Intercrop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Intercrop Management : आंतरपीक पद्धतीचे पूरक नियोजन कसे करावे?

Cotton Crop Management : आंतरपीक एकमेकांस स्पर्धक नसून पूरक नियोजन करावे. शिफारशीत जातींची निवड करावी. पीक पद्धतीचे नियोजन करताना गरजेनुसार पर्यायी पिकांचा समावेश करावा. जिरायती शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

Team Agrowon

डॉ. वा. नि. नारखेडे, डॉ. मदन पेंडके, डॉ. आनंद गोरे

Tur Crop Management : मुख्य पिकासोबत आंतरपीक घेणे शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरू शकते; कारण आंतरपीक पद्धती निश्‍चितच फायदेशीर ठरते. पावसाच्या अनिश्‍चित वितरणामुळे मुख्य पिकाची वाढ व उत्पादन घटले तरी आंतरपिकापासून निश्‍चित उत्पादन मिळते.

आंतरपिके प्रामुख्याने कडधान्य वर्गात मोडत असल्यामुळे या पिकापासून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम होते, सुपीकता टिकून राहते. कडधान्य व तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्याचा हा हमखास उपाय आहे. आंतरपिके पसरट व बुटकी असल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन जमिनीची धूप कमी होते.

जमिनीच्या सर्व स्तरातून अन्नद्रव्ये घेण्यास मदत होते. दोन पिकांची मुळांची वाढ भिन्न पद्धतीने होत असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर लाभ होतो.

आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य आणि आंतरपिकाची योग्य निवड

१) मुख्य आणि आंतरपिकाची वाढण्याची सवय भिन्न असावी. उदा. मुख्य पिकाची वाढ सरळ असल्यास आंतरपीक पसरट आणि बुटके असावे.

२) मुख्य आणि आंतरपिकाची मुळांची संरचना तंतुमय असल्यास आंतरपीक शक्यतो सोटमूळ असलेले निवडावे.

३) मुख्य आणि आंतरपिकाच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक असावा. ज्यामुळे दोन्ही पिकांच्या वाढीच्या अवस्था भिन्न राहून उत्पादनवाढीच्या सर्व घटकांचा फायदा दोन्ही पिकांस मिळतो.

४) मुख्य आणि आंतरपीक एकमेकांस स्पर्धक नसावे. उलट ते एकमेकांस पूरक असणे जरुरीचे असते.

५) आंतरपिकापासून जनावर वैरण, कुटुंबांच्या दैनंदिन आहारातील गरजा भागविणारी पिके उदा. डाळवर्गीय पिके निवडावीत.

चौकट - शिफारस केलेल्या काही महत्त्वाच्या आंतरपीक पद्धती

अ.क्र.---आंतरपीक पद्धती---ओळींचे प्रमाण---जमिनीचा प्रकार

अ) हमखास पावसाचा प्रदेश

१---कापूस + सोयाबीन---१:१---मध्यम ते भारी

२---कापूस + मूग/उडीद---१:१---मध्यम ते भारी

३---सोयाबीन + तूर---४:२---मध्यम

४---ज्वारी + तूर ---३:३ / ४:३---मध्यम ते भारी

५---ज्वारी + मूग/उडीद---४:२---मध्यम ते भारी

६---कापूस + तूर---६:२/ ८:२---मध्यम ते भारी

ब) कमी पावसाचा प्रदेश

१---ज्वारी + तूर ---३:३ / ४:२---मध्यम ते भारी

२---बाजरी + तूर ---२:१ / ३:३ / ४:२---मध्यम

३---तूर + मूग---१:२/ २: ४---मध्यम ते भारी

४---तूर + सोयाबीन---२: ४---मध्यम

५---बाजरी + हुलगे---२:१ / ४:२---मध्यम ते भारी

६---बाजरी + सोयाबीन---२:१ / ३:३ / ४:२---मध्यम ते हलकी

७---एरंडी + सोयाबीन---१:१---मध्यम ते हलकी

विविध आंतरपिकांचे नियोजन

ज्वारी + तूर :

- ही आंतरपीक पद्धती ३:३ किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात शिफारस करण्यात आली आहे. ज्वारी आणि तूर सर्वदृष्टीने एकमेकांस पूरक आहेत.

- ज्वारीचे पीक ११० ते ११५ दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीच्या पिकास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. ज्वारी काढल्यानंतर तुरीचे पीक जोमाने वाढते. तसेच पीक संरक्षण करण्यात भरपूर वाव मिळतो.

कापूस + सोयाबीन :

- भारी जमीन आणि ज्या ठिकाणी थोडा सखल भाग आहे. अशा भागात कापूस + सोयाबीन या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. आंतरपीक म्हणून सुद्धा हे पीक कापसामध्ये घेता येते.

- कापूस + सोयाबीन १:१ ओळीच्या प्रमाणात पेरावे. सोयाबीनची लवकर येणारी परभणी सोना एमएयूएस-४७ किंवा एमएयूएस-७१ किंवा इतर अशा प्रकारच्या जाती आंतरपिकासाठी निवडाव्यात.

- उशिरा पक्व होणाऱ्या सोयाबीनच्या जाती आंरपिकासाठी निवडू नयेत.

सोयाबीन + तूर :

- या पद्धतीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात आली आहे. सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळींचे प्रमाण हे ४:२ असे ठेवावे.

- उशिरा पेरणीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे. खरीप हंगामात एकच पीक घेतले जाते अशा क्षेत्रावर या पद्धतीचा अवलंब करावा.

कापूस + तूर :

- ही पारंपरिक पट्टा पद्धती आहे. वेगवेगळ्या भागात शेतकरी कापसाच्या विशिष्ट ओळीनंतर तुरीच्या एक किंवा दोन ओळी पेरतात. या आंतरपीक पद्धतीत कापूस संशोधन केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून कापसाच्या ६ किंवा ८ ओळींनंतर तुरीच्या एक ओळ पेरावी अशी शिफारस करण्यात आली.

बाजरी + तूर :

- कमी पावसाचा भाग, मध्यम जमिनी तसेच उशिरा पेरणीसाठी बाजरी + तूर (३:३, ४:२) या पीक पद्धतीने लागवड करावी.

कापूस + उडीद (१:१) किंवा कापूस + मूग (१:१) आंतरपीक:

- आंतरपीक पद्धती हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम ते भारी जमिनीमध्ये शिफारस केलेली आहे. कापसाचे अमेरिकन संकरित जातीच्या लागवडीसाठी ९० × ९० सेंमी आणि सरळ वाण (देशी कपाशी) लागवडीसाठी ९० × ६० सेंमी अंतरावर कापसाच्या दोन ओळी टोकण करून मध्ये उडदाचे आंतरपीक घ्यावे.

- रासायनिक खताच्या नियोजनात कापसाची शिफारस केलेली पूर्ण मात्रा (बीटी कपाशी : १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश आणि अमेरिकन सुधारित जातीसाठी ८० किलो नत्र ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावी. बागायती कपाशी : १५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद, ७५ किलो पालाश विभागून द्यावे).

- उडदासारखीच मुगाची १ ओळ कापसाच्या २ ओळींतील अंतरामध्ये घेण्याची शिफारस आहे.

मका + सोयाबीन (३:३) आंतरपीक :

- मक्याची पट्टा पद्धतीने (७५-४५ सेंमी) लागवड करताना दोन पट्ट्यांतील अंतरामध्ये (७५ सेंमी) सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात.

मका + मूग (२:१) आंतरपीक :

- या आंतरपीक पद्धतीची शिफारस प्रामुख्याने मध्यम ते हलक्या जमिनीसाठी आहे.

- पावसाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उशिरा पेरणीकरिता ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.

- या आंतरपीक पद्धतीत मुख्य आणि आंतरपिकाच्या (६० सेंमी) ओळींचे प्रमाण १:१ ठेवावे.

रासायनिक खतांची मात्रा :

- आंतरपीक घेताना शिफारशीनुसार खत देणे आवश्यक आहे. अन्यथा, अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अशावेळेस आंतरपिकाचा फायदा दिसून येत नाही. याकरिता मूळ पिकास शिफारशीनुसार आणि आंतरपिकास शिफारशीनुसार मात्र एका हेक्टर क्षेत्रातील ताटांची संख्या गृहीत धरुन खत द्यावे.

- ज्वारी + तूर ४:२ या प्रमाणात ज्वारीची शिफारस ८०:४०:४० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी एवढीच द्यावीत. मात्र हेच प्रमाण ३:३ असल्यास ८०:४०:४० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी आणि तूर पिकास २५:५०:० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी याप्रमाणे द्यावे.

- कापूस + उडीद /मूग/सोयाबीन आंतरपीक पद्धतीमध्ये फक्त कापूस पिकासच शिफारशीनुसार (८०:४०:४० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी) खत द्यावे. आंतरपीक वेगळे खत देण्याची आवश्यकता नाही. बीटी कापूस आंतरपीक पद्धतीसाठी खत मात्रा १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी द्यावी.

संपर्क - डॉ. वा. नि. नारखेडे, ९८२२९९२८६४, (अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT