भीमाशंकर बेरुळे
Village Form 12: गाव नमुना बारा ही पिकाची नोंदवही आहे. महाराष्ट्र जमीन महसूल (अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे) नियम १९७१ चे नियम २९ प्रमाणे नेमून दिलेल्या नमुना १३ मध्ये ती ठेवायची आहे. नमुना १३ म्हणजेच गाव नमुना बारा होय. ज्या जमिनीत आणि ज्या क्षेत्रात पिकांची लागवड करण्यात येते ती जमीन आणि ते क्षेत्र या नोंदवहीत नोंदलेले असते. ही नोंदवही प्रत्येक गावी ठेवण्यात येते. प्रत्येक कृषी वर्षांत होणाऱ्या विविध पीक हंगामात जमिनीत लागवड केलेल्या पिकांची नोंद प्रत्येक हंगामाकरिता वेगळी करायची असते.
उदाहरणार्थ, जर एकाच जमिनीत खरीप हंगामाची आणि रब्बी हंगामाची दोन्ही पिके घेण्यात आली तर त्या जमिनीच्या गाव नमुना बारामध्ये दोन्ही हंगामांत घेतलेल्या पिकांची स्वतंत्रपणे पीकपाहणी तलाठ्याने करायची आहे. पीकपाहणी कशी करावी याची कार्यपद्धती नियम ३० मध्ये विशद केलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड चारमधील प्रकरण दोनमध्ये गाव नमुना बारा ठेवण्यासंबंधी तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत. त्याचा आपण येथे विचार करणार आहोत.
पोटखराब आणि पडीक क्षेत्र
गाव नमुना बारा भरताना तलाठ्याने पडीक व पोटखराब; तसेच गवताळ व पोटखराब यामधील भेद दाखविला जाईल अशी काळजी घ्यायची आहे. पोटखराबमध्ये घेतलेली पिके दाखवायची नाहीतच परंतु पोटखराब ‘ब’ वर्गातील जमिनीत जर ०-५०६ हेक्टर म्हणजे ५ गुंठे किवा ५ आर किंवा त्यापेक्षा जास्त लागवड करण्यात आलेली असेल, तर तलाठ्याने त्याची नोंद घ्यावयाची आहे.
गाव नमुना अकरामध्ये दर्शविलेल्या बिनआकारी जमिनी व लागवडीसाठी उपलब्ध नसलेल्या इतर जमिनी यामधील इतर लागवड यामध्ये पोटखराब ‘ब’ वर्गातील लागवड तलाठ्याने समाविष्ट करायची आहे.
पिकाची आकडेवारी नोंदताना तलाठ्याने प्रथम पोटखराब आणि पडीक क्षेत्र याकडे लक्ष द्यायचे आहे. नंतर मग गवत किंवा गवत आणि बाभूळ असल्यास त्या क्षेत्राकडे लक्ष द्यावयाचे आहे; परंतु या क्षेत्रातून रब्बीच्या हंगामात नांगरणी होण्याची व पीक घेतले जाण्याची काही शक्यता असेल तर प्रथम निरीक्षणाच्या वेळीच या क्षेत्राची अंतिम अशी नोंद न करण्याची खबरदारी तलाठ्याने घ्यायची आहे.
पडीक क्षेत्रात होणारी ही लागवड अतिक्रमण करून केली असण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा लागवडीची नोंद त्याच वेळी गाव नमुना एक-ई अतिक्रमण रजिस्टरला घेणे आवश्यक आहे.
सुधारित बियाणे, मिश्रपिके, फळझाडे आणि इंजायली झाडांची नोंद
ज्या जमिनीत भूधारकांनी उत्पादनवाढीसाठी सुधारित बियाण्यांचा वापर केलेला असेल तेव्हा सुधारित बियाण्याखालील क्षेत्राचा फरक त्यासमोर ‘सु बि’ म्हणजेच सुधारित बियाणे ही दर्शक अक्षरे लिहून दाखवायचा आहे. गावच्या जमिनीमध्ये जी मिश्रपिके घेतलेली आहेत ती त्यानंतर विचारात घ्यावयाची आहेत. या नोंदी घेऊन झाल्यानंतर शेतामध्ये फळे धरू शकतील अशा खालील प्रकारच्या फळझाडांची गणना तलाठ्याने करायची आहे आणि त्यांची नोंद ‘शेरा’ स्तंभामध्ये करायची आहे.
आंबा, फणस, चिंच, नारळ, ताड व खजूर; तसेच शेतामध्ये जांभूळ, निंब, खैर, धावडा आणि अंजन यासारखी इंधनोपयोगी झाडे असल्यास त्यांची देखील तलाठ्याने ‘शेरा’ स्तंभामध्ये नोंद घ्यावयाची आहे. परंतु प्रत्यक्षात असे अनुभवाला येते, की गाव नमुना बाराच्या शेरा सदरात जमिनीत असलेल्या फळझाडांची, इंजायली झाडांची नोंद तलाठी करत नाहीत. त्यामुळे जेव्हा जमीन संपादन केली जाते, तेव्हा या अशा नोंदी नसल्याने संबंधित कब्जेदाराचे अपरिमित नुकसान होणे संभवते. तेव्हा प्रत्येक कब्जेदाराने आपल्या जमिनीच्या गाव नमुना बारा-पीक पाहणी पत्रकाचे शेरा सदरात जमिनीत असलेल्या फळझाडांची, इंजायली झाडांची नोंद तलाठी यांचेकडून जागरूक राहून करून घ्यावी.
जलसिंचन प्रकार
जेव्हा एखाद्या जलसिंचनाच्या प्रकाराच्या साह्याने एखादे पीक घेण्यात येते, तेव्हा त्या समोर जलसिंचनाचा प्रकार तलाठ्याने दाखवायचा आहे. जलसिंचनाचे मान्यता दिलेले वर्ग पुढीलप्रमाणे आहेत.
तलाव, विहिरी, पंप, (नदीच्या काठावर किंवा विहिरीवर बसविलेली बाष्प, तेल इंजिने व आता विजेवरील मोटारी) सरकारी कालवे, पाटाचे खासगी कालवे, उद्धरणे (घेकुडी).
जलसिंचित पिकांसमोर जलसिंचनाची साधने तलाठ्याने दर्शवायची आहेत. हे काम कमीत कमी अक्षरे वापरून करता यावे म्हणून जलसिंचन पिकांसमोर संपूर्ण शब्दाऐवजी फक्त आद्याक्षर उदाहरणार्थ ‘त’, ‘वि’, 'बा', ‘पा’, इत्यादी लिहिले तरी चालेल.
जेव्हा जमिनीतील पिकाच्या जलसिंचनासाठी एकापेक्षा अधिक पद्धतींचा उपयोग करण्यात येतो तेव्हा जलसिंचनाचा वर्ग मुख्यतः पाण्याच्या साधनानुसार म्हणजेच तलावातून किंवा विहिरीतून असा दाखवायचा आहे. पाटात बरेच वेळा विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो म्हणून जलसिंचनाचा वर्ग पाटाखालील असा दर्शवायचा आहे; परंतु मोटस्थळ पाणी दर्शविण्यासाठी (वि) जोडण्यात यावे.
पाणीपुरवठ्याच्या साधनांची नोंदवही
माणसांना, प्राण्यांना करण्यात येणारा पाणीपुरवठा; तसेच शेतीसाठी करण्यात येणारे जलसिंचन याच्या संबंधाची आकडेवारी दर्शविणारी ‘पाणीपुरवठ्याच्या साधनांची नोंदवही’ गाव नमुना चौदामध्ये प्रत्येक गावी ठेवण्यात येते.
तलाठ्याने गावाच्या नकाशामध्ये विहिरी व पाट दर्शवायचे आहेत; तसेच याची तपासणी मंडळ निरीक्षक, मंडळ अधिकारी इत्यादी वरिष्ठ महसूल व भूमापन अधिकारी यांनी करायची आहे. नवीन विहिरी, तलाव, पाट इत्यादींमध्ये झालेल्या वाढीची सत्वर नोंद करण्यात येते की नाही हे त्यांनी पाहावयाचे आहे.
पीक पाहणीच्या वेळी मंडळ निरीक्षक आणि इतर तपासणी अधिकाऱ्यांनी या नमुन्याची व काढलेल्या गोषवाऱ्याची तपासणी करायची आहे. हे काम दर वर्षी ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात यावी. नमुना अद्ययावत झाल्यावर या नमुन्याचा गोषवारा दर वर्षी १० मेपूर्वी तहसीलदारांकडे पाठवायचा आहे.
तपासणी अधिकाऱ्यांनी गावच्या अभिलेखाची तपासणी करताना या नमुन्यात दर्शविलेली जलसिंचनाची साधने ज्या स्थानात म्हणजे भूमापन क्रमांकात दाखविलेली आहेत, त्याची पडताळणी गावाचे संबंधित भूमापन क्रमांकाचे सात-बारा तपासून करावी, अशी अपेक्षा आहे. हा नमुना त्वरित संदर्भासाठी खाली दिला आहे.पडीक जमिनीचे प्रकार लागवडीस उपलब्ध नसलेल्या जमिनीचे स्वरूप व क्षेत्र गाव नमुना बाराच्या स्तंभक्रमांक (१२) व (१३) मध्ये दाखवायचे आहे. अशा प्रकारच्या पडीक जमिनीचे आठ प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
वने : गावातील सरकारी वनाखालील; तसेच खासगी वनाखाली असलेल्या जमिनी त्यांचे क्षेत्र नमूद करताना विचारात घ्यायच्या आहेत.
डोंगराळ व खडकाळ भूभाग, वाळवंट, नद्या.
अकृषिक जमिनी म्हणजेच इमारती, रस्ते, रेल्वे, दफनभूमी, सैनिकी, छावणीची जागा, पाणीपुरवठ्याची साधने इत्यादी.
काही विशिष्ट कालावधीसाठी (पाच वर्षे किवा अधिक) पडीक ठेवलेल्या जमिनी.
गवताळ जमिनी आणि जनावरे चारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी.
उपयुक्त झाडे असलेल्या जमिनी.
इतर पडीक जमिनी, म्हणजेच एक ते पाच वर्षे इतक्या कालावधीसाठी पडीक ठेवलेल्या जमिनी.
चालू पडीक जमिनी, म्हणजे वर्षामध्ये फक्त एकाच हंगामात (खरीप किंवा रब्बी) पडीक ठेवलेल्या जमिनी.
तोडण्यास मनाई असलेल्या झाडांची नोंद
महाराष्ट्र राज्य झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६६ व त्याखालील नियम याअन्वये तोडण्यास मनाई केलेल्या झाडांची; तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (झाडे तोडण्यास मनाई) कायदा १९६८ अन्वये तोडण्यास मनाई केलेल्या म्हणजे प्रतिबंधित झाडांची देखील तलाठ्याने स्तंभ ‘शेरा’मध्ये नोंद करायची आहे. तोडण्यास मनाई केलेली झाडे पुढीलप्रमाणे आहेत.
१) हिरडा, २) साग, ३) मोह, ४) चिंच ५) आंबा. नैसर्गिकपणे वाढणारी रानटी फळे धरणे बंद झाला आहे असा आंबा (रायवळ) सोडून, ६) फणस (फळे धरणे बंद झाला आहे असा फणस सोडून), ७) खैर, ८) चंदन, ९) बीजा, १०) हळदू, ११) तिवस, १२) अंजन, १३) जांभूळ, १४) ऐन, १५) किंजळ.
(संदर्भ ः महाराष्ट्र शासन महसूल आणि वन खाते जाहीरनामा टी. आर. एस. १०७७/५८७६०/ ३९२/जी-७ दिनांक २० डिसेंबर, १९७७ आणि महाराष्ट्र शासन, महसूल व वन खाते ठराव क्रमांक टी. आर. एस. १०८१/८४४५०/१३२८/जी-७ दिनांक १० ऑक्टोबर १९८१.)
सध्याच्या काळात पर्यावरण संरक्षण आणि त्याचबरोबर दुष्काळ निवारणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, तेव्हा सरकारी जागेतीलच नव्हे तर खासगी जागेतील वृक्षतोडीवर या कायद्यान्वये घातलेल्या बंधनांचा विचार निश्चितच महत्त्वाचा ठरतो. तहसिलदारांनी, नायब तहसिलदारांनी किंवा आता कायद्याने अधिकार दिलेल्या वृक्ष अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याशिवाय वर नमूद केलेली प्रतिबंधित झाडे तोडता येत नाहीत.
वृक्षतोडीवर कडक निर्बंध
रोगग्रस्त, मृत, वारेमोड झालेल्या वनीकरणाच्यादृष्टीने पक्व किंवा जमिनीच्या कसवणुकीस अडथळा करणारे झाड तोडण्यासच फक्त परवानगी देता येते; तसेच अशी परवानगी देताना तलाव, नदी, ओहोळ या पाणवठ्यापासून ३० मीटर अंतरावरील झाडे वगळायची आहेत तसेच रस्त्याच्या कडेला लावलेली अथवा उगवलेल्या झाडांची तोड करण्यास परवानगी देता येत नाही. याशिवाय प्रत्येक एकरात झाडतोडीनंतर कमीतकमी २० झाडे शिल्लक राहतील अशीही दक्षता, परवानगी देताना घ्यायची आहे.
विनापरवाना झाडतोडीच्या गुन्ह्याविरुद्ध पोलिस वन व महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई करायची आहे. परवानगीशिवाय तोडलेली झाडे शासनाकडे जप्त होतात, शिवाय असा गुन्हा करणाऱ्यांस प्रत्येक तोडलेल्या वृक्षासाठी एक हजार रुपयांपर्यंत तहसीलदार दंड करू शकतात.
शासनाने वृक्ष जोपासनेस दिलेले महत्त्व लक्षात घेऊन आणि त्याच वेळी वृक्षतोडीवर घातलेल्या कडक निर्बंधाचा विचार करून तलाठी यांनी खासगी जमिनीतील निर्बंधित झाडांची गणना करून त्यांची नोंद गाव नमुना बाराचे ‘शेरा’ स्तंभामध्ये काटेकोरपणे करणे अत्यावश्यक आहे. जेथे हे काम तलाठी करणार नाहीत तेथे जागृत खातेदारांनी ते करून घेतले पाहिजे.
वरील झाडांव्यतिरिक्त इतर कोणत्याही झाडांची गणना करण्याचे आदेश देण्यात आल्यास त्यांची नोंददेखील तलाठ्याने करायची आहे; परंतु एखादे पूर्ण क्षेत्र किंवा त्याचा विशिष्ट भाग, पाला, किंवा फळझाडे, किंवा इंधनोपयोगी झाडे यांच्या लागवडीसाठी पूर्णपणे स्वतंत्र राखून ठेवलेली असतील किंवा लागवड केलेली असेल तेव्हा त्या क्षेत्रातील झाडांची गणना करून संख्या न नोंदता त्या झाडाखालील क्षेत्र तलाठ्याने दाखवायचे आहे.
bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.