Maharudra Mangnale : मी नेपाळच्या प्रेमात पडलो, कारण...

Nepal Agriculture Story : नेपाळमधील ८० टक्के जनता ग्रामीण भागात, डोंगर माथ्यावर राहते. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आणि जगण्याचा आधार. त्यांच्या घरांची रचना, जागा, राहणीमान, जगणं हे शेतीपूरक, निसर्गपूरक आहे. या शेतीत जगणाऱ्या स्त्री-पुरुषांचं जगणं कष्टाचं आहे.
Nepal Update
Nepal UpdateAgrowon
Published on
Updated on

Nepal Update : मी नुकताच नेपाळला जाऊन आलो. डोंगर, दऱ्या, पर्वत, नद्या, जंगलं आणि शेती मला आवडते. हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा बघणं हे तर स्वप्नच. हे सगळं काही नेपाळमध्ये असल्याने मला नेपाळ अधिक भावलं.

नेपाळ अतिमागास देशांच्या यादीत असल्याने अद्यापही इथं निसर्ग टिकून आहे. विकासाच्या नावाखाली जगभर निसर्गावर आक्रमण सुरू आहे. डोंगर, जंगलं नष्ट केली जात आहेत. खळाळणाऱ्या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारून परिसराचं नैसर्गिक सौंदर्य नष्ट केलं जातंय. जंगलं तोडून जमीन वहितीखाली आणली जातेय, खनिज द्रव्यासाठी डोंगर खोदले जात आहेत.

याला नेपाळही अपवाद नाही. मात्र या सगळ्याचं प्रमाण तुलनेने खूप कमी आहे. शिवाय नेपाळची भौगोलिक स्थितीच अशी आहे, की काही भागापर्यंत माणसांचे हात पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे ती नैसर्गिकता टिकून राहील असं वाटतं.

नेपाळमधील ८० टक्के जनता ग्रामीण भागात, डोंगर माथ्यावर राहते. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आणि जगण्याचा आधार. त्यांच्या घरांची रचना, जागा, राहणीमान, जगणं हे शेतीपूरक, निसर्गपूरक आहे. या शेतीत जगणाऱ्या स्त्री-पुरुषांचं जगणं कष्टाचं आहे. डोंगरमाथ्यावर छोट्या छोट्या तुकड्यांची ही शेती.

इथं कुठलंच यंत्र जाऊ शकत नाही. त्यामुळं मशागतीपासून पेरणी, कापणी व रास करेपर्यंतची सगळी कामं शेतकरी स्वत: करतात. त्यांची ही शेती आपल्या कल्पनेपल्याडची आहे. आपल्याप्रमाणेच नेपाळच्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा, बदलत्या हवामानाचा फटका बसतोय; पण त्यांच्यासमोरही शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही.

गहू, मका, बटाटा ही पिकं प्रामुख्याने डोंगरी भागांत दिसतात. याशिवाय खाण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्याही ते पिकवतात. क्वचित ठिकाणी फळबागाही दिसल्या. हवामान इतकं चांगलं आहे, की मला कुठंच मक्यावर कीड, रोग आढळला नाही.

Nepal Update
Nepal Agriculture: नेपाळच्या जंगलात फुलांचे विविध प्रकार कधी फुलतात?

सगळी पिकं तजेलदार दिसली. बटाट्याच्या तीन जाती बघण्यात आल्या. काही भागांत बाजरीचंही उत्पादन होतं. बाजरीपासून घरगुती मद्य बनतं. ते लोकप्रिय आहे. नेपाळी शेतकरी रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर करीत नाहीत. शेतीत कमी-जास्त प्रमाणात शेणखत व कंपोस्ट खत वापरलं जातं. त्यामुळं नेपाळमधील शेती उत्पादन सेंद्रिय आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सात दिवस आम्ही एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर, शेताशेतांतून पिकांची निरीक्षणं करीत, ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांशी बोलत प्रवास केला. तेव्हा नेपाळी शेतकऱ्यांचं वेगळेपण लक्षात आलं. भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांची शेती अफाट कष्टाची आहे. पण या कष्टाबद्दल त्यांची तक्रार दिसली नाही.

उलट त्यांचं जगणं आनंददायी दिसलं. त्यांच्या आनंदाच्या कल्पना साध्यासुध्या आहेत. याचं कारण त्यांच्या गरजा खूप कमी आहेत. शेतीच्या कमाईवर लखपती बनण्याची, ऐश करण्याची त्यांची स्वप्नं नाहीत. शेतीतून वर्षभर पुरेल एवढं धान्य काढायचं, हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. शेतीतून थोडंसं उत्पन्न मिळालं तरी ते खूष असतात.

पाच- सहा तुकड्यांचीच शेती असली, तरी त्यांच्याकडं दुधाची एक- दोन जनावरं असतात, दोन- चार शेळ्या आणि तेवढ्याच कोंबड्याही असतात. त्यापासून त्यांना काही पैसे नक्कीच मिळतात. चार शेतकरी कुटुंबांत आम्ही राहिलो. तिथं जेवण घेतलं. जेवण सकस आणि दर्जेदार असतं. त्यांच्या आहारात शाकाहार आणि मांसाहार दोन्ही असलं, तरी शाकाहाराला प्राधान्य दिसतं.

डोंगरावर विविध हंगामांत उगवणाऱ्या रानभाज्यांचा वापर ते आवर्जून करतात. त्यामुळं नेपाळी स्त्री-पुरुष तब्येतीनं मजबूत आहेत. त्यातही शेरपांचा काटकपणा जबरदस्त आहे. उंचच उंच डोंगर चढणं, उतरणं ही त्यांच्यासाठी किरकोळ बाब असते. शेतकरी म्हटला, की दुर्मुखलेला, चिंताग्रस्त व्यक्ती, असं चित्र अपवादानेही दिसलं नाही.

शहरी जीवनापासून दूर असलेले आणि निसर्गाशी जोडले गेलेले हे लोक आनंददायी जगतात. राहणीमान साधं पण टापटीप आहे. स्वच्छता हा त्यांच्या जगण्याचा स्थायीभाव. थंडीमुळे प्रत्येकाकडं कोट, जाकीट, स्वेटर हे उबदार कपडे असतातच.

संध्याकाळी घरी भेटायला आलेल्या मित्रांचं, नातेवाइकांचं स्वागत थुंबका, उराक या घरगुती मद्यानं करतात. चहा हे तर यांचं आवडतं पेय. शेतीप्रमाणेच स्वयंपाकातही स्त्री-पुरुष एकमेकांना मदत करतात. त्यांच्याकडे पैसे फारसे नसतील, पण त्यांची आतिथ्यशीलता कौतुकास्पद आहे. ग्रामीण नेपाळी माणूस अद्यापही आपल्याच या छोट्याशा जगात खूष आहे.

इथं अगदी चार-पाच घरांच्या वस्तीवरही वायफायची सुविधा आहे. बहुतेक सगळ्यांकडं ॲन्ड्रॉइड फोन आहेत. मात्र टी.व्ही. अपवादानेच दिसला. उद्या इथंही कथित‌ विकास पोहोचला, तर ही माणसं त्यांचं हे आनंददायी जगणं विसरतील, अशी भीती मला वाटते.

नेपाळमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ८२ टक्के हिंदू आहेत. त्यानंतर ९ टक्के बौद्ध, ४ टक्के मुस्लिम, किरत मुंथूम, बॉन, निसर्गपूजक, ख्रिश्‍चन, जैन, शीख आणि कोणताच धर्म न मानणारेही आहेत. जाती, उपजाती अनेक आहेत.

नेपाळ पूर्वी एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाई. पण २००८ पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. नेपाळमध्ये सुमारे १२३ भाषा बोलल्या जातात. मात्र नेपाळी ही नेपाळची अधिकृत भाषा आहे. देशातील निम्मी लोकसंख्या ही भाषा बोलते. नेपाळी भाषेची लिपी देवनागरी आहे. त्यामुळे नेपाळी नावं मराठी असल्याचं आपल्याला वाटतं.

देशातील विविध प्रांतांसाठी इतर १४ भाषांनाही सरकारने मान्यता दिली आहे. नेपाळच्या बहुभाषिक व बहुसांस्कृतिकतेची कल्पना आपल्याला येईल. एवढं वैविध्य असूनही नेपाळमध्ये कट्टरता नाही. विविध धर्मीयांच्या देवदेवता एकमेकांच्या शेजारी आहेत. एकमेकांच्या धार्मिक उत्सवातही लोक सहभागी होतात.

आम्ही किन्जे या गावात चार मुक्काम केले. या गावातील घरांना दगडी वा लोखंडी कुंपण नाहीत. प्रत्येक घराच्या बाजूला मोकळी जागा आणि तिथं परसबाग. दररोज लागणाऱ्या भाज्यांची लागवड तिथेच होते. प्रत्येक कुटुंबाने स्वत: किंवा सामुदायिकरीत्या आपल्या पाण्याची सोय स्वत:च केलीय. मला प्रत्येक कुटुंब स्वावलंबी वाटलं. ते त्यांच्या गरजेपुरते स्वत: पिकवतात. इथं बाटली घेऊन शौचाला निघालेला माणूस अपवादानेही पाहायला मिळत नाही.

नेपाळची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे, की तिथल्या रस्त्यांबद्दल फारशी तक्रार करता येत नाही. सगळे रस्ते डोंगरातून जातात. धो-धो पाऊस पडतो. कडे, खडक, माती कोसळून रस्त्यावर येते. रस्ता बंद होतो. अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून जातात. रस्ते खचतात. त्यामुळे मजबूत, दर्जेदार रस्ते तयार करणं हे नेपाळमध्ये आव्हानात्मक काम आहे.

Nepal Update
Maharudra Manganale: कोरडवाहू शेती म्हणजे पालथा धंदा पण तरी आमची शेती आनंददायी...

काठमांडू ते पोखरा या सहा पदरी हायवेचं काम दर्जेदार होतंय. मोठ्या शहरांतील रस्तेही चांगले आहेत. मात्र अनेक गावांपर्यंत अद्याप रस्ते झालेले नाहीत. तयार झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणं, हे कायमस्वरूपी काम आहे. सगळे रस्ते डोंगर पोखरून केले असल्याने, ते वळणावळणाचे असतात. रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी असते.

त्यामुळं अशा रस्त्यांचा सराव नसलेल्या पर्यटकांसाठी रस्ता प्रवास भीतीदायक असतो. तरीही चारचाकी, दुचाकी वाहनचालकांचं शिस्तीबद्दल कौतुक करावं लागेल. वाहतुकीचे नियम पाळतातच, शिवाय पुरेपूर संयमाने वागतात. रस्त्यावर गतिरोधक नाहीत, ही बाब त्यांच्या शिस्तीचं प्रतीक म्हणावं लागेल.

शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा भेद नेपाळमध्ये स्पष्ट दिसतो. काठमांडू असो की पोखरा, ही शहरं पर्यटकांची आवडती शहरं आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी जे काही भलंबुरं असतं, ते इथं पाहायला मिळतं. जुन्या काठमांडूमध्ये छोट्या गल्ल्या आहेत. प्रदूषण आहे. तुलनेने पोखरा शहर छानच आहे. प्रचंड तलाव हे या शहराचं आकर्षण. इथं जगभरातील पर्यटक येतात. विविध देशांच्या खाद्यसंस्कृतीची हॉटेल्स इथं आहेत. त्यामुळे पोखरा नेपाळपेक्षा वेगळं वाटतं.

नेपाळमध्ये दोन प्रकारचे पर्यटक दिसतात. एक धार्मिक कारणांसाठी येणारे आणि दुसरे ट्रेकिंगसाठी येणारे. देवदर्शनासाठी येणारे बहुतेक पर्यटक भारतीय असतात. त्यांच्यासाठी भरपूर मंदिरं आहेत. नेपाळ हे गौतम बुद्धांचं जन्मस्थान असल्याने बौद्ध धर्मीयही नेपाळला मोठ्या संख्येने भेट देतात. इतर पर्यटक हिमालय दर्शनासाठी येतात.

आम्ही ट्रेकिंग, हायकिंग व निसर्ग दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही डोंगर चढण्या-उतरण्याचा जो अनुभव घेतला, तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला. आजही नेपाळमध्ये डोंगर, दऱ्या, पर्वत, नद्या, जंगलं त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात टिकून आहेत. त्याचा पुरेपूर आनंद लुटला. नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी शेकडो पर्वतरांगा, शिखरं आहेत. वर्षभर राहिलं तरी कमी पडेल.

नेपाळमध्ये कायम राजकीय अस्थिरता असते. भ्रष्टाचाराबद्दलही बोलबाला आहे. नेपाळी नागरिकांना राजकारणी व्यक्तींबद्दल फारसा आदर नाही. त्यांना राजकारणात फारसा रसही नाही. आपल्यासारखे राजकारणग्रस्त लोक तिथं दिसत नाहीत. नेपाळमध्ये ८२ टक्के हिंदू असूनही, संख्येने केवळ ९ टक्के असलेल्या बौद्ध धर्मियांचा प्रभाव समाजमनावर दिसतो.

मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं ते इथलं भयमुक्त वातावरण. आम्ही कितीतरी अनोळखी रस्त्यांवर, डोंगरांवर बिनधास्त फिरलो. आपण लुबाडले जाऊ, कोणी आपल्याला अडवेल, त्रास देईल असं कुठंही वाटलं नाही. पोखरामध्ये रात्री अकरा वाजता फिरतानाही मी या भयमुक्त वातावरणाचा अनुभव घेतला. पर्यटकांसाठी ही बाब खूप मोलाची आहे. नेपाळला पर्यटनासाठी मी पुन्हा एकदा नक्की जाईन. नेपाळच्या या दौऱ्यातून मला खूप काही शिकता आलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com