Warehouse Digitization Agrowon
ॲग्रो विशेष

Warehouse Digitization : गोदाम व्यवसायात ‘डिजिटायझेशन’चे महत्त्व

Team Agrowon

मिलींद आकरे, हेमंत जगताप

Warehouse Business : गोदाम व्यवसायात माहिती तंत्रज्ञान आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ याचा वापर होणे आवश्यक आहे. गोदामाची मालकी असणारे गोदामधारक आणि गोदाम व्यवसायात कार्यरत यंत्रणांनी गोदाम व्यवस्थापनासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा वापर करावा.

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ही एकमेकांशी संबंधित संगणकीय उपकरणे, यांत्रिकी आणि डिजिटल यंत्र, अद्वितीय यांत्रिकी कौशल्य प्रदान केलेल्या वस्तू आणि मानव-ते-मानव किंवा मानव-ते-संगणक संवाद यांची मदत न घेता माहितीचे हस्तांतरित करण्याची क्षमता इत्यादीशी निगडित प्रणाली आहे.‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे गोदाम व्यवस्थापन आणि पुरवठा साखळीच्या प्रक्रियेमध्ये क्रांती येणार असून, या तंत्रज्ञानातील योग्य माहितीमुळे गोदाम पुरवठा साखळी व गोदाम व्यवस्थापनातील संभाव्य जोखीम व धोके ओळखण्यात मदत होऊ शकते. या तंत्रज्ञानामुळे गोदामामध्ये जमा केलेल्या धान्य साठ्याची योग्य माहितीचे व्यवस्थापन आणि गोदामांतील जागेचा पुरेपूर वापर करण्यास मदत इत्यादीबाबत गोदामातील कामकाज धोक्यांपासून सतर्क राहण्यासाठी आगाऊ सूचना मिळण्यास मदत होऊ शकते.

‘आयओटी’ साधने :
रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग :
- रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असून रेडिओ लहरींद्वारे ‘आरएफआयडी’ रीडरसह माहितीची देवाणघेवाण करते.
- टॅगमुळे वस्तूचे ठिकाण व संग्रहित वस्तूंचा तपशील याची माहिती मिळण्यास मदत होते. गोदामात पोत्यांच्या स्वरूपात ठेवलेला शेतीमाल मोजताना एक एक पोते न मोजता एकाच वेळेस सर्व पोती स्कॅनरद्वारे मोजणे व प्रत्येक पोत्यात कोणत्या शेतकऱ्यांचा शेतीमाल ठेवला आहे, शेतीमालाचा प्रकार, शेतकऱ्याचा फोटो, शेताचे फोटो, खते व कीडनाशकांचे प्रमाण, एकूण उत्पादन इत्यादी सर्व प्रकारच्या माहितीचे विश्‍लेषण आरएफआयडी टॅगच्या साह्याने समजू शकते.

- सद्यःस्थितीत सह्याद्री शेतकरी कंपनी, नाशिक यांच्यामार्फत भाजीपाला पुरवठा साखळीत अशा प्रकारचे तंत्रज्ञान क्यूआर कोडच्या माध्यमातून शेतमाल निर्यात करण्यासाठी वापरले जात आहे. थोडक्यात, सांगायचे तर आपण मोठमोठ्या मॉल मध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी जातो त्या ठिकाणी कपडे व इतर वस्तूंना टॅग लावलेले असतात. वस्तूचे बिल देताना टॅग स्कॅनर पुढे धरले तर त्याची किंमत संगणकाच्या स्क्रीनवर येते आणि नंतर बिल मिळते.
- आरएफआयडी टॅग मोबाइल कार्ड चिप स्वरूपात असतात. या पद्धतीची बॅग किंवा पोतेसुद्धा तयार करता येऊ शकतात. याबाबत यापूर्वी काही संस्थांनी आरएफआयडी टॅग न वापरता आरएफआयडी पोत्यांचा प्रयोग राबविला आहे.
- गोदामाचे लेखापरीक्षण करताना गोदामातील पोते मोजावे लागतात. अशा वेळेस या यंत्रणेचा चांगला उपयोग होऊ शकतो. या यंत्रणेच्या अनुपस्थितीत गोदाम पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याचे भासविले जाते. गोदामात मधल्या भागातील पोत्यांचा अपहार केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. लेखपरीक्षणात लेखापरीक्षक मधल्या भागात न गेल्याने व संपूर्ण गोदाम न फिरता फक्त बाहेरच्या बाहेर पोते मोजल्याने असे अपहार घडले आहेत. हे सर्व प्रकार टाळता येऊ शकतात.

दरवाजा सुरक्षा अलार्म/ गजर यंत्रणा :
- गोदामाचे दरवाजे वारंवार उघडणे व बंद करणे हे कामकाज रोजच्या रोज गोदामचालकाद्वारे केले जाते. दरवाजाचे अलार्म ॲक्सेस पॉइंट्स दरवाजांवर बसविण्यात येतात. गोदामात चोरीच्या उद्देशाने होणाऱ्या घुसखोरीविरुद्ध सूचना देण्याचे काम या सुरक्षा अलार्मद्वारे केले जाते.
- वायरसह किंवा वायरविरहित दरवाजाशी जोडलेल्या सुरक्षा अलार्मचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे अलार्म सेन्सर्स आणि चुंबक यांच्या साह्याने काम करतात. गोदामाच्या दरवाजाला कोणी अन्य व्यक्तीने हात लावायचा प्रयत्न केला किंवा चोरीच्या उद्देशाने उघडण्याचा प्रयत्न केला, तर या प्रक्रियेत अलार्म सिस्टिमला सूचना देण्यासाठी प्रणाली कार्यरत होऊन चुंबकीय प्रवाहाने एक सर्किट जोडले जाते, जे घुसखोरीच्या बाबतीत सावध होते आणि अलार्म पॅनेलला सिग्नल पाठविते व अलार्म वाजतो.

तापमान सेन्सर :
- हे एक तापमान मोजण्याचे उपकरण आहे. आरटीडी (प्रतिरोधक तापमान शोधक) किंवा थर्मोकपल या प्रणालीमार्फत विद्युत सिग्नलद्वारे तापमान मोजण्यासाठी या उपकरणास मदत केली जाते.

मोशन सेन्सर्स :
- मोशन डिटेक्टर हे उपकरण हलत्या वस्तू, विशेषतः लोकांना शोधते. असे उपकरण बहुतेक वेळा सिस्टिमचा एक घटक म्हणून स्वयंचलितपणे कार्य करते. क्षेत्रातील गोदाम मालकास गोदाम परिसरात संशयास्पद हालचालीबाबत सतर्क करते.

स्मोक सेन्सर / डिटेक्टर :
- हे उपकरण विशेषत: आगीचे सूचक असलेल्या धुराबाबत सतर्क करते. हे उपकरण जेव्हा गोदामाच्या आतील बाजूस धूर शोधते, तेव्हा ते आगीच्या अलार्मशी संबंधित यंत्रणेला सतर्क करून अलार्म वाजविण्यासाठी सिग्नल देते. यामुळे आगीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

स्कॅनर :
- बारकोड म्हणजे रेषा (बार) जागेची छोटी प्रतिमा जी वस्तू संग्रहित करण्यासाठी, विशिष्ट उत्पादनाचा तपशील, ठेवीदार व्यक्ती, स्थान इत्यादी ओळखण्यासाठी चिकटवलेली असते. एक बारकोड मशिनद्वारे अनिवार्यपणे वाचू शकणाऱ्या व्हिज्युअल पॅटर्नमध्ये माहिती एनकोड करतो.
- वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांच्या (घटक) एकत्री‍करणाद्वारे तयार केला जातो. याचे उत्तम उदाहरण आपण वेगवेगळ्या मॉलमध्ये बिलिंग करताना पाहिले असेलच. त्याचप्रमाणे धान्याच्या पोत्यामध्ये किती धान्य आहे, इतर पदार्थांचे प्रमाण किती आहे ही सुद्धा स्कॅनरद्वारे मोजणारी यंत्रणा यावर सुद्धा संशोधन झाले असून, काही ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे.

सीसीटीव्ही (क्लोज्ड सर्किट टीव्ही) :
- हे गोदामाच्या आत आणि बाहेरील हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी कॅमेरे, रेकॉर्डर आणि डिस्प्ले यांचा समावेश असलेली एक स्वयंपूर्ण देखरेख प्रणाली आहे. यामुळे गोदाम परिसरात आतील व बाहेरील बाजूला होणाऱ्या हालचाली टिपणे शक्य होते. या हालचाली पुढील २५ ते ५० दिवसांपर्यन्त हार्डडिस्कद्वारे जतन करता येऊ शकतात.

टॅब्लेट / मोबाइल उपकरणे / मोबाइल थर्मल प्रिंटर :
- स्मार्टफोन आणि टॅब्लेट गोदामातील कामकाज सुलभ करण्यात मदत करतात. मोबाइल ॲप्सद्वारे देण्यात येणारी माहिती जतन करणारी यंत्रणा व गोदामातील कामकाज करण्यासाठी सोप्या पद्धतीची प्रणाली गोदामचालकास गोदाम व्यवस्थापनात मोलाचे सहकार्य करते.
- मोबाइल प्रिंटिंग ही स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवरून प्रिंटरला वायरलेस पद्धतीने माहिती पाठविण्याची प्रक्रिया आहे. मोबाइल प्रिंटिंगसाठी दोन मुख्य पद्धती आहेत. एक म्हणजे मोबाइल डिव्हाइस आणि प्रिंटरला जोडलेले कॉम्प्युटर आणि दुसरे म्हणजे मोबाइल आणि पोर्टेबल मोबाइल प्रिंटर यांच्यातील संवाद.
- गोदामात शेतीमाल ठेवून त्याची पावती तयार करताना ठेवीदारास स्वीकृतीचे टोकण तयार करण्यात या प्रणालीमुळे मदत होते. सद्यःस्थितीत ज्या ठिकाणी गोदाम व्यवस्थापन विषयक कामकाज केले जाते, त्याठिकाणी डिजिटायझेशनचा वापर होत नसल्याने गोदाम पावती देण्याचे कामकाज करण्यासाठी कागदपत्र व नोंदणी बुक यांचा आधार घेतला जातो. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना बँक, गोदाम व संस्था अशा ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करण्यास फिरावे लागते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळ या संस्थांकडे काही प्रमाणात डिजिटायझेशनचा वापर होत असल्याने उत्तम प्रकारे गोदाम व्यवस्थापन करण्यात येते. यामुळे ग्राहक समाधानी आहेत.

वजन मोजण्याचे प्रमाण आणि आर्द्रता मीटर ः
- इलेक्ट्रॉनिक वजनकाटा हे धान्याचे वजन मोजते आणि आर्द्रता मापक साठविलेल्या शेतीमालातील ओलावा मोजण्यास मदत करते. ही दोन्ही उपकरणे नियंत्रित स्वरूपात असून, माहिती प्रणालीला जोडल्याने धान्याच्या पिशवीचे अचूक वजन आणि आर्द्रता यांची माहिती थेट संगणक प्रणालीत साठविली जाते, ज्यामुळे माहिती भरण्याचा वेळ आणि चुका कमी होण्यास मदत होते.
- यापूर्वी हे कामकाज स्वत: करावे लागायचे, त्यामुळे चुका व्हायच्या अथवा हेतुपुरस्सर चुकीची माहिती भरली जायची. यामुळे शेतीमालाचे वजन कमी होणे व जास्त आर्द्रता असूनही कमी आर्द्रता दाखविली जायची.

वायरलेस बीकन्स प्रणाली :
- बिकन्स हे आरएफआयडी टॅगचे पुढचे रूप आहे. हे उपकरण म्हणजे लहान, वायरलेस ट्रान्स्मीटर आहेत, जे जवळपासच्या इतर स्मार्ट उपकरणांना सिग्नल पाठविण्यासाठी कमी-ऊर्जेचे ब्लूटूथ तंत्रज्ञान वापरतात.
- बिकन्स संकलित मालाच्या हालचालीचा मागोवा घेण्यास मदत करते. त्यात साठविलेल्या पिशव्याची अचूक स्थिती शोधण्याची क्षमता या उपकरणात असते. जर संकलित पिशव्या चिन्हांकित स्थानावरून हलविल्या गेल्या तर बिकन्स अनधिकृत हालचालींबद्दल सिस्टमला त्वरित सूचित करते. कल्पना करा की एका गोदामात १००० आरएफआयडी टॅग लावलेले पोते आहेत, तेथे एक बिकन बसवले आहे. या १००० पोत्यांची माहिती आरएफआयडी टॅगमार्फत वायरविरहित बिकनद्वारे संकलित करण्यात येते.


संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT