Climate Change
Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate change: उष्णतेच्या लाटेचा सामना करत शेती कशी करावी?

Team Agrowon

हवामानबदलाच्या वावटळीत येत्या काळात शेती कशी तग धरेल? अचानक येणाऱ्या उष्णतेच्या लाटेला (Heat Wave) सामोरे कसे जायचे ? हे प्रश्न सध्या भारतीय शेतीसमोर आव्हान म्हणून उभे आहेत. अलीकडच्या काळात मार्च ते एप्रिल महिन्यात सतत येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे याकडे अधिक गांभीर्याने पहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी शास्त्रज्ञांनी काही सूचना शेतकऱ्यांना केल्या आहेत.

ठराविक तापमानात पिकाचे कुठले वाण तग धरू शकते, याचा विचार करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली. याशिवाय वाढत्या तापमानात फळबागा जगवण्यासाठी जैविक अच्छादनाचा वापर करणे, गायी, म्हशींच्या शरिराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर थंड पाणी मारणे अशा प्राथमिक उपाययोजना करुन होणारे नुकसान टाळता येते,असेही त्यांनी सुचवले आहे.

हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी एक सविस्तर अहवाल सादर केला. 'हिट वेव्ह २०२२ कॉजेस, इम्पॅक्ट अँड वे फॉरवर्ड फॉर इंडियन ॲग्रीकल्चर' असे या अहवालाचे नाव असून सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शंतनू कुमार बाल, जेएनव्हीएस प्रसाद आणि विनोद कुमार सिंग यांनी हा अहवाल लिहिला आहे.

नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रिझिलेन्ट ॲग्रीकल्चर कार्यक्रमा अंतर्गत (NICRA) भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशभरातील अधिक तापमान असणारी १५१ क्लस्टर्स निवडली. ज्यात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यातील २५ जिल्ह्यांतील काही निवडक गावांचा समावेश होतो. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून उष्ण वातावरणात होणारे नुकसान कसे टाळता येईल या संबंधी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.

पिकाच्या दाणे भरण्याच्या आणि परिपक्व होण्याच्या अवस्थेत जर उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला तर पिकाचे दाणे लहान होतात. यामुळे सरासरी उत्पादनात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत घट येते. यावर्षी पंजाब,मध्य प्रदेश आणि अन्य गहू उत्पादक राज्यांतील गव्हाबाबत (Wheat) हीच समस्या पहायला मिळाली. सरकारने निकष शिथिल करून हा गहू विकत घेतला.

धान्याबरोबरच उष्ण लाटेचा फलोत्पादनालाही (Horticulture) मोठा फटका बसतो. डाळिंब, आंबा, लिंबू, आदी फळांबाबत मोहोर जळणे, जमिनीतील ओल घटने, फळकूज असे प्रकार दिसून येतात. तसाच प्रकार टोमॅटो, काकडी या भाज्यांबाबतही पहायला मिळते. वाढत्या तापमानामुळे दुधाळ जनावरांची कातडी तापते. दूध उत्पादनात १५ टक्क्यांची घट होते. कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते, मरतुकीचे प्रमाण वाढते, असे या अहवालात नमूद करण्यात आले.

पंजाबमध्ये प्रयोग यशस्वी
पंजाबमध्ये दोन क्लस्टरमध्ये पीडब्ल्यूबी ०३, डीबीडब्ल्यू १८७, आणि डीबीडब्ल्यू २२२ या उष्णतेला सहनशील गव्हाच्या वाणांचा वापर करण्यात आला. संशोधकांच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात केवळ ३ ते ५ टक्के घट झाल्याचे दिसून आले. ऊसामध्येही जैविक आच्छादनाचा वापर केल्यास जमिनीतील ओल कायम राहील आणि उष्णतेचा पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे अहवालात म्हटले.

गव्हाची डीबीडब्ल्यू १७३, राज४१२० आणि राज ४०७९ यांसारखी उष्ण तापमानाला सहनशील वाणे उत्पादनातील घट कमी करू शकत असल्याचे संशोधकांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील बागपत,चित्रकूट, हमीदपूर, झांसी, गोरखपूर, महाराजगंज अशा क्लस्टर्समध्ये उत्पादनातील घट ५ ते ६ टक्क्यांवर सीमित राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

उष्णता सहन करणाऱ्या वाणांच्या वापरासोबतच पेरणीची अचूक वेळ साधता आल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. मॉन्सून (Monsoon)उशीरा दाखल झाल्यास शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या भातपिकाच्या गव्हाच्या वाणांची निवड करावी.पूरग्रस्त गोंडा आणि कुशीनगर जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी खरीपातील भात पिकांनंतर लगेचच योग्य वेळी गव्हाची लागवड केली त्यामुळे नुकसानीचे प्रमाण कसे घटले, याचा दाखला या अहवालात देण्यात आला.

उष्णतेला सहनशील आणि उशिरा लागवड केलेल्या आरव्हीजी २०२ या हरभऱ्याच्या वाणामुळे आणि पुसा बोल्ड या मोहरीच्या वाणामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी नुकसान कसे टाळले, हेही या अहवालात सांगण्यात आले.

फळबागांसाठी काय करावे?
मार्च ते एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात तापमान ३९.६ ते ४२.८ अंश सेल्सियस होते. त्याचदरम्यान नंदुरबारमध्ये ४१.५ ते ४३ अंश सेल्सियस होते. या दोन्ही जिल्ह्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सियस जास्त तापमान होते. त्यामुळे तिथल्या फळबागांना मोठा फटका बसला.

याशिवाय काही क्लस्टर्समध्ये डाळिंबाच्या बागांसाठी जैविक अच्छादनाचा वापर करण्यात आला. ज्यामुळे फळांना उष्णतेचा फारसा फटका बसला नाही आणि पाण्याच्या वापरावरही नियंत्रण ठेवता आले. प्लास्टिक अच्छादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या फळबागा आणि भाज्यांचे नुकसान टाळता आले. तिथे उष्णतेच्या लाटेचा कसलाही परिणाम जाणवला नाही. संशोधकांनी शेड नेट आणि कपड्याच्या मदतीने फळबागांचे कसे संरक्षण करायचे याचे उत्तम प्रशिक्षण दिले.

जनावरांना सावलीत बांधने, हिरवा चारा खाऊ घालणे, त्याच्यावर थंड पाणी मारणे आणि आहारात खनिज मिश्रणाचा समावेश केल्यामुळे जनावरांवर होणारे उष्णतेचे दुष्परिणाम टाळता येतात. ज्या गावांमध्ये विजेची उपलब्धता आहे अशा गावांत जनावरांच्या गोठ्यामध्ये फॉगर्स, पंखे लाऊन गोठ्यातील वातावरण थंड आणि हवेशीर राहील याची काळजी घेतली जाते.

यापूर्वीच्या उष्णतेच्या लाटेसारखीच (Heat Wave) २०२२ मधील उष्णतेची लाटही व्यापक होती. देशातील अनेक राज्यातल्या उत्पादनाला या लाटेचा फटका बसला. हवामान बदलामुळे यापुढील काळात अशा उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या पार्श्वभूमीवर तापमानवाढीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी या उपाययोजना अधिक लोकप्रिय व्हायला हव्यात, त्यांचा वापर अधिक मोठ्या प्रमाणावर करायला हवा, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.

हवामानविषयक अंदाजांतील अचूकता आणि कृषी सल्लागार सेवा (Agro-Advisory Services) शेतकऱ्यांना अधिक सजग करू शकतात. येत्या काळात त्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. भारतीय शेतीमध्ये हवामानाचा विचार करुन त्यानुसार शेतीमध्ये आणि पशुपालनात योग्य ते बदल केल्यास आपण नक्कीच या संकटाला तोंड देऊ शकतो, असा विश्वास या अहवालात व्यक्त करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT