून निडवा उसाचे अनुदान शेतकऱ्यांना अदा

Pradhanmantri Suraksha Bima Yojana: फक्त २० रुपयांत मिळणार २ लाखांचा विमा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sugarcane Disease : खोची परिसरात उसावर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढला

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT