Warehouse Management : माहिती तंत्रज्ञानातून गोदामाचे नियोजन

Warehouse Business : या माध्यमातून ग्राहक नोंदणी, ग्राहकाची मागील वर्षांतील साठवणुकीबाबत माहिती, गोदामात साठविण्यात येणाऱ्या मालाच्या माहितीचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवहाराच्या माहितीचे जतन व व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापनाशी निगडित कामकाज उत्तम प्रकारे करता येते.
Warehouse Business
Warehouse BusinessAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse : शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच महिला बचत गटांचे फेडरेशन व शेतकरी कंपन्यांचे फेडरेशन या समुदाय आधारित संस्थांनी शेतीमाल पुरवठा साखळीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

या प्रक्रियेमध्ये गोदाम, शीतगृह, पॅकहाउस, स्वच्छता आणि प्रतवारी केंद्र, डाळ मिल, बीज प्रक्रिया, कांदा चाळ, पोल्ट्री उद्योग, कांदा प्रक्रिया, फळ प्रक्रिया, कोल्ड व्हॅन, बीज प्रक्रिया केंद्र, केळी पिकवणी केंद्र इत्यादी पायाभूत सुविधांची उभारणी करून व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रामुख्याने नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून हमीभावाने कडधान्ये, तेलबिया व कांदा खरेदी होत आहे. निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. जागतिक बँक अर्थसाह्यित स्मार्ट आणि पोकरा प्रकल्प, आशियायी बँक साह्यित मॅग्नेट प्रकल्पामुळे या समुदाय आधारित संस्थांना बळ मिळाले आहे. केंद्र शासन आणि बँक यांचासुद्धा या प्रगतीत खूप मोठा मोलाचा वाटा आहे.

शेतीमालाच्या पुरवठा साखळ्यांमध्ये गोदाम व्यवस्थेचा मोठा वाटा असून, कृषी आणि फलोत्पादन उत्पादनांच्या व्यवहारांमध्ये एकूण गोदाम उद्योगांपैकी सुमारे १५ टक्के गोदामांचा आणि १६ टक्के शीतगृहांचा वाटा आहे. या १५ टक्के गोदाम उद्योगाची अंदाजे साठवणूक क्षमता १२० दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त असून आर्थिक क्षमता ८००० ते ८५०० कोटी रुपये आहे. ही क्षमता गेल्या ५ वर्षांत ८ ते १० टक्के दराने वाढत आहे.

गोदाम व्यवस्थेतील अडथळे

शेतीमाल पोत्यात भरल्यानंतर प्रत्येक धान्याचे पोते प्रक्रिया करण्यासाठी उघडले जाण्यापूर्वी ते कमीत कमी सहा वेळा हाताळले जाते. अशा वारंवार हाताळणीमुळे जास्त साठवणूक आणि वाहतूक शुल्क लागते. तसेच कीटकांचे संक्रमण होते. हाताळणी दरम्यान अन्नधान्याची नासाडी होते.

राज्य एजन्सीकडे उपलब्ध असलेली साठवण क्षमता प्रामुख्याने बफर स्टॉक, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि इतर सरकारी योजनांसाठी अन्नधान्याचा केंद्रीय साठा ठेवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे शेतीमाल साखळीतील इतर भागधारकांना त्यांचे उत्पादन साठवून ठेवण्यासाठी केवळ किरकोळ साठवणूक क्षमता उरते. अन्नधान्यामध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ ही धान्ये साठवली जातात. गोदामांमध्ये साठवण्यायोग्य इतर प्रमुख पिकांमध्ये तेलबिया, मसाले आणि कापूस यांचा समावेश होतो.

गोदामात साठवणूक केलेल्या शेतीमालाला वित्तीय पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना किंवा बँकांना गोदाम व्यवस्थेतील वरील कारणांमुळे, शेतीमालाची सुरक्षितता आणि शेतीमालाची देखभाल याविषयी पूर्णपणे माहिती नसल्याने वित्तपुरवठा करताना आत्मविश्‍वास नसतो.

Warehouse Business
Warehouse Business : गोदाम व्यवसायात माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व

गोदाम उद्योगात गोदामासारख्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि गोदाम सेवा देणाऱ्या संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा यांची कोणतीही शास्त्रशुद्ध व खरीखुरी माहिती उपलब्ध नसते. गोदाम मालक आणि चालकाने दिलेल्या माहितीवर त्यांना विसंबून राहावे लागते.

पारंपरिक गोदाम व्यवस्थेतील शेतीमाल साठवणूक आणि नोंदणी प्रक्रिया

सद्यःस्थितीत गोदामात धान्य साठवणूक करताना गोदामधारक किंवा मालकांकडून तसेच विविध संस्थांकडून गोदाम व्यवसाय करताना या व्यवसायात माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशन यांचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होत आहे. गोदाम व्यवसायात सुलभ व्यवस्थापनाच्या अनुषंगाने गोदाम व्यवसायाशी निगडित विविध सॉफ्टवेअर/तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे.

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्राहक नोंदणी, ग्राहकाची मागील वर्षांची साठवणुकीबाबत माहिती, ग्राहकामार्फत घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाची माहिती, गोदामात साठविण्यात येणाऱ्या मालाच्या माहितीचे व्यवस्थापन, शेतीमालाच्या आर्थिक व्यवहाराच्या माहितीचे जतन व व्यवस्थापन, शेतीमाल वाहतूक व्यवस्थापन इत्यादी सर्व प्रकारचे गोदाम साठवणूक व्यवस्थापनाशी निगडित कामकाज उत्तम प्रकारे करण्यात येते.

अशा प्रकारच्या उत्तम तंत्रज्ञानाचा वापर गोदाम व्यवस्थापनात होणे आवश्यक आहे. परंतु माहितीच्या अभावामुळे तंत्रज्ञान वापराचे महत्त्व न समजल्याने कृषी क्षेत्रातील गोदाम व्यवस्थापनात तंत्रज्ञान वापराचा अभाव दिसून येतो.

केंद्रशासनामार्फत घोषित २८०० कोटी रुपयांच्या ‘डिजिटल कृषी मिशन’मुळे २०२५ पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांची एर्गोसच्या धर्तीवर ऑनलाइन नोंदणी केल्यामुळे कृषी क्षेत्रात गोदाम व्यवसायासह इतर सर्व कृषी आधारित व्यवसायांची दिशा ठरविणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्रात ज्या भागात धान्यपिके घेतली जातात, त्या भागातील शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून उभारलेल्या गोदामांकरिता एर्गोसचे कामकाज दिशादर्शक ठरेल. त्यामुळे गोदामाची उभारणी केलेल्या सर्व शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थानी डिजिटल कृषी मिशनची वाट न पाहता माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनचा आधार घेऊन शाश्‍वत व्यवसाय उभारणी करावी.

बिहारमधील गोदाम व्यवस्थापन

जागतिक बँक अर्थसाह्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची मांडणी करताना जुलै २०१९ मध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या वतीने बिहार राज्यास भेट द्यायची संधी मिळाली होती. या भेटीत पाटणा, समस्तीपूर तालुक्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थांना भेट देण्यात आली.

या भेटीत जागतिक बँकेचे टीम लीडर, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे प्रतिनिधी, स्मार्ट प्रकल्पाचे गोदाम पावती विषयातील तज्ज्ञांचा या भेटीत समावेश होता. बिहारमध्ये एर्गोस या गोदाम व्यवस्थापनातील स्टार्ट-अप मार्फत प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांना गोदाम पावती व्यवसायात समाविष्ट करून डिजिटायझेशनच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Warehouse Business
Central Warehouse Corporation : केंद्रीय वखार महामंडळाचे नियोजन

एर्गोस संस्थेच्या गोदाम पावतीच्या पद्धतीमध्ये सॉफ्टवेअर, गोदाम व्यवस्थापनातील तंत्रज्ञान, सीसीटीव्ही, मोबाइल अॅप याचा सुंदर उपयोग दिसून आला. यामुळे कमी मनुष्यबळात उत्तम कामकाज दिसून आले. या मॉडेलमध्ये पेरणीपासून लागवडीबाबत तांत्रिक साह्य, बियाण्याची निवड, शेतीमालाचे बाजारभाव, शेतीमालाच्या साठवणुकीबाबत सीसीटीव्हीच्या माध्यमातून शेतीमाल सुरक्षिततेची विश्‍वासार्हता, विक्रीकरिता बाजारपेठेची उपलब्धता, साठवणूक करण्यात आलेल्या धान्याचा विमा इत्यादी सेवा शेतकऱ्यांना देण्यात येतात.

शेतकऱ्याला गावामध्ये बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गोदाम व्यवस्थेशी समरस व्हावे, त्यातून शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, याकरिता एर्गोसने गोदामाच्या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याची मोबाइलमध्ये स्वतंत्र नोंदणी करून घेतली आहे.

त्यात मागील ५ वर्षांची शेतीबाबत माहिती, शेतीमाल विक्रीबाबत संपूर्ण माहिती भरून घेतली आहे. प्रत्येक शेतकऱ्याने मोबाइलमध्ये एर्गोसचे अॅप घेतले असून, त्या माध्यमातून शेतकरी गोदामात साठविलेला स्वत:चा शेतीमाल सुरक्षित आहे की नाही हे रोज पाहू शकतो. अॅपच्या माध्यमातून शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात, मागील वर्षांमध्ये कोणत्या शेतात कोणते पीक पेरले होते, त्यातून किती उत्पन्न मिळाले होते याची सर्व माहिती शेतकरी अॅपमध्ये पाहू शकतो.

एर्गोसच्या माध्यमातून शेतीमाल खरेदी व विक्रीकरिता विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये शेतकरी जास्त किमतीमध्ये शेतीमाल विकू शकतो किंवा साठवू शकतो. माहिती तंत्रज्ञान किंवा डिजिटायझेशनमुळे कृषी गोदाम व्यवसायात शेतकरी सहकारी संस्था व गोदामधारकांचा किती फायदा होऊ शकतो याचे एर्गोस हे एक उत्तम उदाहरण आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एर्गोसचे स्वत:च्या मालकीचे एकही गोदाम नसून सर्व गोदामे विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा मोठ्या शेतकऱ्यांची आहेत.

बिहारमध्ये प्रामुख्याने मका, भात या पिकांचे उत्पादन घेतले जाते. अल्पभूधारक शेतकऱ्यांची लहान घरे आणि साठवणुकीची सुविधा नसल्याने शेतकरी शेतीमालाची काढणी केली की लगेच विकायचा. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर बांबूच्या कणगीमध्ये साळ साठविण्यात येत होती, मात्र उंदीर, घुशी तसेच पावसामुळे याचे नुकसान होत होते. परंतु एर्गोसने निर्माण केलेल्या गोदाम सुविधेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

धान्याची सुरक्षितता, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, वित्त पुरवठा आणि बाजारपेठेची सुविधा यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यात एर्गोस यशस्वी ठरले आहे. सद्यःस्थितीत एर्गोसची मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि आता महाराष्ट्रात गोदाम विषयक व्यवसाय सुरू आहे. २०२५ पर्यन्त २० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com