Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale: शेतकऱ्यांना तुझ्यासारखी पेन्शन असती तर....

Agriculture Work Disturb Due To Rain : नागव्या पायानं शेतफेरी करून आलो. सततच्या झडीमुळं रानं गिळगिळ झालीत. वावरात पाय चाललेत. अफाट तण वापलंय. तणात सोयाबीन शोधावं लागतंय.

Maharudr Mangnale

Pension For Farmer : नागव्या पायानं शेतफेरी करून आलो. सततच्या झडीमुळं रानं गिळगिळ झालीत. वावरात पाय चाललेत. अफाट तण वापलंय. तणात सोयाबीन शोधावं लागतंय. आठवडा झालं असंच वातावरण आहे. काल दुपारी आणि सायंकाळी झालेल्या पावसाची ८ मिमीची नोंद झालीय. बाकी रात्रभर आणि सकाळपासूनचा पाऊस १ मिमी सुध्दा नसावा. या पावसाला मी मुंग्या मुतल्यासारखा पाऊस म्हणतो.

शेतकरी ईगिण( रोग ) पडू लालंय असं म्हणत आहेत. या पावसाळ्यात अद्याप एकदाही रानातून पाणी बाहेर पडलेलं नाही. पडलेला थेंब जमिनीतच. त्यामुळं विहीरीला सगळीकडून पाझरे फुटलेत. शेततळं भरलयं आणि विहीरीत ४५फुट पाणी आलंय. आता पाणी उपसायची सोय नाही. दोनेक दिवसांत विहीर भरेल असं दिसतंय. सगळे शेतकरी पावसाच्या उघडिपीची वाट बघताहेत. पाऊस थांबला की खुरपणी आणि फवारणीची पळापळ सुरू होईल.

आज सकाळी एक विद्वान पेन्शनधारक म्हणत होता की, शेतकऱ्याला काहीच सहन होत नाही. आधी पाऊस पाहिजे म्हणत होते आता पाऊस जादा झाला म्हणत आहेत.

``होय भाऊ...शेतकऱ्यांना तुझ्यासारखी पेन्शन असती तर तेही पावसाची ही गंमत बघत बसले असते. पण त्यांना पीक घ्यायचंय. त्याच्यावर वर्षभराची जगण्याची तरतूद करायचीय. पिकं लहान असतानाच पाऊस झाला नाही तर रोपं वाळून जातात आणि जादा झाला तर पिवळी पडून जळतात. ही छोटी पिकं म्हणजे लेकरंच की! त्यांना अति ताणही जमत नाही आणि अति खाऊ घातलं तरी चालत नाही. या तळमळीतून ते बोलत असतात...त्याचं फार मनावर घेऊ नको भाऊ! तुझं मस्त चालू आहे ते चालू दे निवांत...``

शेतकऱ्यांना हे ही कळतं की, पाऊस काही त्याच्या मर्जीनं पडत वा थांबत नाही. निसर्गापुढे सगळेच हतबल आहेत. कोणी अतिवृष्टीमुळे परेशान आहे तर कोणी पुरेसा पाऊस झाला नाही म्हणून. वर्षानुवर्षे हे असंच चालू आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्यांचं जगणं अधिक कठिण होत चाललंय. हतबलतेतून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

पण त्यातून त्या कुटुंबाच्या वाट्याला अधिकच वाईट परिस्थिती येतेय. आत्महत्या हा पळपुटेपणा आहे. या कठीण परिस्थितीतून प्रत्येक शेतकऱ्याला स्वत:च मार्ग काढावा लागेल. हे अवघड आहे पण अशक्य नाही. त्यासाठी पहिल्यांदा डोक्यातील परंपरेची, समाजाच्या कथित प्रतिष्ठेची जळमटं बाजूला सारावी लागतील.

ही शेती बाजुला करून निसर्ग प्रेमी म्हणून बघितलं तर इथं माझ्या शेतात अक्षरश: दिवाळी आहे. माझ्या शेतातील घराचा म्हणजे रुद्रा हटचा परिसर हिरवाईने झाकोळून गेलाय. आमचं हे इवलसं ठिकाण कोकणापेक्षा कुठल्याच अर्थाने कमी नाही. नारळापासून आंब्यापर्यंत व प्राजक्तपासून चाफ्यापर्यंत सगळी फळं, फुलझाडं आहेत. गावरान सीताफळांची झाडं फुलांनी लगडलीत.

करंज व चिंचेच्या झाडांनी रुद्रा हटचं आच्छादन बनायचं ठरवलंय. मी हटमध्ये ,कवेलीत, नवेलीत वा अभ्यासिकेत बसो वा जनावराच्या शेडमध्ये, माझ्या डोळ्यासमोर झाडंच असतात. कुठं चिंच दिसते, कुठं नारळ, कुठं चिकू, कुठं आंबा तर कुठं गुलमोहर. हटबाहेरच्या शेडमध्ये तर वेलींच्या सुंदर जाळ्या तयार झाल्यात. काल चार मोसंबी, दोन नारळ, दोन सफरचंद आणि एका बोरीचं रोप बागेत लावलंय. अंजीर, केळीची रोपं आणायचीत.

बाहेरच्या जगातली कुठलीच घाण इथं नाही. महत्त्वाचं म्हणजे टी.व्ही.नावाचा विषारी डब्बा नाही. जे काही गरजेचं बघायचं ते मोबाईलवरच.

निसर्गप्रेमी म्हणून माझ्यासाठी हे वातावरण खासच आहे. सकाळचं फिरणं झालं. योगासन केली. चिवडा, लाडू खाल्ला. बऱ्याच दिवसांनी दुधाचा कडक चहा बनवून पिला. ' मी अल्बर्ट एलिस ' या पुस्तकाचं वाचन सुरू आहे. थोडासा बदल म्हणून फेसबुकवर नाही तर बाहेर चक्कर मारून यायची अन् पुन्हा वाचत बसायचं!

खरं सांगायचं तर, काही मिळवायचं अशी इच्छाच राहिलेली नाही. कुठली जबाबदारी नाही की, मुद्दाम स्विकारलेली बांधिलकी नाही. ना माझी कोणाला, ना मला कोणाची प्रतिक्षा आहे. माझं समाजावाचून आणि समाजाचं माझ्याकडून काहीच अडण्यासारखं नाही. त्यामुळं कोणी मला वा मी कोणाला गृहीत धरण्याचं कारण नाही. मी माझ्या रुद्रा हटच्या जगात एखाद्या पक्ष्याप्रमाणे मुक्त आकाशात बागडू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT