अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक (Drip Irrigation) आणि अन्य सूक्ष्म सिंचन (Micro irrigation) पद्धतीचा वापर करू लागली आहेत. सुक्ष्मसिंचनातून आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा (Soluble Fertilizers) वापर केला जातो.
अशा पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्यांना विद्राव्य खते म्हणतात. त्यांच्या वापर ठिबक सिंचनासोबत फवारणीद्वारेही करता येतो.
विद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यायची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहेत.
फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. मात्र फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात.
या विद्राव्य खतांचा फावरणीद्वारे वापर कसा करायचा आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
विद्राव्य खताचा फवारणीद्वारे वापर करताना...
पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते. फवारणीद्वारे अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे. अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर करताना पिकांवर नियमित व वारंवार फवारणी केली पाहिजे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर फळवर्गीय पिकांना जास्त उपयुक्त आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मीय असू नये. त्यासाठी द्रावणात चुना योग्य त्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. ज्यामुळे द्रावणाचा सामू अल्क किंवा आम्लधर्मी होत नाही.
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरासाठी द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असावी. ज्या पिकांच्या पानावर मेणयुक्त थर असतो त्या पिकांवर फवारणी करताना द्रावणात स्टीकर मिसळावा.
फवारणी करताना काय काळजी घ्यावी?
द्रावणाची तीव्रता कमी ठेवून जास्त फवारण्या कराव्यात, परंतु जास्त तीव्रतेचे द्रावण कधीही करू नये.
फवारणीच्या वेळेस थेंबाचे आकारमान अत्यंत कमी असावे. म्हणजे थेंब पानांवर किंवा झाडावर पडताच चिटकला पाहिजे. थेंब मोठा असल्यास तो ओघळून जमिनीवर पडतो.
फवारणी केल्यानंतर द्रावणाचा थेंब पानावर चिकटत नसेल तर स्टीकरचा वापर करावा.
अशाप्रकारे विद्राव्य खताचा वापर केल्यास खताची नासाडी होत नाही. पीक फुलोऱ्यात येण्याचा काळ, फळधारणा झाल्यानंतर तसेच बिया, फळांची वाढ होण्याकरिता जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशा वेळेस फवारणीद्वारे दिलेली खते खूप उपयोगी पडतात. त्यामुळे विद्राव्य खताचा वापर फवारणीद्वारे करताना येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.