Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाने सभेच्या इतिवृत्तात नाशिक बाजार समितीचे विभाजन करण्याबाबत सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कागदावर चिटकविला आहे. सभेच्या इतिवृत्तात फेरफार केल्याचा ठपका ठेवत संचालक मंडळाने प्रकाश घोलप यांना निलंबित केले असल्याची माहिती सभापती कल्पना चुंभळे व संचालकानी दिली.
बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी उपसभापती विनायक माळेकर, शिवाजी चुंभळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, सविता तुंगार, संदीप पाटील, चंद्रकांत निकम आदी उपस्थित होते.
घोलप यांनी कार्यालयीन जावक क्र.९० नुसार २ मे २०२४ या जुन्या तारखेस जावक रजिस्टरला नोंदवून सदर प्रस्ताव पणन संचालक यांना प्रत्यक्षात १० मार्च २०२५ ला प्राप्त झाल्याचे त्यांच्याकडील पत्रावरून समजले. पत्रावर जावक क्र.पणन-५/नाशिक कृउबास विभाजन/२०२५/१०७६ ता.२५ मार्च २०२५ अन्वये आढळून आले आहे. अशा प्रकारे महत्त्वाच्या व कायम दस्तऐवजात फेरफार करून गंभीर गैरकृत्य घोलप यांनी केले.
समितीच्या कामकाजाच्या कागदपत्रांमध्ये अजूनही अशा प्रकारचे गैरप्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वतंत्र आरोपपत्र देऊन चौकशी करण्याचे समितीने ठरविले आहे; परंतु चौकशी होईपर्यंत त्यांना सचिवपदावरून निलंबित केले. दरम्यान, सचिवपदाचा पदभार, कागदपत्रे, सर्व वस्तू सहाय्यक सचिव निवृत्ती बागूल यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.
कोणत्याही प्रकारची अफरातफर झालेली नाही. या ठरावाबाबत शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विद्यमान संचालक सदरचा ठराव हा रद्दबातलही करू शकतात. आपल्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने झाली असून, या विरोधात न्यायालयात जाणार आहे.- प्रकाश घोलप, सचिव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
अशा प्रकारचे आणखी गंभीर प्रकार समितीत असू शकतात. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोणालाही पाठीशी घालणार नसून, दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.- कल्पना चुंभळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
तत्कालीन सभापतींच्या आदेशानुसारच इतिवृत्तात फेरफार झाला. हा गैरप्रकार आहे. दोन दिवसांपूर्वीच एक जरी पुरावा दिला, तर राजकारणातून संन्यास घेईल, असे तत्कालीन सभापती पिंगळे यांनी जाहीर केले होते.-विनायक माळेकर, उपसभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.