Warehouse Business Agrowon
ॲग्रो विशेष

Warehouse Business : गोदाम व्यवसायात ‘डिजिटायझेशन’चे महत्त्व

Digitization of Warehouse : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या यांसारख्या धान्य साठवणूक व्यवसायातील संस्था आता गोदाम व्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्याच्या मार्गावर आहेत.

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

Agriculture Warehouse : कृषी क्षेत्राशी निगडित वेअरहाऊसिंग क्षेत्रातील डिजीटायझेशनचा अभाव ही सर्वात मोठी समस्या सद्यःस्थितीत या क्षेत्रापुढे आहे. यामुळेच कृषी मालाची प्रभावी विक्री व्यवस्था निर्माण होण्यास हा घटक बाधा ठरत आहे.

नाबार्ड, एनसीडीसी, कृषी, पणन, सहकार आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत मंजूर केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साठवण क्षमतेच्या लक्षणीय विकासानंतर असा अंदाज आहे, की अपुरी साठवण क्षमता, गोदामांमधील प्रादेशिक असमतोल, पुरेशा वैज्ञानिक साठवणुकीचा अभाव, अयोग्य हाताळणी आणि अकार्यक्षम लॉजिस्टिक यंत्रणेमुळे एकूण उत्पादनाच्या सुमारे २० ते ३० टक्के अन्नधान्य वाया जाते.

शेतीमाल साठविण्यासाठी गोदामांचा वापर केला जातो. शेतीमालाचे उत्पादन हंगामी असल्याने आणि त्याचा वापर होईपर्यंत काही काळ विलंब होत असल्याने शेतमालाची साठवणूक महत्त्वाची असते. म्हणून, वर्षभर सतत धान्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमतीतील चढ-उतार कमी करण्यासाठी शेतीमाल उत्पादन सुरक्षितरीत्या राखून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

शेतीमालाची साठवणूक करणे, त्यांचे जतन करणे आणि वितरण होईपर्यंत ते सुरक्षित ठेवण्याचे काम गोदामे करतात. तथापि, गोदाम आपली जबाबदारी सक्षमपणे पूर्ण करेल किंवा नाही हे गोदामात शेतीमाल साठविणाऱ्या ग्राहकाला माहिती नसते.

गोदाम व्यवसायातील नियमांचे काटेकोर पालन करणारे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व काही खासगी गोदाम व्यवसायातील कंपन्या वगळता ग्राहक इतर खासगी गोदाम व्यवस्थेचा बळी पडू शकतो.

या व्यवसायामध्ये गोदामचालकाची मोठी जबाबदारी आहे. थोडीशी चूक मोठे नुकसान करू शकते. नुकतेच यवतमाळ जिल्ह्यात एका खासगी गोदामाला लागलेल्या आगीत कापूस गाठीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

यामध्ये शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, भरपाई मात्र मिळाली नाही. गोदाम परवाना, गोदाम विमा, शेतीमाल विमा, वखार विकास व नियामक प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, गोदामातील इलेक्ट्रिक यंत्रणा, डिजिटल सुरक्षा यंत्रणा, गोदामात आगरोधक यंत्रणेच्या सुविधेची अपुरी तरतूद इत्यादी घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रसंग घडतात.

गोदाम पावती योजना

शेतकरी वैज्ञानिक पद्धतीने शेतीमालाची साठवणूक करण्यास पुढे येत आहेत. परंतु व्यापारी गोदाम पावतीच्या व्यवसायात आघाडीवर आहे. हळूहळू सहकारी संस्था, शेतकरी कंपन्यांना सुद्धा गोदाम पावतीचे व्यापारातील महत्त्व लक्षात येत असल्याने तेसुद्धा या मार्गाकडे वळत आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था किंवा गावोगावी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी नावाने प्रसिद्ध असलेल्या सुमारे २०,८४४ संस्थांनी गोदाम पावती व्यवसायात यावे यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत असून सात पथदर्शक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील इतर प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यानंतर पुढील तीन वर्षात प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी आणि महिला बचत गटांचे फेडरेशन या सर्व समुदाय आधारित संस्था गोदाम पावती योजना किंवा धान्य तारण योजना किंवा शेतमाल तारण योजना किंवा वखार पावती योजना अशी वेगवेगळी नावे असलेल्या या संकल्पनेवर आधारित गोदाम साठवणुकीच्या व्यवसायात उतरलेल्या दिसतील.

याकरिता गोदाम पावती संकल्पनेवर आधारित कामकाज करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या यंत्रणांना केंद्रीय स्तरावरून सुद्धा गोदाम पावतीशी निगडित योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीस पर्यायी बाजार व्यवस्थेच्या उभारणीस सुरवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल.

सद्यःस्थितीत ज्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ स्मार्ट प्रकल्प अथवा स्वत:च्या निधीने राज्यात मागील तीन वर्षापासून “वखार आपल्या दारी अभियान” राबवीत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या अभियानाच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामाच्या काढणीच्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या कार्यशाळांना आमंत्रित करीत आहे. गोदाम पावती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवीत आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यास सुरवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राबविलेल्या ‘वखार आपल्या दारी‘ अभियानामध्ये आमंत्रित महिला व पुरुष शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच गोदामास भेट दिल्याचे निदर्शनास आले आहे.

म्हणजेच एवढी मोठी धान्य साठवणूक यंत्रणा आपली नाही, अशी धारणा शेतकऱ्यांची यापूर्वी झाली होती. वखार महामंडळाच्या गोदामासमोरून कित्येक वेळेस शेतकरी गेला असेल परंतु एवढी मोठी वास्तू आपल्यासाठी असल्याची भावना या ‘वखार आपल्या दारी‘ अभियानाच्या माध्यमातून शेतकरी वर्गात निर्माण होत आहे.

शेतीमाल साठवणुकीची योजना

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदामात ७/१२ वर आधारित धान्य साठविण्याच्या भाड्यात शेतकऱ्याला ५० टक्के सूट व शेतकरी कंपनीला २५ टक्के सूट देते. शेतकऱ्यांसाठी गोदामात १०० टक्के धान्य साठवणुकीच्या विमासंरक्षणासह २५ टक्के जागा आरक्षित करण्यात आलेली असते.

गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालाच्या चालू किमतीच्या ७० टक्के मूल्यावर ९ टक्के दराने २४ तासाच्या आत ३ महिने कालावधीसाठी अभिनव शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत कर्ज रक्कम देण्यात येते.

शेतकऱ्यासाठी ५ लाखापर्यंत आणि शेतकरी कंपनीसाठी ७५ लाख पर्यन्तच्या मर्यादेत शेतकऱ्याच्या खात्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत रक्कम ऑनलाइन वर्ग करण्यात येते.

साठवणूक कालावधीमध्ये परिस्थितीनुसार ३ ते ६ महिने वाढ संभवते. गोदाम व्यवस्थापनासह हे सर्व कामकाज सॅप व ब्लॉकचेन सारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येते. कृषी गोदाम व्यवस्थापनात डिजिटायझेशनशी निगडित ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज'' संकल्पनेचा वापर होणे आवश्यक आहे.

कृषी गोदाम व्यवस्थापनामध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ चे फायदे

थेट मॅपिंग.

गोदाम उघडण्याचे आणि बंद करण्याचे वेळापत्रक.

गोदामांमध्ये हवेशीर वातावरण आणि साफसफाईची कार्ये.

साठ्याच्या सुरक्षिततेसाठी प्रलंबित फ्युमिगेशन / कीटकनाशक धुरळणीसाठी सूचना देणारी यंत्रणा.

साठवणूक धान्याची गुणवत्ता तपासणीसाठी वेळापत्रक, त्याचा इशारा देणारी यंत्रणा.

गोदामातील व्यवहारांचे थेट प्रक्षेपण.

गोदामात जमा केलेल्या साठ्याच्या माहितीचे उत्तम व्यवस्थापन, जसे की...

ठेवीदारांचे तपशील.

ठेवीच्या वेळी शेतमालाच्या साठ्याचे प्रमाण आणि गुणवत्ता.

शेतमालाच्या साठ्यातील पोत्यांच्या थप्पीची रचना.

धान्य साठा त्याच्या मूळ जमा केलेल्या थप्पीच्या स्थितीतून बदलण्याची आवश्यकता असल्यास.

गोदामातील साठ्याच्या मालकीचे हस्तांतरण.

धान्य तारण ठेवले किंवा नाही याची माहिती.

साठवणूक कालावधीत संपूर्ण धान्य साठा हाताळणारी एजन्सी/व्यक्तीचा तपशील.

साठवलेले धान्य त्याच्या वास्तविक गुणवत्तेच्या तपशीलासह खरी स्थिती विक्रीचा निर्णय घेण्यास मदत.

साठवणूकीदरम्यान शेतीमालाचे नुकसान आणि नुकसान टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्यास मदत.

गोदामातील साठवणुकीच्या कामकाजाची उत्पादकता, कार्यक्षमता आणि अचूकता वाढविण्यास सहकार्य.

गोदाम वापरातील अचूकता, अंदाज आणि जागेच्या वापरात सुधारणा होण्यास मदत.

गोदामातील कामकाजात समन्वय, व्यवस्थापन करण्यास मदत, कामकाज कार्यक्षमतेमध्ये वाढ.

खऱ्या माहितीच्या उपलब्धतेमुळे धोरणात्मक निर्णय घेताना मदत.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०,

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT